कांदा पिकातील रोग व्यवस्थापन

कांदा पिकामध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. कांद्यामध्ये प्रामुख्याने मर, करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे कांद्यावरील रोग-किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार ओळखून पद्धतींचा अवलंब करावा.
Symptoms of blight and purple blight.in  onion
Symptoms of blight and purple blight.in onion
Published on
Updated on

कांदा पिकामध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. कांद्यामध्ये प्रामुख्याने मर, करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे कांद्यावरील रोग-किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार ओळखून पद्धतींचा अवलंब करावा. कांदा पिकावरील रोग काळा करपा रोगकारक बुरशी :  कोलीटोट्रीकम ग्लेओस्पोराइड्‌स (Colletotrichum gloesporoides) 

लक्षणे  सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. खरिपात रोपवाटिकेतही रोपांची पाने काळी पडून वाळतात, रोपे मरतात. उपाययोजना

  • रोपवाटिका गादीवाफ्यावर करावी.
  • पुनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी
  • खरिपात कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी.
  • शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रति हेक्टर, प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.
  • नियंत्रण (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

  •     मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा 
  •     कार्बेन्डाझिम २ ग्रॅम
  •     दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. 
  • तपकिरी करपा  रोगकारक बुरशी : स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम (Stemphylium vesicarium)  लक्षणे 

  • या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो. 
  • पानाच्या बाह्य बाजूवर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. 
  • फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात. 
  •   उपाययोजना

  • पिकांची फेरपालट करावी.
  • प्रादुर्भाव दिसल्यानंतर, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम अधिक स्टिकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने फवारावे. 
  • पांढरी सड रोगकारक बुरशी :  स्क्लेरोशियम रॉल्फसी (Sclerotium rolfsii) लक्षणे  रोपांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरील भाग पिवळा पडतो. पाने जमिनीवर कोलमडतात. कांद्यावर कापसाप्रमाणे पांढरी बुरशी वाढून त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सडतो. उपाय

  • एकाच शेतात वर्षानुवर्षे कांदा लागवड करणे टाळावे. कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी. 
  • लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. 
  • रोपांची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात २ मिनिटे बुडवून ठेवावीत.
  • मूळकूज रोगकारक बुरशी - फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम (Fusarium oxysporum)  लक्षणे पाने पिवळी पडतात. पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात. मुळे कुजून काळसर तपकिरी होतात. रोप सहज उपटून येते.

    उपाय पिकाची फेरपालट करावी. जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात तापू द्यावी. थायरम २ ग्रॅम प्रति किलो या बीजप्रक्रियेने फायदा होतो. पुढे प्रादुर्भाव आढळल्यास शेणखतासोबत ट्रायकोडर्मा व्हिरीडी एकरी ५ किलो या प्रमाणात मिसळावे.

    जांभळा करपा रोगकारक बुरशी :  अल्टरनेरिया पोराय (Alterneria porri) लक्षणे

  • पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपवाटिका तसेच बीजोत्पादनाची लागवड तसेच रांगड्या कांद्यावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो. 
  • सुरुवातीस पानावर लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. 
  • रब्बी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत पाऊस किंवा ढगाळ वातावरण असल्यास रोगाची तीव्रता वाढते.
  • उपाययोजना 

  • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल ०.१ मिलि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून १२ ते १५ दिवसांच्या अंतराने फवारावे. 
  • नत्रयुक्त खतांचा जास्त आणि उशिरा वापर करू नये. पिकांची फेरपालट करावी.
  • मर रोग रोगकारक बुरशी : स्क्लेरोशियम रॉल्फसी (Sclerotium rolfsii) लक्षणे रोप उगवून वाढताना या बुरशीचे धागे रोपाच्या जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करतात. रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगतच्या भागावर पांढरी बुरशी वाढते. त्यावर बारीक पांढरे बीजाणू तयार होतात. थोड्याच दिवसांत हे दाणे मोहरीच्या आकाराचे बनतात. हे दाणे जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहतात. यामुळे या शेतात पुन्हा कांद्याची लागवड केल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. उपाययोजना

  • रोपे नेहमी चांगला निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये व गादीवाफ्यांवर तयार करावीत. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. बीजप्रक्रियेने रोग आटोक्यात राहतो. मात्र रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम किंवा थायरम २ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
  • रोपे नेहमी गादीवाफ्यांवर तयार करावीत. गादीवाफ्यांवर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. 
  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम किंवा कॅप्टन २-३ ग्रॅम या प्रमाणात चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे चोळावे. 
  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम किंवा थायरम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
  • - डॉ. राजीव काळे,  ९५२१६७८५८७. डॉ. शैलेंद्र गाडगे,  ९९२२४९०४८३ (भाकृअनुप - कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com