गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. अलीकडे ही अळी ज्वारी पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात परभणी भागामध्ये ज्वारीवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. अमेरिकन लष्करी अळी (फॉल अर्मीवर्म)
शास्त्रीय नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा (Spodoptera furgiperda) मूळ अमेरिकेतील बहूभक्षी कीड. ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका. उदा. ज्वारी, मका, ऊस, भात, गहू इ. तृणधान्य आणि भुईमूग, सोयाबीन, कापूस, बटाटा, कांदा इ. नराचे समोरचे पंख करडे व तपकिरी असून, पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. मादी पतंगाचे समोरचे पंख पूर्णपणे करडे. नर-मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असतात. पतंग निशाचर असून, पतंग एका रात्रीमध्ये १०० किलोमीटर अंतर पार करतो. मिलनानंतर ३ ते ४ दिवसानंतर मादी पतंग अंडी घालते. एक मादी सरासरी १५०० ते २००० अंडी देऊ शकते. पतंग जवळपास ७ ते १२ दिवस जगतात. अंडी घुमटाकार, मळकट पांढरी ते करड्या रंगाची. एका पुंजक्यात १०० ते २०० अंडी केसाळ आवरणाने झाकलेली असतात. अंडी अवस्था २ ते १० दिवस. अळीच्या सहा अवस्था असतात. पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ से.मी.लांब. रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तीन रेषा असतात. डोक्यावर इंग्रजीतील उलट्या ‘वाय’ अक्षरासारखे चिन्ह असते, तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजूने दुसऱ्या वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात. अळी अवस्था - १४ ते ३० दिवस. कोष : कोष सुरुवातीला हिरवट असून, नंतर लालसर तपकिरी रंगाचे असतात. कोषावस्था साधारण ८ ते ९ दिवस, हिवाळ्यात कोषावस्था २१ दिवसांपर्यंत. पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा हिरवा पृष्ठभाग खरवडून खाते. पानांवर पारदर्शक, पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्र पाडतात. पानाच्या कडा खातात. अळी पोंग्यामध्ये शिरून आतील भाग खाते. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात. पानांना छिद्रे व पोग्यांमध्ये अळीची विष्ठा यावरून अळीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. विष्ठेमुळे पानांची प्रत खराब होते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते. एकात्मिक व्यवस्थापन मशागतीय पद्धत
आधीचे पीक वेळेवर काढून, त्यांचे जमिनीवरील अवशेष नष्ट करावेत. प्रादुर्भाव असलेल्या भागात शक्यतो उन्हाळी पीक न घेता जमिनीची खोल नांगरणी करावी. उन्हामुळे किडींच्या अवस्था बाहेर पडून उन्हाने किंवा पक्ष्यांद्वारे नष्ट होतील. पेरणी वेळेवर करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी. ज्वारीमध्ये तूर/ चवळी २:१ व १:१ याचे आंतरपीक घ्यावे. एकदल व द्विदल पिकाची फेरपालट करावी. ज्वारी पिकाभोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावाव्यात. रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. आंतरमशागत करून पीक तणमुक्त ठेवावे. किडीची अंडी व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. पिकात इंग्रजी ‘टी’ आकाराचे १० पक्षिथांबे प्रति एकरी लावावेत. भौतिक पद्धत पीक ३० दिवसापर्यंत असल्यास बारीक वाळू व चुन्याचे ९:१ प्रमाण करून पोंग्यात टाकावे. जैविक पद्धती
किडीचे नैसर्गिक शत्रू - परभक्षी (उदा. ढालकीटक, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इ.) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इ.) यांचे संवर्धन करावे. ट्रायकोग्रामा प्रिटिओसम ५० हजार अंडी किंवा टिलोनेमस रेमस यांनी परोपजीविग्रस्त ४० हजार अंडी प्रति एकर पेरणीच्या ७ आणि १४ दिवसांच्या अंतराने २ वेळा शेतात सोडावेत. रोपावस्था ते सुरवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५-१० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि किंवा मेटारायझीम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम किंवा नोमुरिया रिलाई ५ ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती २ ग्रॅम. रासायनिक पद्धती बीजप्रक्रिया प्राथमिक प्रादुर्भाव रोखण्याकरिता सायॲंट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायामेथोक्झाम (१९.८ एफएस) (संयुक्त कीडनाशक) ६ मिलि प्रति किलो बियाणे. रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
रोप अवस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (अंडी अवस्था), (उगवणी नंतर ३ ते ४ आठवडे) ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या) (५ ते ७ आठवडे) १० ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास, स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि किंवा थायामेथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅबडा सायहॅलोथ्रिन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीडनाशक) ०.५ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.४ मिलि - डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५ (विषय विशेषज्ञ -पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, परभणी)