अनुकुलतेनुसार करा रासायनिक खतांचे नियोजन

विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा वापर करताना कोणती दोन खते एकत्र मिसळायची किंवा नाहीत याची माहिती घ्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन केल्यास पिकाला योग्य प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता होते.
अनुकुलतेनुसार करा रासायनिक खतांचे नियोजन
अनुकुलतेनुसार करा रासायनिक खतांचे नियोजन

पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक तसेच जमिनीतील जैविक विविधता यावर खताची उपलब्धता अवलंबून आहे. खते फेकून टाकल्यास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम खर्चात वाढ आणि उत्पादन कमी मिळते. ठिबक सिंचनाद्वारे ठरावीक दाब आणि एकसमान पद्धतीने पिकाच्या मुळांच्या कक्षेत आवश्यकतेनुसार पाणी आणि विद्राव्य खते देता येतात. जर १०० लिटर पाण्यात एक किलो युरिया खत मिसळल्यास सदर मिश्रणात नत्र एकसारखे मिसळले जाते. असे १०० लिटर मिश्रण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिल्यानंतर पूर्ण क्षेत्रावर जेवढे ड्रीपर आहेत, त्या प्रत्येक ड्रीपरमधून एकसारखेच नत्र जमिनीत प्रत्येक पाण्याच्या थेंबासोबत मुळांच्या कक्षेत जाते. ठिबक सिंचनामुळे पाण्यासोबत नत्र व त्याप्रमाणे स्फुरद, पालाश, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मुळ्यांच्या कक्षेत लवकर पोहोचते. पाण्याचा आवश्यकतेनुसार योग्य वापर व त्यासोबत विद्राव्य खते वापरल्यास ८० टक्के व त्यापेक्षा जास्त पोषण घटक उपलब्ध होतात. ठिबक सिंचनाद्वारे विविध अन्नद्रव्ये देता येतात. आपल्याकडे विविध प्रकारची विद्राव्य खते उपलब्ध आहेत. या खतांचा वापर करताना कोणती दोन खते एकत्र मिसळायची नाहीत आणि कोणती एकत्र मिसळायची याची माहिती घ्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन केल्यास पिकाला योग्य प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. यालाच खतांची अनुकूलता म्हणतात. रासायनिक खत अनुकूलतेनुसार व्यवस्थापन  १) रसायनशास्त्राच्या नियमानुसार कोणतीही दोन रसायने एकत्र मिसळल्यानंतर तिसरे रसायन तयार होते. हा नियम विद्राव्य खते पाण्यात विरघळून देताना लागू होतो. जसे की, युरिया खत अमोनिअम कॅल्शिअम नायट्रेट, पोटॅशिअम क्लोराईड (पांढरा MOP) सोबत मिसळू नये. ही दोन्ही खते एकत्र मिसळल्यावर साका तयार होतो आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. २) कॅल्शिअम नायट्रेट आणि २०:२०:२० किंवा १२:६१:०० या प्रकारची स्फुरद युक्त खते एकत्र टाकीत मिसळल्यास कॅल्शिअम व फॉस्फेटची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शिअम फॉस्फेट तयार होतो. जो पाण्यात अविद्राव्य असल्याने फिल्टरमध्ये अडकतो. त्यामुळे खत पिकाला उपलब्ध होत नाही. ३) पिकाची जोमाने वाढ होण्यासाठी स्फुरद खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तसेच पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी फवारणीसाठीचे मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत स्फुरद खतासोबत मिसळून दिले जाते. यामुळे दोन्हींच्या मिश्रणाने साका तयार होतो. जो स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी करते. म्हणून ही दोन खते एकत्र मिसळू