वनशेतीसाठी उपयुक्त शिवण

शिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड, कागद लगदा, प्लायवूड, लाकूड पेट्या, खेळणी, सजावटी व नक्षीदार शोभेच्या वस्तू, वाद्ये, होड्या व पालख्या बनविण्यासाठी होतो.वनशेती तसेच बांधावर लागवड करण्यासाठी हा वृक्ष उपयोगी आहे.
shivan cultivation useful in forestry
shivan cultivation useful in forestry
Published on
Updated on

शिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड, कागद लगदा, प्लायवूड, लाकूड पेट्या, खेळणी, सजावटी व नक्षीदार शोभेच्या वस्तू, वाद्ये, होड्या व पालख्या बनविण्यासाठी होतो.वनशेती तसेच बांधावर लागवड करण्यासाठी हा वृक्ष उपयोगी आहे. शिवण ही वेगाने वाढणारी देशी, बहुद्देशीय व पर्णपाती प्रजाती असून लॅमिएसी या कुटुंबातील आहे, याचे लाकूड दर्जेदार असते. शिवण  वृक्षाला घमर, कमेर, घामरी, शिवणी आणि व्हाइट टीक किंवा मेलीना म्हणून ओळखले जाते. नैसर्गिकरीत्या दक्षिण पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय/उपोष्णकटिबंधीय प्रदेशात अर्ध-पर्णपाती जंगलात  हा वृक्ष दिसून येतो. पूर्ण वाढलेला वृक्ष साधारणपणे ३० ते ३५ मीटर उंच होतो. शिवण लाकडाचा वापर फर्निचर, इमारती लाकूड, प्लायवूड, पार्टिकल बोर्ड, कागद लगदा, काडीपेटी निर्मितीसाठी केला जातो. याचबरोबर स्थानिक पातळीवर लाकडावरील कोरीव व नक्षी काम, पॅकिंग पेट्या, वाद्यनिर्मिती, लाकडी खेळणी आणि इंधन म्हणून वापर करतात. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजनामध्ये शिवण प्रजातीस ५० टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना प्रस्ताव सादर करावा लागतो. शिवण वृक्षाचे उगम स्थान दक्षिण-पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय/उपोष्णकटिबंधीय प्रदेश आहे. भारतामध्ये उष्णकटिबंधीय निम-सदाहरित, आर्द्र वने, दमट हवामानातील पानगळतीची वने व काही प्रमाणता शुष्क वनांत मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये याची पूर्व उप-हिमालयाच्या पर्वतीय प्रदेश, गंगेचा त्रिभुज प्रदेश, मैदानी भाग, अरावली पर्वताच्या टेकड्या, मध्य भारत, पश्‍चिम द्वीपकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण, पश्‍चिम महराष्ट्र आणि विदर्भामध्ये याची लागवड दिसून येते.  वर्णन

  • पाने आकाराने मोठी, हृदयसारखी व चमकदार असतात. फेब्रुवारीनंतर गळायला सुरुवात होते. 
  • फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांमध्ये तपकिरी पिवळ्या रंगाची फुले येतात. साधारणपणे फळे मे ते जूनमध्ये पिकायला लागून पिवळ्या रंगाची होऊन पडतात. 
  •  शिवण ज्या वेळी तरुण अवस्थेत असतो, त्या वेळी त्याची साल ही गुळगुळीत, पांढऱ्या-राखाडी ते पिवळ्या-राखाडी रंगाची असते. जसजसे वय वाढते तसे त्याची साल पांढऱ्या रंगाची बनते.
  • लागवडीचे तंत्र

