शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करताना

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करताना
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करताना

शेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कायद्यांची इत्यंभूत माहिती घेणे आवश्यक आहे. नाबार्ड व एसएफएसी यांच्यातर्फे प्रोत्साहन दिल्यामुळे राज्यामध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत असल्या तरी कंपनी कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे त्या अडचणीत आल्याची अनेक उदाहरणे आहेत किंवा त्यांची प्रगती खुंटली आहे. याच कारणासाठी कंपनीला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावा लागतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सदस्य संख्या किती असावी याला मर्यादा नाही. जेवढे जास्त सदस्य तेवढी कंपनीची उलाढाल वाढते. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यापूर्वी कंपनीला यथायोग्य नाव देणे गरजेचे आहे. कंपनीचे नाव निवडताना चार-पाच नावे ठरवावीत. कारण नोंदणीकृत कंपन्यांमध्ये त्यापैकी एखादे नाव असेल तर ते नाव नोंदणीसाठी स्वीकारले जात नाही. चार-पाच नावांपैकी एखादे नाव स्वीकारले जाण्याची शक्यता असते. कंपनीची नोंदणी करताना नावाची शिफारस करून अधिकृतपणे नावासाठी मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतरच कंपनीची नोंदणी होते. कंपनी निबंधक (रजिस्ट्रार) यांच्याकडे नावासाठी अर्ज करावा लागतो. त्यांच्याकडे नोंद झालेल्या नावांची यादी तपासून कंपनीला दिलेल्या यादीपैकी एक नाव कळवितात. नावाचा साचा अधिकृतपणे `...................... शेतकरी उत्पादक कंपनी` असा असतो. उदा. `जयहिंद` शेतकरी उत्पादक कंपनी.  

आवश्यक कागदपत्रे व योग्य नमुन्यामध्ये माहिती भरणे

 • उत्पादक कंपनीची नोंदणी करताना अनेक कागदपत्रांची तजवीज करावी लागते. त्यात महत्त्वाचा सर्व सभासदांच्या जमिनीचा ७/१२ उतारा, कंपनीचा प्रवर्तक व संचालक मंडळ यांचे पॅननंबर, सर्व संचालकांचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा, कार्यालयाच्या मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र, सर्व संचालकांचे फोटो, प्रवर्तक आणि संचालकांकडून कंपनीचे घोषणापत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीचा अर्ज नोंदणी करण्यासाठी जमा करावा.   
 • शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यासाठी आणखी काही अतिरिक्त गरजा असतात.
 • त्यापैकी कंपनी रजिस्टारकडून मंजूर झालेल्या नावाचे मंजुरीपत्राची प्रत, करारनामा हा व्यवस्थित मुद्रित केलेला तसेच मुद्रांकित केलेला असावा.
 • शेतकरी उत्पादक कंपनीचा पूर्ण पत्ता हा फॉर्म नंबर १८ यामध्ये भरावा.
 • सर्व संचालकांचे विवरणपत्र फॉर्म नंबर ३२ मध्ये भरून अर्जासोबत जोडावे.
 • कंपनी स्थापनेची पूर्तता करण्यासाठी मुद्रांकावर फार्म नंबर १ मधील सर्व मसुदा टाईप करून घ्यावा.
 • संचालकांचे संमतीपत्र फॉर्म नंबर २९ मध्ये भरावेत.
 • नोंदणीकरणासाठी अधिकृत व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) द्यावे.
 • नोंदणीचे सहा टप्पे शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्यासाठी साधारणः ६ टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यात डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक संचालकांना ओळख क्रमांक (DIN) दिला जातो. तिसऱ्या टप्प्यात कंपनीचे नामकरण, चौथ्या टप्प्यात कंपनीचे आर्टिकल असोसिएशनचे निवेदनपत्र, पाचव्या टप्प्यात रजिस्ट्रेशनचे सर्व दस्तऐवज सादर करावे लागतात. शेवटचा व सहावा टप्पा म्हणजे कंपनी स्थापनेचे प्रमाणपत्र प्राप्त करणे. सर्व कागदपत्रे व दस्तऐवज परिपूर्ण असल्यास नोंदणीसाठी लागणारा कालावधी कमी होतो. कंपनी रजिस्ट्रार कागदपत्रांच्या पडताळणीनंतर सर्व बाबी योग्य असल्यास ३० दिवसांच्या आत कंपनी स्थापनेचे प्रमाणपत्र देतात.

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com