आकर्षक झाडांची लागवड, मोठ्या झाडांचा शेतीत समावेश, पक्ष्यांना बसण्यासाठी योग्य जागा, मानवनिर्मित घरटी यामुळे आपण पक्ष्यांना शेतीकडे आकर्षित करू शकतो. याचा कीडनियंत्रणासाठी फायदा होतो. तसेच जैवसाखळी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहते. पक्षी आणि शेती हे परस्परसंबंधी आहेत. शेतीमध्ये नांगरणीपासून ते पीक काढण्यापर्यंत आणि जिथे लागवड नाही अशा जमिनीमध्ये सुद्धा पक्षी काही उपयुक्त भूमिका बजावतात. पक्ष्यांचा या भूमिकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कृषी पक्षिशास्त्र म्हणतात. आहाराच्या सवयीनुसार पक्ष्यांचे वर्गीकरण केले जाते. शेतीतील पक्ष्यांची भूमिका
वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे पक्षी वेगवेगळ्या प्रकारे शेती व्यवस्थापनात उपयुक्त ठरतात. कीटकभक्षी पक्षी अनेक प्रकारचे कीटक भक्षण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. नाकतोडे, पतंग, भुंगे, अळ्या अशा नुकसानकारक कीटकांचा धोका या पक्ष्यांमुळे काही अंशी कमी होतो. शेती किंवा लागवड केलेल्या ठिकाणांपेक्षा मिश्र पद्धतीने केलेल्या लागवडीमध्ये रोग, कीटकांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. याचे कारण म्हणजे मिश्र लागवड असलेल्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या आणि वावर जास्त असतो. मांस भक्षी पक्ष्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पक्षी म्हणजे घुबड. हे लहान प्राण्यांची शिकार करतात. निशाचर घुबडांना शेतीमधील रात्रीचे चौकीदार म्हणतात. रात्रीच्यावेळी शेतीमधील उंदीर व घुशीची शिकार हे पक्षी करतात. गव्हाणी घुबड दिवसाला १ ते २ उंदरांचा फडशा पाडते. लक्षद्वीप बेटावर नारळाच्या बागांमध्ये उंदरांची संख्या खूप वाढली, त्यामुळे फळांचे नुकसान होऊ लागले. तेव्हा येथील शेतकऱ्यांनी केरळ मधून गव्हाणी घुबडाच्या दोन जोड्या नारळाच्या बागेत आणल्या. मानवनिर्मित घरट्यांमध्ये प्रजनन करून हे घुबड नारळ बागेत सोडण्यात आले. या घुबडांनी बागेतील उंदरांचे नियंत्रण करण्यास सुरुवात केली. हे लक्षात घेता शेतात घुबडाला बसता येईल अशी जागा ठेवली तर ते चांगल्या प्रकारे उंदराचे नियंत्रण करतात. परागीभवनामध्ये सूर्यपक्ष्यासारखे मधुरस खाणारे छोटे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. वनशेतीमध्ये किंवा फळबागांच्यामध्ये आपली नजर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणचे कीटक सुतारपक्षी शोधून खातात. गायबगळे जनावरांच्या अंगावरील गोचिडांना खातात. बगळे, करकोचे, शेराटीसारखे पाणथळ जमिनीवर राहणारे पक्षी परिसरातील भातशेतीमधील किडे, अळ्या, गोम, गोगलगायी खातात. बगळे, मैना, कावळे हे नांगरणी चालू असताना जमिनीतून वर येणारे किडे खातात. निसर्गामध्ये फळ खाणारे म्हणजेच फलाहारी पक्षी बागेचे काही अंशी नुकसान करत असले तरी या सुंदर जंगलनिर्मितीमध्ये त्यांची बीज प्रसारणाची भूमिका महत्त्वाची ठरते. जे पक्षी पूर्णपणे धान्यावर जगतात, त्यांच्यामुळे शेतीला धोका उद्भवतो. शेतात मुबलक अन्न मिळत असल्यामुळे त्यांची संख्या वाढते. चिमणी, कबूतर, कवडे, पोपट मोठ्या संख्येमध्ये अन्नधान्याच्या शेतीमध्ये येतात. मानव आणि पक्षी संघर्ष फारसा गंभीर नसला तरी महत्त्वाचा आहे. हे नुकसान पूर्णपणे थांबवता आले नाही तरी कमी करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहे, यावर काम करणे गरजेचे आहे. कमी होणारी पक्ष्यांची संख्या