  • ७५० ते २४०० मिमी सरासरी वार्षिक पर्जन्यमान आणि  २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये असलेल्या विभागामध्ये चांगली वाढ दिसून येते. 
  • दुष्काळ-प्रतिरोधक प्रजाती म्हणून वृक्षारोपणासाठी याची निवड केली जाते.
  • विविध प्रकारच्या जमिनींमध्ये वाढीची क्षमता आहे. जमिनीचा सामू ५ ते ८ असावा, एक मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत माती असावी. पाण्याच्या योग्य निचरा होणारी जमीन असावी. 
  • आम्लयुक्त जमीन, कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण असलेली, जांभ्या किंवा लाल प्रकारची जमीन तसेच लोह, अ‍ॅल्युमिनियम, टायटॅनियम आणि मॅंगनीज ऑक्साईडपासून बनलेल्या जमिनीमध्ये याची चांगली वाढ होते. 
  • रोपवाटिका निर्मिती

  • बियांपासून लागवडीसाठी रोपे तयार केली जातात. बिजवृक्ष म्हणून सरळ उंच वाढलेला, खोड दंडगोलाकृती असलेला झाडाची निवड  करावी. 
  • एप्रिल महिन्यामध्ये परिपक्व झालेली पिवळ्या रंगाची फळे झाडावरून पडू लागल्यावर एकत्र करावीत. तपकिरी किंवा काळसर झालेली फळे गोळा करू नये कारण त्यांची उगवण क्षमता कमी असते. गोळा केल्यानंतर २४ ते ४८ तासांमध्ये पिवळ्या रंगाच्या फळांना २४ तास पाण्यामध्ये भिजवून दोन्ही हातांनी फळे एकमेकांवरती चोळल्याने बियांवरचे आवरण निघून जाते. 
  • स्वच्छ धुतलेल्या बिया सावलीमध्ये सुकवून बुरशीनाशकाची प्रक्रिया करून तीन महिन्यांपर्यंत साठवाव्यात.
  • बिया गोळा केल्यानंतर लगेच रुजविल्याने ७० ते ७५ टक्यांपर्यंत बीजांकुरण मिळते. एका किलोमध्ये सुमारे १००० ते १२०० बिया येतात. 
  • शिवणची लागवड ही रोपवाटिकेतील रोपांपासून किंवा स्टंपपासून केली जाते. 
  • बियांपासून रोपनिर्मिती

  • ताज्या बिया रोपवाटिकेमध्ये तयार केलल्या गादीवाफ्यावर, रूट ट्रेनर किंवा पॉलिथिन पिशवीमध्ये २:१:१ (माती:वाळू:शेणखत) या मिश्रणामध्ये १-२.५ सेंमी खोल पुराव्यात. 
  • दिवसातून दोन वेळा पाणी दिल्याने बिया ७२ ते १ दिवसांमध्ये उगवतात. गादीवाफ्यावरील रोपे ३० ते ४५ दिवसांनातर मुळासहित उपटून पॉलिथिनच्या पिशवीमध्ये लावावीत. रोपांना आठवड्यातून ५ ग्रॅम १९:१९:१९ हे खत द्यावे. सहा महिन्यांचे रोप लागवडीसाठी योग्य असते.
  • स्टंपपासून रोपनिर्मिती

  • एका वर्षाचे गादीवाफ्यावरील अंगठ्याच्या आकाराचे म्हणजेच १.५-२ सेंमी जाडी असलेले रोप मुळासहित उपटून घेऊन पाण्यामध्ये ठेवावे.
  • सागामध्ये ज्याप्रमाणे स्टंप निर्मिती करतात, त्याच पद्धतीने शिवणामध्येही केली जाते. धारदार चाकूच्या साह्याने खोडाचा २ ते ३ सेंमी व सोटमुळाचा २२ सेंमी भाग घेऊन लागवडीच्या ठिकाणी लोखंडी पहारीने खड्डे करून जूनमध्ये लावले जातात.
  • स्टंप लावल्यानंतर चहूबाजूंनी माती दाबून घ्यावी. किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • लागवडीचे तंत्र

