पानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला

त्वरित करा पानवेलीची उतरण
त्वरित करा पानवेलीची उतरण
Published on
Updated on

पानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला समजला जातो. म्हणजेच मार्च ते मे या कालावधीमध्ये उतरण केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळ्यात चांगली राहते. अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. आणि ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी. पानवेल हे बहुवार्षिक वेलवर्गीय पीक आहे. एका वर्षात पानवेलीची अंदाजे ४ ते ५ मीटर वाढ होते. पानवेल उंच वाढल्यानंतर वेलीची पाने खुडणे बरेच त्रासाचे होते. शिडीवरून पाने खुडण्यासाठी व वेलबांधणीसाठी जादा मजुरी द्यावी लागते. त्यासाठी पानवेलीची दरवर्षी उतरण करावी. पानवेल उतरणीचे फायदे :

  • पानवेलीची वेळीच उतरण न केल्यास उत्तम प्रतीची पाने निर्माण करण्याची वेलीची क्षमता कमी होते. तसेच वादळी वाऱ्याने किंवा गारांच्या वर्षावाने पानांचे व वेलींचे तुटण्याचे प्रमाण जास्त होते. उतरण केल्याने हे टाळता येते.
  • पानवेलींची उतरण केल्यानंतर जमिनीत गाडलेल्या वेलीच्या कांड्यामधून नवीन मुळ्या फुटतात. पानवेल पूर्ववत जोमदार आणि टवटवीत होते. उत्तम प्रकारची पाने निर्माण करतात.
  • पानवेलीची पहिल्या वर्षी एकच वेल सरळ वाढते. उतरणीच्यावेळेस संपूर्ण वेल सोडून ळ या अक्षराची चुंबळ करून २/३ भाग जमिनीत तर १/३ भाग जमिनीच्यावर ठेवून गाडली जाते. त्यामुळे वेलीच्या कांड्यावरील गाठींना ताण बसून त्यामधून नवीन अंकूर किंवा फुटवे फुटतात त्यांना पाळे असे म्हणतात. नवीन पाळे मुख्य वेलीपेक्षाही जोमाने वाढतात. त्यामुळे एका वेलीचे दुसऱ्या वर्षी ३ ते ४ वेल तर तिसऱ्या वर्षी दुसऱ्या उतरणीनंतर ७ ते ८ वेल होतात आणि उत्पादन वाढते.
  • पानवेल उतरण करताना घ्यावयाची काळजी :

