डोळे भरणे, फाटे कलम; अभिवृद्धीच्या पद्धती

उतिसंवर्धन ही अभिवृद्धीची आधुनिक पद्धत आहे. या प्रकारास ‘टिश्यू कल्चर’ अथवा ‘मायक्रो प्रोपॅगेशन’ असेही म्हणतात. या पद्धतीत वनस्पतीच्या एका पेशींपासून अभिवृद्धी केली जाते.
Forkert budding
Forkert budding

उतिसंवर्धन ही अभिवृद्धीची आधुनिक पद्धत आहे. या प्रकारास ‘टिश्यू कल्चर’ अथवा ‘मायक्रो प्रोपॅगेशन’ असेही म्हणतात. या पद्धतीत वनस्पतीच्या एका पेशींपासून अभिवृद्धी केली जाते. केळी, ऊस, साग, बांबू, जरबेरा, स्ट्रॉबेरी, डेलिया, इ. पिकांत या पद्धतीची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. डोळे भरणे (बडिंग - बड ग्राफ्टिंग) जोड कलमाचाच एक प्रकार म्हणजे डोळे भरणे होय. फरक फक्त इतकाच असतो, यात डोळकांडी (सायन) केवळ एका डोळ्याचेच असते. काही विशिष्ट वनस्पतींची अभिवृद्धी या पद्धतीने केली जाते. उदा. मोसंबी, संत्रा, गुलाब, जास्वंद, जांभूळ, सोनचाफा ही यातील महत्त्वाची उदाहरणे आहेत. अगदी दूरच्या अंतरावरून मोठ्या प्रमाणात, डोळकांड्या आणणे सोपे आणि कमी खर्चाचे व कमी त्रासाचे असते. डोळे भरण्याच्या प्रमुख पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. शील्ड बडिंग (ढाल पद्धत) ही सुलभ व सोपी पद्धत ‘टी-बडिंग’ म्हणून देखिल प्रचलित आहे. डोळा भरण्यासाठी, खुंट खोडावर इंग्रजी ‘टी’ आकाराचे दोन काप फक्त सालीवर घ्यावेत. हे आकार उलट्या ‘टी’ आकाराचे घेतल्यास त्यास ‘इनव्हर्टेड टी बडिंग’ असे म्हणतात. त्यानंतर इच्छित जातीच्या मातृवृक्षावरून ३-४ डोळे असलेल्या डोळकांड्या काढाव्यात. त्यावरील एकेक डोळा ढालीच्या आकाराचा (शील्ड) काढून घ्यावा. डोळा चाकूच्या पात्याने व आयव्हरी चपट्या टोकाने काढताना डोळ्याखालील आंतरसाल आणि डोळ्याच्या अंकुराभोवतीचा भाग सलग आणि अलगदपणे काढावा. यामुळे यास ‘शील्ड बडिंग’ असेही म्हणतात. ही पद्धत गुलाबात फारच यशस्वी, लोकप्रिय आहे. या पद्धतीत गुलाबाच्या रूट स्टॉकच्या छाट कांड्या पॉलिबॅगमध्ये लावतात. १०-१२ दिवसांत त्यांना मुळे फुटल्यानंतर खोडावर ‘टी’ पद्धतीने डोळे भरतात. पॉलिहाऊसमध्ये अथवा शेडनेटमध्ये वाढविल्यास अगदी ४-५ आठवड्यांत ही कलमे लागवडयोग्य होतात. पॅच बडिंग (ठिगळ कलम) यात वरील पद्धतीशी साम्य असले तरी ‘टी/शील्ड’ आकाराऐवजी चौकोनी आकाराचे काप व तुकडा तयार करतात. जाड साल असल्याने यास पॅच किंवा ठिगळ असे म्हणतात. पॅच बडिंग करतेवेळी पॉलिथिन पट्टीने बांधताना डोळ्याचा भाग उघडा राहील याची दक्षता घ्यावी. जाड साल असलेल्या फळझाडाच्या बाबतीत ही पद्धत अधिक सोईची ठरते. बोर, जांभूळ इ. फळझाडांमध्ये ठिगळ कलम करतात. फोरकर्ट बडिंग  या पद्धतीत पॅच बडिंगप्रमाणेच मात्र चौरसाकृती ऐवजी उभट चौकोनाच्या आकारात डोळा काढला जातो. फ्लूट बडिंग  या पद्धतीत गोलाकार पुंगळीच्या आकारात खुंटाची साल काढतात. त्याच आकारमानात डोळा, पान आणि देठासह काढून भरला जातो. रिंग बडिंग  खुंट आणि डोळा रिंग पद्धतीने (बांगडी पद्धतीने) काढून भरला जातो. चीप बडिंग  डोळा काढताना तो आंतरसालीसह खोडाच्या भागाच्या पातळ थरासह काढावा. सोईची पट्टी खुंटावर तयार करून त्यावर डोळा जरा घट्टसर बांधावा. ज्या फळझाडात अगर फुलझाडात खोडफांदीवरील साल पातळ असते. जी सहजपणे सुटत नाही, अशा वेळी चीप बडिंग पद्धत वापरतात. विभक्तपणा

