मिरची पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. किडींचा प्रादुर्भाव होणे व योग्य वेळी किडींचे नियंत्रण न करणे यामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
fruit borer in capsicum
fruit borer in capsicum

मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. किडींचा प्रादुर्भाव होणे व योग्य वेळी किडींचे नियंत्रण न करणे यामुळे मोठे नुकसान होते. या पिकाचे किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यासाठी सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे. फुलकिडे ओळख हे अतिशय छोटे, निमुळते व नाजूक असतात. रंगाने फिक्कट पिवळे किंवा करड्या रंगाचे, लांबी १ मि.मी.पेक्षा कमी असते. ही कीड पंखविरहित अळ्या व पंख असले तरी अळीसारखी अशा दोन्ही अवस्थेत आढळते. त्यांच्या पंखामध्ये शीर असते. ती लांब केसांनी व्यापलेली असते. नुकसान पानाच्या वरचा पापुद्रा खरवडता येण्याजोगी या किडीच्या मुखांगाची रचना असते. पाने खरवडल्यानंतर त्यातून येणारा रस ही कीड शोषून घेते. पाने वरच्या बाजूला मुरडली गेल्याने त्यांचा आकार द्रोणासारखा दिसतो. या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो. ते मोठे होईपर्यंत राहतो. किडीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास पाने व झाडाचे शेंडे चुरडतात. झाडाची वाढ खुंटते. झाडाला मिरच्या कमी लागतात. मावा मावा ही कीड पानाच्या खाली राहून पाने, कळ्या, फुले व झाडाच्या कोवळ्या भागातील रस शोषते. यामुळे पाने सुरकुतल्यासारखी दिसतात. ही कीड शरीराबाहेर मधासारखा चिकट पदार्थ सोडते. या चिकट पदार्थावर काळसर बुरशीची वाढ होते. यामुळे पानाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते. परिणामी झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट येते. पांढरी माशी या किडीची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते. या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. कोळी  कोळी किंवा अष्टपदी हे अत्यंत सूक्ष्म (लांबी १ मि.मी.) असून, चप्पट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतात. पानावर ते सैरावैरा धावत असतात. पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली दिसतात. सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुलांची गळ होते. फळांचा आकार लहान राहून विद्रूप होतो. उत्पादनात भारी घट होते. फळ पोखरणारी अळी ही अळी तपकिरी हिरवट रंगाची असून, शरीराच्या दोन्ही बाजूंनी गडद पट्टा असतो. शरीरावर तुरळक केस असतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी पाने, फुले व रोपाच्या शेंड्यावर उपजीविका करते. नंतर ती फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते. एकात्मिक व्यवस्थापन

  • कीड सहनशील वाणाची लागवड करावी.
  • पिकाची फेरपालट करावी. सतत मिरचीचे पीक घेणे टाळावे.
  • मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे.
  • झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसांची रोपे १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
  • निंबोळी पेंड दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर) १०० किलो प्रति एकरी विभागून द्यावी.
  • पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे हेक्टरी १० प्रमाणात लावावेत.
  • रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या अळ्या २ प्रति झाड सोडावे.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावेत.
  • निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा  ॲझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण   (फवारणी : प्रमाण प्रति लिटर पाणी) फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,

  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा 
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि. लि. किंवा 
  • फ्ल्युबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मि.लि. किंवा 
  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मि.लि. 
  • फुलकिडे मावा, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी,

  •     फिप्रोनील (५ टक्के) १.६ मि.लि. किंवा 
  •     स्पिनोसॅड (४५ एसएल) ०.३२ मि.लि. 
  • कोळी नियंत्रणासाठी, स्पायरोफेसीफेन (२२.९ एससी) ०.८ मि.लि. - डॉ. पी. आर. झंवर  ७५८८१५१२४४ (सहयोगी प्राध्यापक), योगेश मात्रे,  ७३८७५२१९५७   (पी. एचडी. विद्यार्थी), (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com