भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

भेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
Integrated management of insects on okra
Integrated management of insects on okra
Published on
Updated on

भेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. तुडतुडे 

  • पिल्ले - पांढूरकी फिक्कट हिरवी असून तिरपे चालतात.
  • प्रौढ तुडतुडे - पाचरीसारखा आकार, फिक्कट हिरवा रंग, समोरील पंखाच्या वरील भागात एक एक काळा ठिपका असतो.
  • पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालील पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषतात.
  • प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात.
  • मावा भेंडीची पाने व कोवळ्या भागातून ही कीड रस शोषते. ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ पानावर सोडते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. ही कीड विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते. पांढरी माशी

  • या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पाने पिवळी पडतात. प्रौढ किटकांच्या शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. झाडाच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा आल्याने झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट येते.
  • ही कीड ‘यलो व्हेन मोझॅक’ या विषाणूजन्य रोगाचा प्रसारही करते. रोगाचा प्रसार जास्त झाल्यास ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते.
  • या रोगाची लक्षणे - सुरुवातीस पानाच्या शिरांचा रंग पिवळा होऊन अन्य भाग हिरवा राहतो. काही दिवसांनी पूर्ण पाने पिवळसर होतात. अशा विषाणूग्रस्त झाडांस निकृष्ट दर्जाची फळे तयार होतात.
  • शेंडे व फळे पोखरणारी अळी (इयरीस व्हिटेला) भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड असून वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व उष्ण तापमान या किडीला पोषक असते. अळी तपकिरी रंगाची असून, शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. सुरुवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंडे पोखरून आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रसत पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात. फळावर अळीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते. प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही. अशी फळे विक्रीयोग्य राहत नाही. फळे पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) ही कीड बहुभक्षी असून भेंडीशिवाय हरभरा, मिरची, टोमॅटो इ. अनेक पिकावर उपजीविका करते. प्रौढ मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फळावर ३०० ते ५०० अंडी देते. अंड्यातून ५ ते ७ दिवसात अळी बाहेर पडते. ती फळांना अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेऊन आतील भाग खाते. अळीची पूर्ण वाढ होण्यास १४ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. अळीचा रंग हिरवट असून तिच्या शरीरावर तुरळक केस व तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. अळी जमिनीत झाडाच्या वेष्टणात कोषावस्थेत जाते. एकात्मिक व्यवस्थापन

  • शेतात पिकाची फेरपालट करावी. भेंडी कुळातील कापूस यांची शेत किंवा जवळपास लागवड करू नये.
  • यलो व्हेन मोझॅकग्रस्त झाडे उपटून व कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावीत.
  • विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पांढरी माशीचे वेळीच व्यवस्थापन करावे.
  • फळ पोखरणारी अळी व शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
  • शेतात एकरी १० पक्षी थांबे लावावेत. त्यावर पक्षी बसून अळ्या टिपून खातील.
  • पांढरी माशी व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे ४ ते ५ प्रति एकरी लावावेत.
  • सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होते. हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या व्यवस्थापनास मदत होते.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ४० हजार (म्हणजे २ ट्रायकोकार्ड) प्रति एकरी वापरावीत.
  • निंबोळी अर्क (५ टक्के ) किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • वातावरणात आर्द्रता असल्यास बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी व्यवस्थापन होईल.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, एचएएनपीव्ही (२५० एलई) ०.५ मि.लि प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
  • रासायनिक कीटकनाशकाची फवारणी किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर करावी. वारंवार एकाच कीटकनाशकाची फवारणी करू नये. किडनाशकांची फवारणी आलटून पालटून करावी.
  • आर्थिक नुकसान पातळी 

  • शेंडा व फळ पोखरणारी अळी : ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फळे.
  • फळ पोखरणारी अळी : १ अळी प्रति झाड.
  • तुडतुडे : ५ तुडतुडे प्रति झाड.
  • पांढरी माशी : ४ ते ५ प्रौढ प्रति पान.
  • कीड     कीटकनाशक     प्रति लिटर पाणी    प्रतीक्षा कालावधी (दिवस)
    रस शोषक किडी(तुडतुडे, मावा, पांढरी माशी)  थायामेथोक्झाम (२५ डब्ल्युजी)  ०.२ ग्रॅम ०५
    तुडतुडे, पांढरी माशी    डायफेंन्थ्युरॉन (५० डब्ल्युपी)  १.२ ग्रॅम  ०५
    शेंडा व फळ पोखरणारी अळी  इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) किंवा   ०.२७ ग्रॅम    ०५
    लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) किंवा   ०.६ मि.लि.  ०४
     डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के)   १ मि.लि.  ०१
    फळ पोखरणारी अळी लॅंबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) किंवा  ०.६ मि.लि.    ०५
    क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी)    ०.२५ मि.लि.   ०५
    पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी    पायरीप्रॉक्सीफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के ईसी)  १ मि.लि.   ०७

    हे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे. प्रतिक्षा कालावधी म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ज्या ठराविक कालावधीनंतर (दिवस) पिकाची काढणी करणे शक्य आहे, असा कालावधी. या कालावधीआधी पिकाची किंवा फळांची (भेंडी) काढणी केली असता त्यात फवारलेल्या कीटकनाशकाचा अंश राहण्याची शक्यता असते. डॉ.संजोग बोकन, (संशोधन सहयोगी) ९९२१७५२००० डॉ. अनंत लाड, ( सहाय्यक प्राध्यापक) ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com