सिक्कीमने दिले पर्यावरणपूरक शेती पद्धतीतून उत्तर

गेल्या भागामध्ये सिक्कीममधील टेरेस फार्मिगबद्दल जाणून घेतले. या भागामध्ये त्यांच्या पाच पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि त्याला दिलेली सेंद्रिय शेतीची जोड यांची माहिती घेऊ. पर्वत, निसर्ग, जंगल, पर्यावरण आणि शेती यांची सांगड घालत वातावरणाला कसे उत्तर द्यायचे, याचे ते उत्तम उदाहरण ठरते.
सिक्कीमने दिले पर्यावरणपूरक शेती पद्धतीतून उत्तर
सिक्कीमने दिले पर्यावरणपूरक शेती पद्धतीतून उत्तर

गेल्या भागामध्ये सिक्कीममधील टेरेस फार्मिगबद्दल जाणून घेतले. या भागामध्ये त्यांच्या पाच पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि त्याला दिलेली सेंद्रिय शेतीची जोड यांची माहिती घेऊ. पर्वत, निसर्ग, जंगल, पर्यावरण आणि शेती यांची सांगड घालत वातावरणाला कसे उत्तर द्यायचे, याचे ते उत्तम उदाहरण ठरते. सिक्कीम राज्यातील कृषी विभाग व शेतकरी हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी पिकांची पाच भागांत विभागणी केली आहे. मका आधारित शेती  यात मुख्य पीक मका असून, त्यानंतर भात, उडीद, सोयाबीन, हळद, आले आणि भाजीपाला पिकवला जातो. भात आधारित शेती यात भात हे मुख्य पीक. त्यानंतर मोहरी, मका, वाटाणा, बटाटा आणि गहू उत्पादन घेतले जाते. मॅंडेरियन आधारित शेती मॅंडेरियन हे संत्र्याप्रमाणेच दिसणारे पण आकाराने लहान फळ आहे. सिक्कीममधील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पातळ साल आणि चवीला गोड असलेली ही फळांची किमान एक टोपलीभर तरी असतात. उत्पादनानंतर फळांचा मोठा हिस्सा आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवून शेतीमाल विक्रीला पाठवला जातो. फळ विक्रीचे काम शेतकरी स्त्री करते. खरेदीवेळी तुमच्यासोबत लहान मुल असले तर त्याच्या हातात बसतील एवढी फळे अगदी मोफत दिली जातात. फळाला हात लावला तरी रागाने पाहणाऱ्या शहरी विक्रेत्याचा नेहमीचा अनुभव असलेल्या मला आश्‍चर्याचा धक्काच होता. सिक्कीमचे शेतकरी त्यांच्या ‘टेरेस फार्मिग’ मध्ये संत्र्याची झाडे लावतात. त्यात आंतरपीक म्हणून मका, गहू, मोहरी अशी पिके घेतात. ‘बक व्हीट’ हे गव्हासारखेच, मात्र तृणधान्य नसलेले पीक आंतरपीक म्हणून खूप छान वाढते. नेहमीच्या गव्हापेक्षा थोडे वेगळे, त्रिकोणी दाणे असलेले हे धान्य फिक्कट तांबूस हिरव्या रंगाचे असते. या दाण्याची भरड करून साल काढली जाते. आतील स्वच्छ दाण्याचे पीठ करून खाण्यासाठी वापरले जाते. यांचे नुडल्स खूपच छान होतात. या झपाट्याने वाढणाऱ्या ‘बकव्हीट’ची शेती सिक्कीममध्ये वाढत आहे. संत्र्याच्या झाडांमुळे याचे वाऱ्यावादळापासून संरक्षण मिळते. वातावरण बदलाचे पूर्वसंकेत या तृणधान्याला समजत असल्याचे विविध संशोधनातून पुढे आले आहे. उदा. एखादे संकट येण्याची शक्यता असल्यास, उद्‍ध्वस्त होण्यापूर्वीच ते त्याचे दाणे निर्माण करून आपले जीवनचक्र पूर्ण करते. सिक्कीमच्या शेतकऱ्यांनी वातावरण बदलावर शोधलेले हे उत्तर अन्य ठिकाणी निश्‍चितच अनुकरणीय आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे धान्य अतिशय उपयुक्त आहे. गहू वाणाच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण अधिक (१२ टक्के) आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याचा रक्तामधील साखर नियंत्रण करण्याचा त्याचा गुणधर्म. गिरणी अथवा कांडप प्रक्रियेमध्ये याचे साल पूर्ण निघत नसल्याने पीठ मात्र काळसर असते. अर्थात, म्हणूनच त्याचे औषधी गुणधर्मही जास्त आहे. बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या न्याहरीच्या पदार्थात याचा वापर आढळतो. हे धान्य थंड प्रदेशात उत्पादन देते, हे मात्र आपण लक्षात ठेवले पाहिजे. सिक्कीममधील शेतकऱ्याची सकाळची न्याहरी ‘बकव्हीट’ची खिचडी आणि दोन संत्री यावर पूर्ण होते. अशा आरोग्यपूर्ण अन्नातूनच आनंदाचा निर्झर वाहत असतो. विलायची आधारित शेती पद्धती या प्रकारात मोठी विलायची हे मुख्य पीक समजले जाते. शेतात मोठ्या वृक्षाची लागवड करून त्याच्या छायेखाली विलायची लावली जाते. या पद्धतीमध्ये ६० टक्के जागा वृक्षांना आणि ४० टक्के विलायचीला दिली जाते. सिक्कीम मध्ये विलायची आधारित शेतीमध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो. लागवड, काढणी, प्रतवारी, पॅकिंग ही सर्व कामे स्त्रियाच करतात. स्त्रियांच्या हस्ते लावलेल्या विलायचीचा सुगंध उच्च दर्जाचा असतो, असे इथले शेतकरी समजतात. प्रत्येक हाताळणीमध्ये स्त्रियांचा नाजूक सहभाग या उत्पादनास उच्च भाव देऊन जातो. विलायचीची लागवड करताना स्त्रिया सुंदर गाणी म्हणतात. गाण्यातील शब्दांचा अर्थ विचारला तर तो होता - ‘‘भरपूर उत्पन्न दे ग बाई!’’ वातावरण बदलाशी सकारात्मक झुंज घेताना निसर्गाचा सन्मान करत सिक्कीमने सेंद्रिय विलायची उत्पादनात जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त केला आहे. याच वातावरण बदलामुळे केरळमधील विलायचीचे उत्पादन २०१८ मध्ये रसातळाला गेले होते. कारण त्यावर्षी केरळमधील सर्व नद्या कोपल्या होत्या, मोठमोठे कडे कोसळले होते. विलायची उत्पादक पूर्ण हतबल आणि उध्वस्त झाला होता. त्याच वर्षी सिक्कीममध्ये या पिकाने सर्व विक्रम तोडून राज्याला एक वेगळाच सन्मान दिला होता. वातावरण बदलामध्ये निसर्गापुढे नतमस्तक होत, त्याचा आदर राखत शेती केली तर तुम्हास कधीही खोट येणार नाही. सिक्कीम हे त्याचे सुंदर उदाहरण आहे. वन संवर्धनावर आधारित शेती यामध्ये उपयोगी लाकूड देणाऱ्या वृक्षांची लागवड करतात. यात आंतरपीक म्हणून चार पिकाबरोबरच विलायची आणि अननस घेतले जाते. शेतकरी असल्याचा अभिमान... सिक्कीममध्ये सध्या पावसाचे चढ उतार पहावयास मिळतात. तापमान सरासरी १८ अंश सेल्सिअस असले तरी गेल्या दशकापासून त्यात वाढ सुरू आहे. इथे थंडीसुद्धा कडाक्याची पडते. हवामान बदलास या राज्याने स्वीकारलेले आहे. कोणत्याही अनैसर्गिक गोष्टीला येथील शेतकरी थारा देत नाही. उदा. रासायनिक शेतीस बंदी, कुऱ्हाड बंदी करून चराऊ कुरणांना प्राधान्य, प्लॅस्टिक बंदी इ. शेतीला पूरक म्हणून जंगल संवर्धन, पाण्याचा सन्मान आणि सेंद्रिय शेती पद्धतीत पारंपरिक बी-बियाणे अशा अनेक मोलाच्या गोष्टी ते करतात. यातील एक तरी गोष्ट आपण करतो का? सिक्कीममधील शेतकरी कधीही स्थलांतर करत नाही. या राज्याचा औद्योगिक विकास फार कमी आहे. मात्र पर्यटनाचा व्यवसाय प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्यांची शिकलेली मुले शेती सांभाळून हा व्यवसाय करतात. त्यांची ओळख करून देण्याची पद्धतीही शेतीविषयी अभिमानाची आहे. ‘‘मी येथील स्थानिक शेतकरी असून, तुमचा प्रवासी मार्गदर्शक आहे.’’ या राज्यात घड्याळनिर्मिती व दुरुस्ती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. गंगटोकला एका घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात मी गेलो असता तिथे एका मोठ्या टोपलीत अननस विक्रीला ठेवलेले होते. त्या तरुणाशी बोलताना अननस शेती आणि विक्री हा प्रथम व्यवसाय, तर घड्याळ दुरुस्ती त्याचा दुय्यम व्यवसाय असल्याचे सांगितले. शेतकरी असल्याचा त्याचा अभिमान शब्दात जाणवत होता. असा शाश्‍वत शेती व्यवसाय पाहिल्यावर मला क्षणभर तेथे वातावरण बदलाचे घड्याळ बंद पडल्याचा भास झाला होता. सिक्कीममध्ये तब्बल पाच ऋतू आहेत. त्याला अनुसरून पाच प्रकारची शेती केली जाते. सिक्कीमला रानफुलांचे राज्य असेही म्हणतात. येथील जंगलात ५००० विविध प्रकारची फुले आढळतात. त्यात ५१५ प्रकारचे ऑर्किड (आमरी), ९०० औषधी वनस्पती आणि २३ बांबूच्या प्रजाती आहेत. सिक्कीम हे आमरीच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सिक्कीममधील पर्वत पायऱ्यावरील उतरती शेती मन मोहून टाकते. फिलिपिन्समधील अशाच शेतीला युनेस्कोने ‘वारसा स्थळ’ म्हणून नोंदलेले आहे. सिक्कीममधील शेती फिलिपिन्स शेतीची प्रतिकृतीच वाटते. पर्वतराजीमधील वाहत्या नद्या, डोंगर उतारावरील चराऊ कुरणे, भात शेतांच्या विविध अवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे १०० टक्के सुदृढ निसर्गात, वृक्ष, पाने, फुले यांच्याशी बोलत सेंद्रिय शेती करणारा शेतकरी म्हणजे स्वर्गाच्या पायऱ्याच नव्हे काय? वातावरण बदलाच्याच काय पण आयुष्यातील साऱ्या चिंता, ताण विसरायला लावण्याची या हरितपायऱ्यांची क्षमता आहे. तुम्हाला क्षणात आनंद देणाऱ्या या निसर्गाने सिक्कीमच्या शेतकऱ्याला आनंदी केले नसेल तरच नवल!  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com