  • नवीन लावलेल्या पानवेलीची उंची पहिल्या वर्षी १ ते २ मीटरपर्यंत वाढते. त्यांची उतरण फेब्रुवारी ते मे या महिन्यात केली जाते. त्याला मुळ्या तोडणे असेही म्हणतात.
  • पानवेलीच्या आधारासाठी जी शेवरी, शेवगा व पांगारा यांची झाडे लावलेली असतात त्यांची मुळे पानवेलीच्या मुळांना त्रासदायक होऊ नयेत यासाठी वाफ्याच्या लांबीच्या बाजूने २० सें.मी. खोल व १५ सें.मी.रुंद चर काढावा. अाणि त्या चरामध्ये येणाऱ्या झाडाच्या मुळ्या नरकतीने कापून काढाव्यात. पानवेलीच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तोडलेल्या मुळ्या तेथेच पडू न देता पानमळ्याबाहेर टाकून नष्ट कराव्यात. अन्यथा पानमळ्यात सुत्रकृमी वाढण्यास मदत होते.
  • पानवेलीची उतरण मार्च ते मे या कालावधीमध्ये केव्हाही केली तरी चालते. ज्या पानमळ्यातील पानांची प्रत उन्हाळयात चांगली राहते अशा शेतकऱ्यांच्या जुनवण्याच्या पानांना दर चांगला मिळतो. त्यांची उतरण मेमध्ये करावी. ज्या पानमळ्यात पाने उन्हाळ्यापर्यंत चांगली टिकत नाहीत, हिवाळ्यातच टोकाकडून करपतात अशा शेतकऱ्यांनी त्वरित उतरण करावी.
  • उतरण करण्यापूर्वी डोंगराच्या पायथालगतची किंवा कोरडवाहू जमिनीतील हेक्टरी १०० ते १५० ब्रास माती टाकून केडक (वाफा) आणि कालवे भरुन घ्यावेत. माती तांबडी भुरकट कसदार व उन्हात चांगली तापलेली असावी. तसेच भर टाकावयाच्या मातीचा निचरा चांगला व्हावा. मातीची भर टाकल्यानंतर पाण्याच्या दोन हलक्या पाळ्या द्याव्यात.
  • पानवेलीवरील विक्रीस योग्य अशी पाने खुडून बाजारात पाठवावीत. कीड व रोगग्रस्त खराब पाने खुडून पानमळ्याबाहेर टाकून नष्ट करावीत.
  • वाळलेल्या शेवरीची जमिनीतील खोडके, पानमळ्यातील रोगट ,मलुल, सडलेल्या, मेलेल्या वेलींच्या चुंबळी गाेळा करुन बागेबाहेर काढून जाळून नष्ट करावा. तसेच पानमळ्यात पडलेला सर्व रोगट पालापाचोळा गोळा करुन तोही जाळून नष्ट करावा. पानमळा अगदी स्वच्छ करावा.
  • पानमळ्यातील सावली कमी करावी अाणि जमीन तापू द्यावी.
  • उतरण करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर हलके पाणी द्यावे. म्हणजे उतरण करतेवेळी जमिनीस चांगला वाफसा येईल. त्यामुळे चर खोदणे सोपे जाते. ढेकळे निघत नाहीत.
  • उतरणीपूर्वी वेलीवर कीड आणि रोग दिसून आल्यास पुढील वर्षी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी करावी. त्यासाठी थायामिथोक्झाम ४ ग्रॅम  प्रतिलिटर पाण्यात मिसळून वेलीवर फवारणी करावी. पानवेल संपूर्ण निरोगी असल्यास फवारणीची गरज नसते.
  • उतरणीच्या दिवशी सकाळी पानवेल आधाराच्या झाडावरून काळजीपूर्वक सोडवून घ्यावेत. वेल सोडविताना आधाराच्या झाडांना आणि वेलींना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेल एकाच दिशेने वेलाचा शेंडा मोडणार नाही अशाप्रकारे केडक व कालव्यामध्ये टाकावी. रोगट, मलुल तसेच मेलेले वेल काढून टाकावेत. तसेच आधाराच्या झाडावर सुकलेले आणि चिकटून बसलेले वेल पानमळ्याबाहेर काढून जाळून टाकावेत.
  • उतरणीसाठी काढलेल्या चरामध्ये येणाऱ्या शेवरी आणि पानवेलीच्या सुत्रकृमीग्रस्त मुळ्या काळजीपूर्वक नरकतीने कापाव्यात. त्या पानमळ्याच्या बाहेर नेऊन त्यांचा नाश करावा. त्यामुळे सुत्रकृमीचे जमिनीतील प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • खोदलेल्या चरामध्ये शेणखत व रासायनिक खतांची मात्रा टाकावी. त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ बैलगाड्या (३-५ टन) कुजलेले शेणखत चाळून त्यामध्ये २ टन निंबोळी पेंड, २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र चांगले मिसळून घ्यावे. उतरणीपूर्वी चरामध्ये प्रत्येक वाफ्याला एक पाटी याप्रमाणात हे खतमिश्रण टाकावे.
  • उतरण करीत असताना तांबडे, कमकुवत, काळे ठिपके पडलेले, कमी फांद्या असलेले, मंढ पडलेले वेल काढून टाकावेत.
  • अत्यंत अनुभवी माणसांकडूनच उतरण करून घ्यावीत; अन्यथा वेलांची चुंबळ करीत असताना वेलीवरील साल तडकते. त्यामधून बुरशीचा शिरकाव होऊन वेल मरण्याची शक्यता असते.
  • वेलीची ळ आकाराची चुंबळ करून २ भाग चुंबळ जमिनीत चरामध्ये; तर १ भाग चराच्या बाहेर ठेवून हलकीशी मातीने दाबावी. वेलीच्या शेंड्याकडील ६० ते ७५ सें.मी. भाग जमिनीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. ज्या भागात उष्णता जास्त असते किंवा पानमळ्यात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्या ठिकाणी उतरण जमिनीच्या वर करावी. म्हणजे उतरलेल्या वेलीच्या चुंबळीची खालील बाजू ५ ते ७ सें.मी. जमिनीत चरात दाबावी. इतर सर्व चुंबळ जमिनीच्यावर राहील अशा रीतीने बांधावी. नंतर १ महिन्याने त्यास शेणखत अाणि मातीचा थर वाफ्यातीलचा लावावा. म्हणजे मुळ्या फुटण्यास मदत होते.
  • उतरण झालेले वेल त्याच दिवशी बांधून घ्यावेत. व त्याचदिवशी हलकेसे पाणी द्यावे. उतरण झाल्यानंतर ३ ते ४ वेळा हलके; परंतु कमी दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पानमळ्यातील ज्या भागात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या ठिकाणी चुंबळीवर १ टक्के बोर्डोमिश्रण (१ किलोग्रॅम मोरचूद अधिक १ किलोग्रॅम कळीचा चुना अधिक १०० लिटर पाणी) प्रतिवाफ्यात ५ लिटर याप्रमाणात चुंबळीवर ओतावे.
  • उतरण झालेल्या पानमळ्यातील सावली कमी करावी. जमीन तापू द्यावी. म्हणजे पाने जोमदार वाढतात.
  • उतरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी :

  • उतरण झाल्यानंतर कधी कधी स्क्लेरोशियम नावाच्या पांढऱ्या बुरशीची चुंबळीवर वाढ होऊन वेल मरण्याची शक्यता असते. स्क्लेरोशियम बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास जमिनीत पुरलेल्या चुंबळी वर काढून ठेवाव्यात. पाण्याच्या ताण पडू देऊ नये. जमीन सतत ओलसर राहिल याची काळजी घ्यावी. पाणी भरत असताना पायाने ढवळा मारण्याचे टाळावे. त्यामुळे बुरशी सर्व वेलीवर विखुरण्याची शक्यता असते. बुरशीग्रस्त वेल चुंबळीसह आणि आजूबाजूच्या बुरशीग्रस्त मातीसह पानमळ्याबाहेर काढून नष्ट करावीत.
  • बुरशीग्रस्त पानमळ्यात १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून प्रत्येक वाफ्यात ५ लिटर याप्रमाणात चुंबळीवर ओतावे. आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांनी परत एकदा द्रावण चुंबळीवर ओतावे.
  • संपर्क ः संदिप डिघुळे, ९४२२७०९२५५ (पानवेल संशोधन योजना, जळगाव.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com