अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळपिकातील उपाययोजना

विदर्भात अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. २८) अवकाळी पावसासोबत कमी अधिक प्रमाणात गारपीट झाली. यामुळे संत्रा, लिंबू व मोसंबी बागांमध्ये नुकसान होण्याचा धोका आहे. अशा नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबत सध्या बागेत असलेल्या मृग व हस्त बहराचे व येऊ घातलेल्या आंबिया बहराचे व्यवस्थापन याची माहिती घेऊ.
The orange orchard should be cleaned. Apply Bordeaux paste on the injured branches and trunks.
The orange orchard should be cleaned. Apply Bordeaux paste on the injured branches and trunks.

विदर्भात अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. २८) अवकाळी पावसासोबत कमी अधिक प्रमाणात गारपीट झाली. यामुळे संत्रा, लिंबू व मोसंबी बागांमध्ये नुकसान होण्याचा धोका आहे. अशा नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबत सध्या बागेत असलेल्या मृग व हस्त बहराचे व येऊ घातलेल्या आंबिया बहराचे व्यवस्थापन याची माहिती घेऊ. गारपिटीमुळे झाडांची होणारी हानी, नुकसान 

 • गारपिटीमुळे झाडांच्या फांद्या, खोडावरील सालीला जखमा होतात. अशा जखमांतून प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया, अल्टरनेरिया या सारख्या विविध बुरशींचा शिरकाव होतो. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढतो.
 • झाडांची पाने फाटणे, गळणे यामुळे प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
 • झाडावरील मृग बहराच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
 • आंबिया बहर फुटण्यास उशीर होतो. आवश्यक तितका ताण बसत नाही किंवा आंबिया बहराची फुले निघाली असल्यास गारपिटीने गळतात.
 • उपाययोजना  फांद्या, खोडावरील जखमा लवकर भरून येण्यासाठी आणि झाडांना संतुलित अन्न पुरवठा होण्यासाठी,

 • गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या आरीच्या साह्याने व्यवस्थित कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
 • झाडाची साल फाटली असल्यास पोटॅशिअम परमॅग्नेट १ टक्का द्रावणाने (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी. जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.
 • झाडे उन्मळून पडली असल्यास, त्यांना मातीची भर देऊन बांबू किंवा बल्लीच्या साहाय्याह्याने आधार द्यावा.
 •  झाडांची मुळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमॉक्झानील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणातील द्रावण ८ ते १० लिटर प्रति झाड या प्रमाणात आळ्यात टाकावे किंवा ड्रेंचिंग करावे.
 • गारपीटग्रस्त झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना + ६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
 •  गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्याकरिता गारपीटग्रस्त झाडास १ किलो अमोनिअम सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे. शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक + कॅल्शिअम + फेरस सल्फेट - मिश्रण ) २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
 • गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट १ टक्का (१ किलो) + जिबरेलिक ॲसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास झाडावरील पानांच्या संख्येत वाढ होईल.
 • १० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम मायकोरायझा (VAM) + १०० ग्रॅम पीएसबी + १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलिअम जिवाणू खत + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम प्रति झाड द्यावे.
 • मृग / हस्त बहराची फळे गळाली असल्यास, त्यांची बागेबाहेर योग्य विल्हेवाट लावावी.
 • आंबिया, मृग किंवा हस्त बहराचे नियोजन सद्यःस्थितीत दिवस व रात्रीच्या तापमानात घट होत आहे. ही घट आंबिया बहरातील संत्रा, मोसंबी व लिंबू झाडांना ताण बसण्याकरिता योग्य असली तरी सतत होत असलेले ढगाळ वातावरण, अधून-मधून झालेला पाऊस व गारपीट ही चिंतेची बाब आहे.