नयेत. ४) युरिया खत जर इतर अनुकूल खतांसोबत पाण्यात विरघळून खतांचे द्रावण केल्यावर ताबडतोब ठिबक सिंचनाद्वारे देणे आवश्यक आहे. ५) पोटॅशियम क्लोराईड (पांढरा पोटॅश) व सल्फेट ऑफ पोटॅश हे दोन्ही इतर बऱ्याच खतांसोबत मिसळून देता येतात. ६) युरिया व कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट सोबत मिसळू नये. ७) नत्रयुक्त खते पोटॅश खतांसोबत वापरू नये. ८) स्फुरद खते वापरताना सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत मिसळू नये. ९) नत्रयुक्त खत गंधक खतांसोबत वापरल्यास पीक वाढीसाठी चांगला फायदा होतो. १०) नत्रयुक्त खते व सूक्ष्म अन्नपोषण सोबत मिसळता येतात. ११) स्फुरदयुक्त खते शक्यतो स्वतंत्र वापरावीत इतर खतांसोबत मिसळू नये. शेतकऱ्यांनी स्वतः अनुकूलता किंवा विसंगती तपासणीची पद्धत  १) खते एकत्र मिसळण्यापूर्वी बादलीत एक लिटर पाणी मोजून घ्यावे. खते देण्याच्या प्रमाणातील एक लिटर प्रमाणातील हिस्सा बादलीतील पाण्यात दोन्ही प्रकारचे खत मोजून एकत्र मिसळून त्यांची अनुकूलता तपासावी. २) जर पांढरा / रंगीत साका तयार झाल्यास खते विसंगत असून ती दोन खते एकत्र मिसळू नये. ३) जरी ठिबक सिंचनाद्वारे खते देता येत असली तरी त्यांची रासायनिक संरचना बदलून त्यातील प्रमुख घटकांची पिकांकरिताची उपलब्धता कमी झालेली असते, म्हणून फक्त अनुकूल (पूर्ण विरघळलेली व पांढरट साका न झालेली) खते मिसळून वापरावीत. ४) विसंगत (एकत्र मिसळल्यावर पांढरा साका झालेली) खते एकत्र न मिसळता वेगळ्या पाण्यात विरघळवून ठिबक सिंचनाद्वारे वापरावीत. ५) वरील खतांनुसार तपासणीच्या प्रयोगाची नोंद ठेवून त्यानुसार अनुकूल व विसंगत खताची यादी करावी. खतांची पाण्यात विरघळण्याची उच्चतम क्षमता  पाण्याचे (डिस्टिल्ड वॉटर) तापमान २० अंश सेल्‍सिअस असेल, तर १०६० ग्रॅम युरिया एक लिटर पाण्यात विरघळतो. पाण्याचे तापमान २५ अंश सेल्‍सिअस असल्यास १२०० ग्रॅम युरिया लिटर पाण्यात विरघळतो. याप्रमाणे सोबत खतांच्या पाण्यात विरघळण्याची क्षमता (प्रमाण) कमी होते. यासाठी पाणी परीक्षण करून, पाण्याच्या प्रतीनुसार खतांचे प्रकार आणि प्रमाणाचे नियोजन केल्यास अन्नद्रव्ये पिकांना जास्तीत जास्त उपलब्ध होते. रासायनिक खतांचे प्रकार  प्रमुख : नत्र, स्फुरद आणि पालाश दुय्यम : कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधक सूक्ष्म :  लोह (फेरस), जस्त (झिंक), मंगल (मँगेनीज), तांबे (कॉपर), बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरिन. १) प्रमुख, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही बाजारात विविध प्रकारांत खतांच्या स्वरूपात विद्राव्य स्थितीत उपलब्ध आहेत. या खतांची अनुकूलता व विसंगती तपासून ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करावे. २) ही खते पिकांच्या परिपूर्ण वाढीसाठी उपलब्ध केल्यास पिकाची वाढ, फुलधारणा, फळधारणा, योग्य वेळी भरपूर प्रमाणात होऊन दर्जेदार उत्पादन कमी खर्चात मिळते. ३) पिकांमध्ये रोग-कीड प्रतिकारशक्ती वाढल्याने कीटकनाशक, बुरशीनाशक फवारण्या कमी होऊन खर्चात बचत होते. संपर्क ः विजयकुमार सरूर, ९५४५५५२९८८ (लेखक कोठारी अ‍ॅग्रीटेक प्रा. लि. येथे चीफ ॲग्रॉनॉमिस्ट आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com