
पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक व सेंद्रिय खताद्वारे केला जातो. सुरवातीला त्यांची संख्या १६ होती, त्यात आणखी काही मूलद्रव्यांची भर पडली. ती अन्नद्रव्ये रासायनिक सूत्रानुसार ओळखली जातात. उदा. नत्र (N), स्फुरद(P२O५), पालाश(K२O) वगैरे. पिकातील रासायनिक खत व्यवस्थापन हा भाग कृषी रसायनशास्त्र विभागाकडून हाताळला जातो, यातही काही चूक नाही. एखाद्या अन्नद्रव्याची एखाद्या पिकासाठीची गरज आणि ती पुरवण्यासाठी किती रासायनिक खत द्यावयाचे, याचे पृथःकरण आणि गणिते रसायनशास्त्राशिवाय करताच येणार नाहीत. मी कृषी पदवीधर होऊन शेतीला सुरुवात केल्यानंतर या विषयाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. कारण पिकांचे योग्य पोषण केल्यास उत्तम उत्पादन मिळेल. प्रामुख्याने या शास्त्र शाखेच्या ग्रंथासोबत कृषी विभागाची माहिती पत्रके यावरच खताचे हप्ते देत असे. पहिल्या १५-२० वर्षांत उत्तम उत्पादन मिळाल्याने या तंत्रावर ठाम विश्वास बसला होता. मी शेती करण्यापूर्वी वडिलांच्या काळात रासायनिक खताबरोबर तितक्याच वजनाची भुईमूग पेंड (तेलमुक्त) टाकण्याची प्रथा होती. मात्र, १९७०-७५ या काळातील एका प्रयोगाचे निष्कर्ष शास्त्रज्ञांनी जाहीर केले. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर सलग तीन वर्षे फक्त रासायनिक खत, रासायनिक खत + ५०% भुईमूग पेंड अशा वापराचे प्रयोग झाले. त्यातून उत्पादन व उत्पादन खर्चाचा विचार करता सर्वांत जास्त निव्वळ नफा फक्त रासायनिक खत मात्रेच्या वापरातून होत असल्याचे निष्कर्ष मांडले हाते. भुईमूग पेंडीचा वापर बंद करून फक्त रासायनिक खतांचाच वापर करावा. हा प्रयोगा सुचवला होता. या निष्कर्षाशी वडील अजिबात सहमत नसले, तरी पुढे मला आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीचा विचार करता पेंडीचा वापर बंद करावा लागला. कृषीची पदवी घेऊन मुलाला शेतकरी करण्याची वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला मलाही चांगले उत्पादन मिळत गेल्याने त्यांनी हळूहळू शेतीतून अंग काढून घेतले. आर्थिक प्राप्ती वाढल्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. १५-२० वर्षांनंतर उत्पादन पातळी घसरायला लागली. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत होऊ लागली. घरची उत्तम वापश्याची जमीन, समृद्धीचे काळात केलेल्या उत्तम पाणीपुरवठ्याच्या सुविधा, मशागतीची स्वतःची साधने, फवारणीची साधने अशा गरजेच्या सर्व यंत्र सामग्रीची रेलचेल, अभ्यासूवृत्तीपासून सर्वकामे वेळच्या वेळी करूनही आता उत्पन्नाचा आलेख काही सुधारत नव्हता. हा सर्व इतिहास वाचकापुढे मी मुद्दाम ठेवीत आहे. तमिळनाडूच्या एका संशोधन केंद्राने प्रसिद्ध केलेला ऊसशेतीवरील ग्रंथ मी मागवला. त्यात झाडाच्या खाली जमिनीत मुळांचा पसारा दाखवतानाच केशमुळाभोवती ठिपक्यांच्या स्वरूपात सूक्ष्मजीव दाखवले होते. ते वनस्पतीच्या अन्नद्रव्य पोषणाच्या कामात मदत करतात, इतकाच त्रोटक उल्लेख होता. या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाच्या उद्देशाने मी सूक्ष्मजीवशास्त्राकडे वळलो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख असा एक इंग्रजी ग्रंथ मिळाला. त्यातून केशमुळाभोवतीच्या सूक्ष्मजीव गटाला रायझोस्फिअर असे म्हणतात. या गटात जीवाणू, ऍक्टिनोमायसेट्स व बुरशी अशा तीन प्रकारातील अगणित सूक्ष्मजीवांचे वास्तव्य असते.
आता या तंत्राविषयी आणखी खोलात जाऊन माहिती घेऊ.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.