सुधारित करडई लागवड तंत्रज्ञान

खरीप हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाणारे करडई हे रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रासाठी महत्त्वाचे तेलबिया पीक ठरते. करडईची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीच्या खालील स्तरातील ओलावा वापरतात.
Improved technology for safflower cultivation
Improved technology for safflower cultivation

खरीप हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाणारे करडई हे रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रासाठी महत्त्वाचे तेलबिया पीक ठरते. करडईची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीच्या खालील स्तरातील ओलावा वापरतात.  राज्यात एकेकाळी तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ अठरा हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला असून, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नक्कीच चांगले उत्पादन मिळू शकते. विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.  करडईखालील क्षेत्र कमी होण्याची प्रमुख कारणे

 • शिफारशीत खतमात्रांचा अभाव.
 • हलक्या जमिनीत करडईची लागवड.
 • करडईचे पीक एकाच जमिनीत सलग घेतले जाते.
 • स्थानिक वाणांचा वापर.
 • संकरित व सुधारित वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे.
 • मावा कीड व मर, करपा रोगाचे नियंत्रण वेळेवर न होणे.    पेरणी उशिरा किंवा लवकर करणे.
 • काटेरी झाडांमुळे काढणीसाठी मजुरांची उपलब्धता न होणे. त्याच काढणीसाठी यंत्रे उपलब्ध नाहीत.
 • बाजारभावातील लवचिकतेचा अभाव.
 • करडई तेलबियांत तेलाचे कमी प्रमाण.
 • कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या करडईचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय तेलबिया मिशन राबवले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर राबविलेल्या आद्यरेखीय प्रात्यक्षिकावरून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा १८ ते ३६ टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 • जमीन करडई पिकासाठी मध्यम ते खोल भारी जमीन निवडावी. साठ सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो त्यामुळे करडई पीक चांगले येते. मात्र पाणी साठून राहिल्यास पिकाला अपाय होतो, हे लक्षात घेऊन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. काहीशा चोपण जमिनीतही हे पीक येते. पूर्वमशागत करडईची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने खोल नांगरणी करावी. कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. खरीप  हंगामात ६ × ६ मीटर अथवा १० × १० मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा उतारास आडवे सरी वरंबे करून मूलस्थानी जलसंधारण केल्यास जमिनीत जास्तीत जास्त ओलावा साठवला जातो. शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत ५ -६ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.  सुधारित /संकरित वाण  

  सुधारित/संकरित वाण  कालावधी (दिवस)    उत्पादन (क्विं/हे.)  
  भीमा     १२०-१३०   १२-१४    
  फुले कुसुमा   १२५ -१४० जिरायती १२-१५, बागायती २०-२२ 
   एस.एस.एफ .६५८   ११५-१२०  १२-१३  
  एस.एस.एफ. ७०८     ११५ - १२०     जिरायती १३-१६, बागायती २०-२५ 
  एस. एस. एफ. १२ -४० (फुले नीरा)        १२०-१२५   जिरायती १२-१५, बागायती २०-२२ 
  एस.एस.एफ.१३ -७१ (फुले भिवरा)    १२०-१३०    जिरायती १३-१६, बागायती २०-२५  
  पी.बी.एन.एस.१२    १३५-१३७    जिरायती १२-१५, बागायती २०-२५
  पी.बी.एन.एस.८६  (पूर्णा)   १२०-१३०    १२-१५ 
  ए .के. एस. २०७ १२५-१३५   १२-१४  
  नारी-५७    १२५-१३५     २०-२५  
  आय.एस.एफ.-७६४   १२०-१३०   जिरायती १२-१५, बागायती २०-२५ 
  अकोला पिंक    १३०-१३५    जिरायती १२-१५   
  डी.एस.एस.१८५   १२०-१३५  जिरायती १२-१५, बागायती २०-२५    

       पेरणी करडईची पेरणी वेळेवर म्हणजेच सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. फार लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यास पानावरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पिकाचे नुकसान होते. उशिरा म्हणजे ऑक्टोबरनंतर पेरणी केल्यास पिकाची कोवळी अवस्था थंडीमध्ये येऊन मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक होतो.  बियाणे व बीजप्रक्रिया लागवडीसाठी करडईचे सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे. पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे लागते. खरीप पिकानंतर त्याच क्षेत्रात करडई पीक घेणार असल्यास हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो चोळावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. सोबत पी.एस.बी. या स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंचे २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणी व पेरणी अंतर कोरडवाहू करडईची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर २० सें.मी. राहील, हे पाहावे. पीक पद्धती सलग पीक पद्धत काही भागांत करडईची पेरणी ज्वारी पिकात पट्टे टाकून केली जाते. करडई व ज्वारी पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी आहे. करडई पिकास वाढीच्या अवस्थेत पाणी जास्त लागते, तर ज्वारी पिकास वाढीच्या व दाणे भरण्याची अवस्थेत पाण्याची गरज असते. पट्टा पेर पद्धतीत सुरुवातीच्या काळात करडई पीक जमिनीतील ओलाव्याचा अधिक वापर करते, त्यामुळे ज्वारीला फुलोऱ्याच्या अवस्थेत ओलावा कमी मिळू शकतो. परिणामी, करडईच्या शेजारच्या ज्वारी ओळींची वाढ कमी होऊन उत्पादनात घट येते. शक्यतो करडईचे सलग पीक घ्यावे. सलग पीक घेतल्यास मशिनने काढणी करणे सोईचे होते. काढणीसाठी मजूर न मिळण्याची समस्या सोडवता येते.  वार्षिक फेरपालट रब्बी हंगामात करडई - ज्वारी - हरभरा अशी वार्षिक पीकपद्धती घेतल्यास चांगले उत्पादन मिळते. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. विशेष म्हणजे जमिनीचा पोत टिकून राहतो. खरीप - रब्बी पीक पद्धत खरीप हंगामात वेळेवर पाऊस पडल्यास भारी जमिनीत कमी कालावधीची मूग किंवा उडीद ही पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात करडई हे पीक घ्यावे.  आंतर पीक पद्धती आंतरपीक पद्धतीमध्ये एखाद्या पिकाला कोणत्याही कारणाने फटका बसला तरी दुसऱ्या पिकाचे तरी उत्पन्न हाती येते. सलग लागवडीपेक्षा आंतरपीक फायदेशीर ठरू शकते. रब्बी हंगामात सहा ओळी हरभरा + तीन ओळी करडई (६:३) किंवा चार ओळी जवस +  दोन ओळी करडई (४:२) ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे.  खत मात्रा करडई पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. करडईच्या भरघोस उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) व २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे. बागायती करडई पिकास प्रति हेक्टरी ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) अधिक ३७.५ किलो स्फुरद  (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे. - डॉ. मंगेश दुधे, ९०१०२६५४७८ (डॉ. दुधे व डॉ. मुलपुरी या भारतीय तेलबिया अनुसंधान संस्थान, राजेंद्रनगर, हैदराबाद येथे कार्यरत आहेत, तर डॉ. शिंदे अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथील निवृत्त प्राध्यापक आहेत.)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com