जंगलांचे कमी झालेले प्रमाण, औद्योगिकीकरण, अधिवास नष्ट झाल्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. विद्युत तारांचा अंदाज न आल्यामुळे, लोहचुंबकीय क्षेत्रात फसल्यामुळे, भ्रमणध्वनीच्या वाढत्या वापरामुळे देखील पक्ष्यांची संख्या कमी झालेली दिसते. हवा, पाणी, जमीन, आवाज, प्लॅस्टिक प्रदूषणाचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. शेतीमध्ये अति प्रमाणात वापरली जाणारी रसायने माणूस आणि जैव विविधतेला घातक आहे. यामुळे पक्ष्यांच्या अंड्याचे कवच पातळ होऊन प्रजनन क्षमता, वजन, शारीरिक क्षमता कमी होत आहे. गवताच्या प्रजाती नष्ट झाल्यामुळे आणि त्यांची संख्या कमी झाल्यामुळे हव्या त्या प्रतीचा आहार पक्ष्यांना मिळत नाही. आक्रमक प्रजाती हा एक नवीन प्रश्न पुढे आला आहे. ज्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. अनुकूल वातावरण व अन्नाची उपलब्धता यामुळे काही पक्ष्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढते. अन्न साखळीवर परिणाम होतात. कबूतर, पोपटांच्या वाढत्या संख्येमागे हे कारण आहे. त्यामुळे इतर पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. या सर्वच बदलांचा परिणाम जनुकीय स्तरावर सुद्धा होत आहे. खाद्य उपलब्धतेनुसार पक्ष्यांचे प्रकार धान्य खाणारे पक्षी
यांच्या आहारात ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, वेगवेगळ्या बिया यांचा समावेश होतो. चिमण्या, सुगरण, ठिपकेदार मनोली, साधी मनोली, मोर, कवडे, कबुतरे, पोपट, सुभग, रामगंगा, होला या पक्ष्यांचा समावेश या गटात होतो. हे पक्षी धान्य खाणारे असले तरी जेव्हा अंड्यातून पिले बाहेर येतात, तेव्हा त्यांना योग्य आहार मिळावा यासाठी कीटक, अळ्या, छोटे किडे खाद्य म्हणून भरवतात. राखी वटवट्या, दयाळ, नीलकंठ, बुलबुल, काळा थिरथिरा, कोतवाल, नवरंग, भिंगरी, वेडा राघू, शिंपी, नर्तक हे पक्षी या प्रकारात मोडतात. या गटातील पक्षी लहान मोठे कीटक व त्यांच्या अळ्यांवर उपजीविका करतात. मैना, कावळे, टकाचोर, कोकीळ, सातभाई, पळस मैना, कोतवाल, खाटीक या पक्ष्यांचा समावेश या प्रकारात होतो. हे पक्षी शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही गटांत मोडतात. धान्य कमी परंतु कीटक व छोटे प्राणी, जसे की सारडा, पाली, छोटे बेडूक यांचा समावेश पक्ष्यांच्या आहारात असतो. मांसभक्षी पक्षी हे पक्षी तीक्ष्ण शिकारी असून छोटे पक्षी, मासे यांना खातात. घुबड, गरुड, बाज, मधुबाज, घारी, शिकरा, भारद्वाज, खंड्या या पक्ष्यांचा समावेश या गटात होतो. फलाहारी पक्षी
बुलबुल, हळद्या, तांबट, नीलांग, धनेश, हरियाल, कुटूरगा या प्रकारात मोडतात. प्रजनन काळात हे पक्षी छोटे मोठे किडे खातात. फुलझाडांच्या जवळपास आपल्याला अगदी छोटे पक्षी दिसतात. फुलातील मध खाणाऱ्या पक्ष्यांची चोच लहान, गोलाकार असून त्यांचे रंग आकर्षक असतात. उदा. सूर्यपक्षी, स्पायडर हंटर इत्यादी. - nehatamhankar34@gmail.com (पदव्युत्तर विद्यार्थिनी, वन्यजीव शास्त्र विभाग, वनशास्त्र महाविद्यालय, केरळ कृषी विद्यापीठ, थ्रीसुर)