कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्ये

कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्ये
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्ये

मागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी यांनी आपली आचार्य पदवी अमेरिकेत डॉ. वॉक्‍समन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. त्यांनी अॅग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र) या नावाचे एक पुस्तक इंग्रजीतून लिहिले आहे. त्या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबींचा परिचय करून घेऊ. अॅग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र) या डॉ. रंगास्वामी लिखित व १९६५ साली एशिया पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित पुस्तकातील एका परिच्छेदाचे भाषांतर पाहू. ‘‘वनस्पतीच्या गरजेची अन्नद्रव्ये जमिनीत क्‍लिष्ठ स्वरूपात साठविली जातात, की ना ती सहज पाण्यात विरघळतात, ना ती सहज पिकाला उपलब्ध होतात. रंगास्वामी लिहितात, सहज उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये झटकन निचऱ्यावाटे जमिनीबाहेर निघून जाऊ शकतात. अशा परिस्थितीत जमिनीची उत्पादन क्षमता अशा उपलब्ध अन्नद्रव्यावर अवलंबून नसते, तर वाढणाऱ्या वनस्पतीच्या गरजेनुसार स्थिर साठ्यातून जलद उपलब्ध साठ्यात रूपांतर करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जमिनीतील अनेक सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.’’ वरील परिच्छेदात प्रचंड अर्थ भरला आहे. त्याचे चिंतनातून अनेक पारंपरिक विचारांना मूठमाती द्यावी लागेल. १९६५ साली मांडलेल्या या विचारांवर शेती शास्त्रात आजही फारसा विचार केला जात नाही. अजूनही आपण मातीच्या रासायनिक पृथक्करण करण्याची शिफारस करतो. मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये मोजून खतांच्या शिफारसी फक्त करतो. अन्नद्रव्यांच्या स्थिरीकरण - उपलब्धीकरणाबाबत अवाक्षरही काढत नाही. त्यातील सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे स्वतः लेखक अखिल भारतीय मृद-रसायन शास्त्रज्ञांच्या संस्थेचे (अलाहाबाद) काही काळ अध्यक्ष असूनही त्यांचे विचार शास्त्रीय जगतात उतरू शकले नाहीत. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ मृद्‌शास्त्रज्ञ डॉ. गो. का. झेंडे (पुणे) वरील संस्थेचे अध्यक्ष झाले. निवृत्तीनंतर त्यांची व माझी अनेक वेळा चर्चा झाली. परंतु, शेवटपर्यंत त्यांनी स्थिरीकरण - उपलब्धीकरणाची संकल्पना मान्य केली नव्हती. याच मताशी आजचे बहुतेक शास्त्रज्ञ चिकटून आहेत. शास्त्रीय जगतातील या अमान्यतेचा कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष परिणाम काय झाला? त्याचे उत्तर - पहिल्या १५-२० वर्षे उत्पादनाचे विक्रम करणाऱ्या हरित क्रांती उत्तर काळात अपयशी ठरली याची कारणमीमांसा आजही आपण योग्यप्रकारे करू शकलेलो नाही. रासायनिक खताचा वापरही शेतीतील सर्वांत खर्चिक ठरत आहे. त्यात ती भारतात तयार होत नसल्याने प्रचंड परकीय चलन खर्चून आयात करावी लागतात. सरकार त्यावर मोठे अनुदान देत असल्याने खतांच्या किमती शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीच्या आवाक्‍यात राहतात. वास्तविक खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रबोधन व्हायला हवे. मात्र, ते होताना दिसत नाही. या पुस्तकातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि चिंतन करण्यायोग्य मुद्दे देत आहेत.