 • बहार फुटण्याकरिता उपाय योजना केलेल्या बागेत ताण तुटून फुलोऱ्यास सुरुवात झालेली असेल. अशा बागेत फुलोरा वेगाने फुटण्याकरिता बागेतील तापमान वाढविण्यासाठी उपाय योजना कराव्यात. उदा. ओला सुका कचरा, तणकट इ. जाळून उष्णता व धूर निर्माण करावा. पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) (१.५% टक्के) १.५ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी.
 • ज्या बागा अद्यापही ताणावर आहेत, मात्र आंबिया बहराकरिता पुरेसा ताण बसलेला नाही. अशा स्थितीत ताण कायम ठेवण्याकरिता क्लोरमेक्वाट क्लोराईड या वाढ नियंत्रकाची २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे त्वरित फवारणी करावी. यापूर्वी बागायतदारांनी वाढरोधकाची फवारणी केलेली असल्यास, परंतु त्यानंतर पाऊस आलेला असल्यास पुन्हा एकदा फवारणी करावी. १० ते १२ दिवस ताण कायम राहील, याचे नियोजन करावे.
 •  योग्य ताण बसल्यानंतर दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक व रात्रीचे तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यावर ताण तोडावा. ताण तोडताना झाडांना १३:०:४५ (१.५%) म्हणजेच १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • संत्रा बागेस पुरेसा ताण बसल्यावर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर (६ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या झाडांना) एकात्मिक खत व्यवस्थापन करताना शिफारशीत खतांचा ७५ टक्के हप्ता (९००:३००:३०० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रति झाड) अधिक मायकोरायझा (VAM) ५०० ग्रॅम अधिक पीएसबी १०० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरीलिअम जिवाणू खत १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे मात्रा द्यावी.
 • खतमात्रा देताना पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे.

  महिना नत्र (ग्रॅम/ झाड)   स्फुरद (ग्रॅम/ झाड)  पालाश (ग्रॅम/ झाड)
  जानेवारी २७० १२० ३०
  मार्च २७० १०५ ३०
  मे १८० ७५ ९०
  जुलै ९० ७५
  सप्टेंबर ९० ७५
 •  कागदी लिंबू बागेचा ताण तोडताना ६ वर्षे व अधिक वयाच्या झाडाकरिता १० किलो शेणखतासोबत, १०० ग्रॅम पीएसबी + १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलिअम जिवाणू खत + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम, नत्राची अर्धी मात्रा (३०० ग्रॅम), संपूर्ण स्फुरद मात्रा (३०० ग्रॅम) व संपूर्ण पालाश मात्रा (३०० ग्रॅम) प्रति झाड द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा (३०० ग्रॅम) फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी.
 • फुलोरा अधिक व नर फुलांची संख्या कमी करण्याकरिता झिंक सल्फेट (०.५ टक्का) ५ ग्रॅम, फेरस सल्फेट (०.३ टक्का) ३ ग्रॅम, व बोरॉन (०.१ टक्का) १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी ताण तोडताना उपयोगी ठरते.
 • पॅक्लोब्युट्राझॉल या वाढनियंत्रकाचा वापर केलेल्या शेतकऱ्यांनी आंबिया बहरातील फुलोरा फुटताना जिबरेलिक ॲसिड १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) अधिक युरिया १.५% टक्के (१.५ किलो) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पुढील फूलगळ व फळगळ टाळता येईल. शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. म्हणजे झाडावरील सल कमी येईल.
 • मृग किंवा लिंबू हस्त बहाराची फळे असलेल्या बागेत झाडांना फळे योग्य प्रकारे पोसण्याकरिता पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १.५ किलो + प्रॉपीकोनॅझोल १०० मिलि प्रति १०० लिटर किंवा ०:५२:३४ अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल १०० मिलि प्रति १०० लिटर पाणी यांची आलटून पालटून फवारणी करावी.
 • मृग बहरातील फळांची गळ होत असल्यास जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम किंवा एनएए १ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • नवीन नवतीस सुरुवात झाल्यानंतर व ढगाळ वातावरणात सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. झाडांच्या पानांवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो.त्याच प्रमाणे ही कीड घातक अशा ग्रिनिंग रोगाचाही प्रसार करते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी संत्र्याला नवीन नवती आल्यानंतर नीम तेल १० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. नीम तेल पाण्यात मिसळण्यासाठी त्यात १० ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रति १० मिलि नीम तेलात मिसळावे. किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲबामेक्टिन (१.९ ईसी) ०.३६ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
 • ढगाळ वातावरण किंवा पावसानंतर पडणाऱ्या दवामुळे मृग बहाराच्या बागेमध्ये फळांवर बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • पावसामुळे कागदी लिंबू झाडांवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यापासून संरक्षणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • (लेखातील रसायनांना ॲग्रेस्को शिफारशी आहेत.) टीप- स्ट्रेप्टोमायसीनचा वापर अत्यंतिक गरज असेल तरच करावा. त्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव नुकताच केंद्रिय कृषी मंत्रालयाने गॅझेटमध्ये प्रसिध्द केला आहे. - डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२. (प्रभारी अधिकारी, भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
  Agrowon
  agrowon.esakal.com