जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे. सेंद्रिय कर्ब एक टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पातळी ही पीक उत्पादनवाढीसाठी महत्त्वाची आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापरामुळे जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. ह्यूमस आणि त्यांच्या संबंधित इतर सर्व आम्ल हे सेंद्रिय कर्बाचे मुख्य घटक आहेत. सेंद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. उपयुक्त जिवाणू सेंद्रिय कर्ब खाऊन, मातीतील अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. इतर सर्व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी झाडे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंवर अवलंबून असतात. जमिनीचे भौतिक गुणधर्म जसे की, पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इत्यादी सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेप्रमाणे बदलते. जमिनीची सुपीकता आणि कर्ब : नत्राचे प्रमाण
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे. सेंद्रिय कर्ब एक टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पातळी ही पीक उत्पादनवाढीसाठी महत्त्वाची आहे. जमिनीची सुपीकता प्रामुख्याने पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात पुरवठा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये नत्र, गंधक, स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा हा सेंद्रिय पदार्थांमार्फत होत असतो. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असणे पिकांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. म्हणूनच जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब ः नत्राचे सर्वसाधारणपणे हे प्रमाण १०:१ ते १२:१ असणे उत्तम असते. जमिनीतील कर्ब नत्र प्रमाण मुख्यत्वे तापमान, ओलावा व जमिनीचा प्रकार या घटकांवर अवलंबून असते. वातावरण उष्ण व दमट असेल तर सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होतो. याउलट अति शीत वातावरणात हीच क्रिया मंदावते. जिवाणूंचे कार्य नीट होऊ शकत नाही. जमिनीचा ओलावा टिकून राहणे सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेला आवश्यक आहे. ओलावा भरपूर असल्यास सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. हलक्या व पाण्याचा त्वरित निचरा होणाऱ्या जमिनीपेक्षा भारी व ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनीत कर्ब-नत्र प्रमाण उत्तम असते. सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर. जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण. सातत्याने जमिनीची मशागत.जमिनीला विश्रांती न देणे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा उपाय
जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने कंपोस्ट खत तयार करावे.कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्टखत तयार करावे. क्षारपड जमिनीत धेंचा किंवा ताग पेरून दीड महिन्याने गाडावा. कमी मशागत करावी. पिकांचे अवशेष न जळता जमिनीत गाडावे. पिकांचा अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करावा. आंतरपीक व पीक पद्धती मध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. सेंद्रिय कर्बाचे मुख्य फायदे
जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी, जमिनीमध्ये हवा खेळती राहते. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते. रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते. नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते. जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते. चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. (मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)