 • जमिनीतील सुक्ष्मजीवांच्या अनेक कायिक रासायनिक क्रिया-प्रक्रियामुळे वनस्पतीची अन्नद्रव्ये गुंतागुंतीच्या स्वरूपातून हळूहळू उपलब्ध स्वरूपात येतात. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेसंबंधी विचार करावयाचा झाल्यास सुक्ष्मजीव हेच प्रमुख घटक ठरतात. त्यांच्या क्रिया-प्रक्रिया जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असतात.
 • खडकाची बारीक भुकटी आणि पिकाऊ जमीन यांतील प्रमुख फरक म्हणजे सुक्ष्मजीवांची उपस्थिती. या उपस्थितीमुळे जमिनीला पिकाऊ ताकद मिळते.
 • जमिनीच्या पृष्ठभागावरील ३० सें.मी. मातीच्या थराचा विचार केल्यास यात १% सुक्ष्मजीव असतात. प्रति ग्रॅम त्यांची संख्या १ ते २० लाखांपर्यंत असू शकते. एक एकर क्षेत्रातील वरच्या ३० सें.मी. मातीच्या थरातील सुक्ष्मजीवांचे वजन अंदाजे ३०० ते ४०० पौंड (१३६ ते १८१ किलोग्रॅम) इतके भरू शकते.
 • फेरपालटाच्या वेगवेगळ्या पिकांचा जमिनीत वाढणाऱ्या सुक्ष्मजीवांवरही वेगवेगळा परिणाम होतो. तसेच जमिनीत टाकलेल्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांचा सुक्ष्मजीवावरही वेगवेगळा परिणाम होतो. तंतूमय आणि सोटमुळाच्या वाढीचे परिणामही वेगवेगळे असतात.
 • उन्हाळ्यात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतात. त्या वेळी खोलवर हवा खेळती राहाते. अशावेळी खालचे थरातील जिवाणू कार्यरत होतात.
 • हिरवळीच्या खतामुळे सर्व प्रकारच्या जिवाणूंची संख्या तर वाढतेच, त्याचबरोबर जमिनीचा पोत, जडणघडण, सेंद्रिय कर्बाची टक्केवारी, ह्यूमस वगैरे सुपीकतेसंबंधित सर्व घटकांमध्ये सुधारणा होते.
 • काही ठिकाणी काटक्‍याकुटक्‍यांचा थर देऊन पेरणीपूर्वी जाळतात. (उदा. भातशेतीतील राब) अशा वेळी जमिनीचे काही अंशी निर्जंतुकीकरण होते. त्यामुळे प्रोटोझुआसारखे जादा तापमानाला बळी पडणारे एकपेशीय जीव मरतात.
 • कोवळ्या वनस्पतीत जून वनस्पतीच्या तुलनेत तंतूमय पदार्थ निम्मेच असतात, तर पाण्यात विरघळणारे पदार्थ कोवळ्या वनस्पतीत दुप्पट असतात.
 • सुक्ष्मजीवांच्या पेशीमध्ये वनस्पतीच्या पेशीद्रव्याच्या तुलनेत नत्राचे प्रमाण बरेच अधिक असते. त्यामानाने कर्बाचे प्रमाण नगण्य असते. मृत सुक्ष्मजीवांच्या पेशी हे वनस्पतीच्या अन्नद्रव्याचे कोठार आहे. वनस्पती कर्ब हवेतून घेतात, तर हा कर्ब सुक्ष्मजीवासाठी उर्जास्रोत ठरतो. यामुळे सुक्ष्मजीवांना अंगात कर्ब साठवण्याची गरज नसते.
 • रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीतील सुक्ष्मजीवांच्या कार्यात वाढ होते. याला कारण त्यांचे स्थिरीकरण व उपलब्धीकरण या कार्यात सुक्ष्मजीवांचा सहभाग असतो.
 • सुधारित शेतीत रासायनिक खतांच्या वापरामुळे सुक्ष्मजीवाचे कार्य मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी, मूळ सेंद्रिय पदार्थांच्या साठ्यात घट होत जाते. जितके उत्पादन जास्त घ्याल, तितका सेंद्रिय कर्बाचा जास्त जास्त वापर केला जातो.
 • त्या प्रमाणात सेंद्रिय खत जास्त टाकणे गरजेचे ठरते. नेमके इथेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते व उत्पादकता घटत जाते.
 • जैविक नत्र स्थिरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उर्जास्रोताची गरज असते. जी सेंद्रिय कर्ब जाळून भागविली जाते. (यावर यापूर्वी चर्चा केली आहे.)
 • हैड्रोसायनिक अॅसिड या ज्वारीच्या मुळातून स्रवणाऱ्या विषारी पदार्थांचे सेवन अॅस्परजिलस या सुक्ष्मजीव करतात. त्यामुळे या मुळाभोवती उपयुक्त सुक्ष्मजीवांची वाढ नैसर्गिकरित्या होऊ शकते.
 • मायकोरायझा या उपयुक्त बुरशीची वाढ ताजे सेंद्रिय पदार्थ व हवा यांच्या उपस्थितीत चांगली होते.
 • असे अनेक चांगले संदर्भ या १९६५ साली प्रकाशित पुस्तकातून मिळतात. त्या वेळी हरितक्रांतीला नुकतीच सुरवात झालेली होती. त्या वेळी केवळ उत्पादन वाढीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रासायनिक खतांचा वापर आणि नव्या सुधारित जाती यातून यशाकडे वाटचाल होत होती. अगदी लेखकालाही पुढे येऊ घातलेल्या हरितक्रांतीच्या अपयशाची चाहूल लागलेली नसेल किंवा अशी कोणी वाच्यता जरी केली, तरी त्याला मुर्खात काढले गेले असते. मात्र, या पुस्तकातील अशा काही निवडक संदर्भावर चिंतन केल्यास पुढे घडलेल्या अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. ही सुक्ष्मजीवशास्त्राची पुस्तके ५०-६० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली आहेत. बहुतेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच ही शास्त्रीय व तांत्रिक इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील तत्त्वे, मुद्दे केवळ इंग्रजी येते म्हणून सर्वांनाच समजतील असे नाही. प्रत्येक मुद्द्याचे चिंतन करून प्रत्यक्ष शेतामध्ये, जमिनीच्या सुपीकतेसाठी कशाप्रकारे राबवायचे याचा विचार व्हायला हवा. सामान्य शेतकऱ्यांसाठी काही मुद्दे दिले आहेत. ते उपयोगी ठरतील असे वाटते.

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com