बाभूळ हे सर्व प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात येणारी प्रजाती आहे. पानांमध्ये प्रथिनांचे प्रमाण १४ ते २० टक्के आहे. तुती पानांमध्ये प्रथिने, खनिजांचे चांगले प्रमाण असते. शेवरीमध्ये २० ते २५ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.हे झाड बहुउपयोगी आहे. बाभूळ ही सदाहरित, बहूद्देशीय, नत्र स्थिरीकरण करणारी व मध्यम आकाराची वृक्ष प्रजाती आहे. सामान्यपणे ही प्रजाती रस्ते, शेताच्या बांधावर, गायरान, पडीक जमीन, तलावाच्या बंधाऱ्यावर आढळली जाते. सामू ७ पेक्षा जास्त असलेली जमीन व क्षारपड, चिबड, चोपण प्रकारच्या खराब जमिनीमध्ये वाढलेली दिसते. कमी पाऊस व शुष्क हवामानामध्ये जास्त प्रमाणात आढळते. बाभळीचा उपयोग शेती अवजारे जसे की बैलगाडी, कुळव, कुरी, कोळपे व मोगणा निर्मिती, जळाऊ लाकूड, चाऱ्यासाठी, डिंक, टॅनिन, कोळसा तयार करण्यासाठी केला जातो. पानांमध्ये प्रथिनांचे प्रमाण १४ ते २० टक्के आणि शेंगामध्ये ११ ते १६ टक्के असल्यामुळे मेंढी व शेळी यांना चारा टंचाईच्या काळात खाद्य म्हणून वापर केला जातो. बीजवृक्ष निवड
आपल्या देशात तीन प्रकारच्या बाभळीच्या प्रजाती आढळतात, यामध्ये तेलीया/गोडी, वेडी व रामकाटी अशा प्रजाती आहेत. लागवडीसाठी बिया सरळ, दंडगोलाकृती, कमी काटे असलेल्या मध्यम वयाच्या वृक्षापासून मे-जून महिन्यामध्ये गोळा कराव्यात. बाभळीच्या बिया गोणपाट, डबे किंवा कापडी पिशवीमध्ये ठेवून त्या कोरड्या व थंड ठिकाणी साठवाव्यात. तपकिरी-काळ्या रंगाच्या, ७-८ मिमी व्यास असलेल्या बियांची जून किंवा जुलै महिन्यात लागवड करता येते. या बियांचे बाहेरील आवरण खूप कठीण आणि टणक असल्यामुळे बीजप्रक्रिया गरजेची राहते. चांगल्या उगवण क्षमतेसाठी बिया सुमारे ४८ तास थंड पाण्यामध्ये भिजवून घ्याव्यात. एका किलो बियांपासून सुमारे ४००० रोपे तयार केली जाऊ शकतात. एका वर्षाची रोपे शेताच्या बांधावर किंवा कंटूर वरती ५ ते १० मिटर अंतरावर लावू शकतो. तसेच बीजप्रक्रिया केलेल्या बिया पहारीने खड्डे करून जून महिन्यामध्ये पडीक, बरड आणि रस्त्यांच्या दुतर्फा लावता येतात. वनशेतीमध्ये ५ × ५ मी किंवा ६ × ५ या अंतरावर रोपांची लागवड करून चारावर्गीय आंतरपिकांची (स्टायलो, गोकर्णी, दीनानाथ, अंजन, पवना व गिनी) लागवड करता येते. रोप लावताना प्रती खड्डा १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. शेताच्या बांधावर लावलेल्या रोपांना विशेष खते आणि पाण्याची गरज सहसा भासत नाही. परंतु पडीक जमिनीवर लावलेल्या रोपांना पहिल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता भासते. वनीयकुरण पद्धतीमध्ये लावलेल्या रोपांना प्रती हेक्टरी ५० किलो स्फुरद, २५ किलो पालाश