  •  कंद (बल्ब) : ट्युलीप, डॅफोडील, आयरिश हिजेस्ट्रम, नार्कोसस, निशिगंध, लिली, हायसिंथस इत्यादींचे कंद विभक्त करून अभिवृद्धी केली जाते.
  •  बालकंद (कार्मलेट) : हा जमिनीखालील पसरट भाग असतो. त्यावर डोळे असतात. ते पापुद्र्यांनी झाकलेले असतात. मातृकंदाची वाढ झाल्यानंतर किंवा त्यांची वाढ होऊन फुले येऊन गेल्यावर मातृकंदाच्या वर नवीन कंद बनतात. त्यांना ‘कार्मलेट्‍स अथवा बालकंद असे म्हणतात. उदा. ग्लॅडिओलस, कोकस, फ्रिजिया इ.
  • विभाजन

  •  मुनवा (रायझो) : मुनवा म्हणजे खोडाचा अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीवर आडवा वाढणारा भाग. याचा उपयोग अभिवृद्धीसाठी केला जातो. उदा. ऊस, बांबू, केळी इ.
  •  मुगुट (क्राऊन) : मुगूट म्हणजे वनस्पतीचा जमिनीच्या वर
  • वाढणारा भाग. त्यापासून त्या वनस्पतीची अभिवृद्धी करता येते. मुगुटाचे विभाजन हे हंगामाच्या आरंभी अथवा अखेरीस करणे चांगले असते. उदा. आफ्रिकन व्हायोलिट आणि डे लिली इ.
  • ऑसफेट (ऑशफूट) : ऑसफेट म्हणजेच ठरावीक वनस्पतीमध्ये खोडाच्या तळाशी वाढणारा आडवा पसरट अवयव होय. हा भाग पुरेशा मुळ्या आल्यावरच मातृवृक्षापासून चाकूने विभक्त करून लागवडीसाठी वापरावा. उदा. खजूर.
  • (कंद (ट्यूबर) : खोडाचा जमिनीवर वाढणारा व बदललेला आकार म्हणजेच कंद (ट्यूबर) होय. कंद हा स्टोलनचाच फुगलेला भाग असतो. त्यात भरपूर कर्बोदके साठून राहतात. उदा. बटाटा, कॅलडियम, जेरूसले, आर्टीचेक इत्यादी.
  • (कंदमुळ (ट्युबरस रूट) : काही वनस्पतीत पसरट फुगीर खोड वाढते, त्यास कंदमुळ असे म्हणतात. कंदमुळाच्या एका टोकावर डोळा असून तेथून खोडाची वाढ सुरू होते. दुसऱ्या टोकाकडे मुळांची निर्मिती होते. यांच्या मधल्या भागावर डोळे अथवा पेरे नसतात. उदा. रताळे, डेलिया इ.
  • फाटे कलमे, फांजी फाटे कलमे

