उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य निवडीसोबत वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये योग्य प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमतरतेची लक्षणानुसार फवारणीद्वारे करावी. बीजोत्पादनासाठी कंदाची निवड
किफायतशीर कांदा बीजोत्पादनाच्या दृष्टीने योग्य कंदाची निवड करावी. योग्य जातीच्या, उत्तम गुणवत्तेच्या, एकसारख्या आकाराचे कंद असावेत. कंद मध्यम आकाराचा साधारणतः सरासरी ५० ते ८० ग्रॅम वजन, ४.५ ते ६ सें.मी. व्यास असलेला निवडावा. कंद एक रिंग असलेला निवडावा. अनेक रिंग (फुटीचा) कंद लागवडीसाठी वापरू नये. खरीप कांद्याचे बीजोत्पादनासाठी लागवड करताना परिपक्व कंदाची निवड करावी. काढलेल्या कंदाची त्वरित लागवड टाळावी. कंद प्रक्रिया लागवड करताना कंदाचा वरचा भाग योग्य प्रमाणात कापून कंद प्रक्रिया केल्यानंतर लागवड करावी. कंद प्रक्रियेसाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक १३:००:४५ हे खत १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करावे. त्यात कंद अर्धा तास बुडवून नंतर लागवड करावी. एक एकर लागवडीसाठी १००-१५० लिटर द्रावण पुरेसे ठरते. लागवड बीजोत्पादन प्रक्षेत्रात कंदाची लागवड करताना ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि कंदामधील लागवड अंतर ३० सें.मी. ठेवावे. प्रति हेक्टर २५-४० क्विंटल कंद पुरेसे होतात. (५०-८० ग्रॅम वजनाचे कंद). जर ठिबक संच वापरून गादीवाफ्यावर लागवड करणार असाल, तर ओळीतील अंतर ६० सें.मी. आणि कंदामधील २० सें.मी. ठेवावे. प्रति हेक्टर ३०-४५ क्विंटल कंद पुरेसे होतात. अन्नद्रव्य व्यवस्थापन
अपेक्षित बीजोत्पादनासाठी हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत २.५ टन वापरावे. हेक्टरी ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी ५ किलो शेणखतातून देऊ शकतो. ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपात असतील तर ठिबक संचाद्वारे देखील देऊ शकतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये. हेक्टरी २५० किलो निंबोळी पेंड देखील उपयुक्त ठरते. पोटॅशिअम ह्युमेट १.२५ किलो आणि गंधक (सल्फर) ७.५ किलो प्रति हेक्टर पायाभूत (बेसल) स्वरूपात द्यावे. माती परिक्षणानुसार अन्नद्रव्याची (खत) मात्रा द्यावी. बीजोत्पादनासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलो- युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र (५० किलो- युरिया १०९ किलो) लागवडीनंतर १ आणि १.५- २ महिन्याने समान हप्त्याने द्यावे. पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी स्फुरदाची आवश्यकता असते. कांदा बीज गुणवत्तेसाठी पालाश आवश्यक असते. खते देण्यापूर्वी माती परीक्षणाच्या आधारे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खताची मात्रा निश्चित करावी. विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
पिकाच्या चांगली वाढ, विकासासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात आवश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे वनस्पती शरीर व चयापचय प्रक्रियेत बदल होऊन उत्पादन व गुणवत्ता कमी होते. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर पडतो. अधिक उणीव भासल्यास पाने जड होऊन खालच्या अंगाने वाकतात. जस्ताच्या उणिवेमुळे पिकाची वाढ प्रतिबंधित होते. पाने मध्यंतरी-नस नेक्रोसिस (इंटरव्हिनल नेक्रोसिस) दर्शवितात. सुरुवातीच्या काळात जस्ताच्या उणिवेमुळे नवीन पाने पिवळी पडतात. मध्यंतर-नसात ठिपक्यांचा (पिट्सचा) विकास होतो. उणीव जास्त वाढत गेल्यास प्रौढ पानांच्या वरील पृष्ठभागावर प्रखर मध्यवर्ती-नस नेक्रोसिस (इंटरव्हिनल नेक्रोसिस) लक्षणे दाखवतात. मात्र मुख्य नसा हिरव्या राहतात. लोहाच्या उणिवेमुळे पानांचा संपूर्ण पिवळसरपणा येतो. लोह कमतरतेचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणून नवीन पानांच्या मध्यवर्ती-नस क्लोरोसिस (इंटरव्हिनल क्लोरोसिस) पासून सुरू होते. नंतर पूर्णपणे (समग्र) क्लोरोसिस मध्ये विकसित होते. लोहाची गतिशीलता कमी असते, म्हणून नवीन पानांवर लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. लोह उणीव प्रामुख्याने चूनखडीयुक्त (कॅल्कॅरिअस जमीन) आणि ऑक्सिजनविरहित जमिनीच्या परिस्थितीशी संबंधित असते. मॅंगेनीज उणिवेमुळे पाने शेंडा करपणे (टीप बर्न), पानांचा फिक्कट रंग आणि पाने सुरकुतणे (कर्लिंग), पिकाची खुंटलेली वाढ इ. लक्षणे दर्शवितात. अशी लक्षणे दिसताच शिफारसीत खतमात्रेबरोबर झिंक सल्फेट (०.५ टक्के), कॉपर सल्फेट ०.५ टक्के, फेरस सल्फेट (०.५ टक्के) म्हणजे ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी, मँगेनीज सल्फेट (०.३ टक्के) म्हणजे ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किंवा पीक लागवडीनंतर ३० आणि ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ टक्के, जस्त ६ टक्के, मँगेनीज १ टक्के, तांबे ०.५ टक्के, बोरॉन ०.५ टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण (लोह २.५ टक्के, जस्त ३ टक्के, मँगेनीज १ टक्के, तांबे १ टक्के, बोरॉन ०.५ टक्के) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करता येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विविध प्रमाणांतील मिश्रणांची फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कांदा बीजोत्पादन प्रक्षेत्रात तापमानातील अनियमित बदल आणि अयोग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे असे शारीरिक विकृती दिसून येतात. कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ६० दिवसांनी १९:१९:१९ (१ टक्के) आणि ६० दिवसांनंतर १३:००:४५ किंवा ०:०:५० विद्राव्य खत (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास बीजोत्पादन वाढते. संपर्क : डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के. अंतर्गत सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.)