  • एप्रिल-मे महिन्यामध्ये जमिनीची योग्य मशागत करून ४५ × ४५ × ४५ सेंमीचे खड्डे करावेत. 
  • लागवड चौरस किंवा आयताकृती पद्धतीने केली जाते. वनशेतीमध्ये याची लागवड ६ × ६ मी., ४ × ४ मी. ६ × २ मी. आणि ८ × २ मी. आणि सघन पद्धतीसाठी २ × २ मी. किंवा ३ × ३ मी.वर लागवड करावी. बांधावरती लागवडीसाठी ३ ते ५ मी. अंतरावर एका ओळीमध्ये, जोड ओळीमध्ये किंवा नागमोडी पद्धतीमध्ये केली जाते.  
  • जून-जुलै महिन्यामध्ये ५ ते १० किलो शेणखत, १०० ग्रॅम निंबोळी खत, ५० ग्रॅम  १९:१९:१९ आणि १० ग्रॅम बोरॅक्स यांचे मिश्रण खड्यामध्ये भरून ६ ते ८ महिन्यांचे रोप खड्ड्यामध्ये लावावे.
  • रोपाची उंची जास्त असल्यास बांबूच्या काठ्या खोडापासून १० सेंमी अंतरावर लावाव्यात. 
  • दुसऱ्या वर्षांपासून खतांची मात्रा ५० ते १०० ग्रॅमने वाढवावी, परंतु आंतरपीक घेत असल्यास झाडांना खते देण्याची विशेष गरज भासत नाही. 
  • लागवडीनंतर ३ महिन्यांच्या अंतराने वृक्षांच्या आळ्यामध्ये खुरपणी करावी. 
  • आंतरपीक म्हणून भात, कडधान्ये, तृणधान्ये, चारा पिके व फळपिकांची लागवड करता येते. कोकणामध्ये परसबागेच्या चहूबाजूंनी किंवा मेस बांबूमध्ये शिवण लागवड करतात.
  • छाटणी आणि विरळणी

  • दर्जेदार लाकूडनिर्मितीसाठी छाटणी आणि विरळणी आवश्यक आहे. शिवणामध्ये फांद्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि आंतरपिकांसाठी फांद्यांची नियमितपणे छाटणी केल्याने गाठमुक्त लाकूडनिर्मिती होण्यास मदत होते. 
  • मुख्य खोडवरती येणारे फुटवे, नवीन फांद्या ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीपर्यंत काढून टाकावे लागतात. 
  • उंच, सरळ व दंडगोलाकृती लाकूडनिर्मितीसाठी रोपांना जवळ लावतात. ज्यामुळे स्व-छाटणी होते, त्याचबरोबर पाचव्या वर्षी एक वृक्ष सोडून दुसऱ्या वृक्षाची काढणी किंवा रोगग्रस्त, मरणोन्मुख आणि तणावयुक्त वृक्षांबरोबरच काही प्रमाणात स्वस्थ वृक्षांची काढणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या वेळी म्हणजेच १० ते ११ वर्षी विरळणी करावे. फर्निचर आणि प्लायवूडसाठी विरळणी केल्याने राहिलेल्या सर्व वृक्षांची वाढ जोमाने आणि एकसारखी होते.
  • उत्पादन आणि काढणी चक्र

  • बहूउपयोगितेमुळे शिवणाची झाडे विविध उद्योगांमध्ये वापरली जातात. त्यांची वेगवेगळ्या वयामध्ये काढणी केली जाते. योग्य व्यवस्थापन आणि उच्च प्रतीच्या जमिनीमध्ये ५ वर्षांचा वृक्ष सुमारे २० मीटर उंच आणि २५ सेंमी.पेक्षा जास्त व्यासाचा होतो. 
  •  १० ते १२ वर्षांच्या झाडापासून सुमारे १० मीटर गाठमुक्त लाकूड मिळून सरासरी १५ घनफूट लाकूड प्राप्त होते. 
  • लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्डस, कागद लगदा, प्लायवूड, लाकूड पेट्या, खेळणी, सजावटी व नक्षीदार शोभेच्या वस्तू, विविध प्रकारची वाद्ये, होड्या व पालख्या बनविण्यासाठी होतो.
  • \या वनस्पतीची पाने, साल व फुले औषध म्हणून वात-पित्त, मधुमेह, सूज, त्वचेचे आजारावर उपयोगी आहेत.
  • - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com