  • निबर काष्ठ कलमे : फाटे कलमावर २ ते ६ डोळे असावेत. फाट्याची जाडी १ ते ५ सें मी. एवढी (जाडीपरत्वे) असावी. शेंडा आणि बूड यातील फरक पटकन समजण्यासारखा नसेल तर तळाचा काप तिरपा घ्यावा. वरचा काप काटकोनात सपाट घ्यावा. निबर काष्ठ कलमे करताना फाट्यांचे शेंडे वापरू नये व पाने काढून टाकावीत. अरुंद, पानगळ व सदाहरित पानाच्या जातीची अभिवृद्धी याद्वारे करतात.
  • अर्धमृदू काष्ठ कलमे : रुंद, सदाहरित पानांच्या वृक्षापासून अशी कलमे करतात. पानगळ होणाऱ्या जातीत ही अर्धपक्व फांदीपासून अशी कलमे करता येतात. या फांद्यांची लांबी १०- १५ सें मी. एवढी ठेवावी. शेंड्याकडे काही पाने राखावीत. बुडाकडची पाने काढून टाकावीत. या फांद्यावर पाने राखली असल्यामुळे त्यावर मुळे फुटेपर्यंत ती सावलीत लावावीत किंवा तुषार सिंचनाची सोय करावी.
  • मृदूकाष्ठ कलमे : नवीन वाढीच्या शेंड्याकडील फांद्याचे फाटे या प्रकारात मोडतात. पानगळ होणाऱ्या तसेच सदाहरित वनस्पतीतही या प्रकारची कलमे केली जातात.
  • कोल काष्ठ कलमे : शेंड्याकडची पानासहित कोल फाटे कलमे या प्रकारात मोडतात. ही कलमे मातृवृक्षावरून काढताना विशेष काळजी घ्यावी. सावलीत सकाळचे वेळी कलमे काढावीत. निवडक जोरदार ८ ते १२ सें.मी.. लांबीची फाटे कलमे काढावीत. कलमे काढल्यानंतर लगेच ती मुळे फुटण्यासाठी लावावीत.
  • पान फाटे : ज्या वनस्पतीची पाने जाड आणि मांसल असतात. त्यांची पाने अभिवृद्धीक्षम असतात. पानांच्या शिरातून आगंतुक मुळे आणि फुटवे येतात. मुळे फुटून पाने आली नाहीत तर मुळे वाळून जातात. कलमे अयशस्वी होतात. उदा. पानफुटी, ब्रायोफायलम, रेक्स बेगोनिया, इ.
  •  पान देठ फाटे : पान फाटे कलमाप्रमाणेच ही कलमे असतात. फरक इतकाच की यात पानांबरोबर देठाचाही समावेश असतो. उदा. पेपरोमिया आणि सेन्सेवेरिया.
  • उतिसंवर्धित अभिवृद्धी उतिसंवर्धन ही अभिवृद्धीची आधुनिक पद्धत आहे. या प्रकारास ‘टिश्यू कल्चर’ अथवा ‘मायक्रो प्रोपॅगेशन’ असेही म्हणतात. या पद्धतीत वनस्पतीच्या एका पेशींपासून अभिवृद्धी केली जाते. केळी, ऊस, साग, बांबू, जरबेरा, स्ट्रॉबेरी, डेलिया, इ. पिकांत या पद्धतीची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. अभिवृद्धीची ही पद्धत महागडी असली तरी पुढील फायदे महत्त्वाचे आहेत.

  • मोजक्या मातृवृक्षांमधून अभिवृद्धी करता येते.
  • कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात अभिवृद्धी करणे शक्य.
  • रोगमुक्त झाडांची अभिवृद्धी करता येते.
  • अभिवृद्धीचा काळ कमी असल्याने पीक उत्पादन लवकर सुरू होते.
  • मर्यादा 

  •  प्रयोगशाळेची आवश्यक व अधिक अचूकतेची आवश्यकता असते.
  • ती खर्चिक आहे.
  • अखंडित वीजपुरवठ्याची व्यवस्था असावी लागते.
  • कुशल शास्त्रज्ञ व कामगार आवश्यक.
  • रोप-कलमांचे सशक्तीकरण (हार्डनिंग) झाडांची अभिवृद्धी करणे हा रोपवाटिकेचा प्रमख उद्देश आहे. मात्र तयार केलेल्या कलम किंवा रोपांचा काटकपणा वाढविणेही गरजेचे असते. या प्रक्रियेस ‘हार्डनिंग’ असे म्हणतात. यातून रोपवाटिकेत संरक्षित वातावरणात वाढलेल्या रोपे शेतांतही चांगल्या प्रकारे वाढू शकतात. हार्डनिंगच्या विविध पद्धती  मोकळ्या वातावरणात ठेवणे : नियंत्रित वातावरणात वाढलेल्या कलमा-रोपांना दररोज थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात मोकळ्या वातावरणात ठेवून हार्डनिंगची सुरुवात करावी. मोकळ्या वातावरणातला वेळ हळूहळू वाढवत न्यावा. पाण्याचा ताण देणे : नियंत्रित व अनुकूल वातावरणात वाढलेल्या कलमा-रोपांना थोडा- थोडा पाण्याचा ताण देऊन सुरुवात करावी. पाण्याचा ताण दिल्याने पानांची उपत्वचा कठीण होण्यास मदत होते. कलमे-रोपे शेतांमध्ये व बागेमध्ये तग धरून वाढू शकतात. वरील पद्धती झाडांच्या उष्ण कटिबंधीय जातींमध्ये वापरल्या जातात. दर्शना मोरे, ९६८९२१७७९० (सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ फळबाग महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com