ही खतमात्रा लागवडीवेळी द्यावी. सरासरी ४ ते ६ वर्षांच्या झाडाच्या ३० ते ४० टक्के फांद्या मार्च ते मे महिन्यामध्ये छाटणी करून ३ ते ४ किलो हिरवा चारा आणि २ ते ३ किलो शेंगा मिळतात. दुष्काळी भागामध्ये शेळी व मेंढी चारणारे लोक बाभळीच्या झाडाला ७० ते ९० टक्के छाटतात. टंचाईच्या काळात बाभूळ चारा मिळण्याचा शाश्वत स्रोत आहे. भारतीय चारा आणि गवताळ प्रदेश संशोधन संस्थेने गवत आणि बाभूळ आधारित पद्धतीमध्ये गवतापासून ५ ते ६ टन आणि वृक्षांपासून प्रतिवर्ष २ टन चारा, २० किलो शेंगा प्रति वृक्ष आणि ३ ते ५ टन जळाऊ लाकूड मिळू शकणारी पद्धती पडीक जमिनीसाठी विकसित केली आहे. चाऱ्यासाठी तुती उपयुक्त तुती हे सर्व प्रकारच्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येते. या चारा पिकास विविध प्रकारची जमीन आणि कमी ते मध्यम पाऊस (६०० ते २५०० मिमी) योग्य असतो. आपल्याकडे तुतीचा मुख्य वापर रेशीम उद्योगामध्ये केला जातो. या व्यतिरिक्त तुतीची पाने प्रथिने (२०-२२ टक्के), खनिजे (१०-१२ टक्के) विशेषतः: कॅल्शिअम (१.५-२ टक्के) आणि पोटॅशियम (१-३ टक्के) आणि चयापचयक्षम ऊर्जामध्ये समृद्ध असल्यामुळे शेळ्या आणि मेंढयांना चारा म्हणून देखील वापरतात. जाती व्ही१ (विक्टोरी), विशाला, कन्वा-२, एस-३२ आणि अनंथा या जाती लागवडीस वापरल्या जातात. महाराष्ट्रामध्ये व्हाइट मलबेरी या प्रजातीची लागवड केली जाते. लागवड तंत्र
लागवडीस १० ते १२ महिन्याच्या अंगठ्याच्या जाडीच्या (३-४ सेंमी व्यास) फांद्यांपासून तीन ते चार डोळे असलेले २० ते २२ सेंमी तुकडे (कटिंग) जून-जुलै महिन्यांमध्ये गादी वाफ्यावर, प्लॅस्टिक पिशवीमध्ये किंवा तयार शेतामध्ये लावता येतात. लावण्यापूर्वी कटिंग कार्बेन्डाझिमच्या द्रावणात भिजवून ४.५ × १ फूट किंवा गादी वाफ्यामध्ये ३० × १० सेंमी. वर लागवड करावी. कटिंगची संख्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि हवामानावर ठरवावी. तुती लागवड शेताच्या बांधावर किंवा सजीव कुंपण म्हणून शेताच्या चहूबाजूंनी जोड ओळींमध्ये ३० सेंमी वर करावी. वनशेतीमध्ये दोन्ही ओळीतील अंतर ३ ते ४ मिटर ठेवल्याने आंतरपीक (चवळी, गिनी, स्टायलो, कडधान्ये) घेता येते. मशागतीच्या वेळी प्रती हेक्टरी १०-१२ टन कुजलेले शेणखत मिसळावे. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० स्फुरद आणि ५० किलो पालाश दोन हप्त्यामध्ये विभागून द्यावे. बागायती क्षेत्रामध्ये रासायनिक खतांची मात्रा प्रति हेक्टरी ३५० किलो नत्र, १४० स्फुरद आणि १४० किलो पालाश दुसऱ्या वर्षीपासून द्यावे. पाणी उपलब्धतेवर एकूण छाटणीची संख्या व उत्पादन अवलंबून आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये १५ दिवसातून एकदा पाणी द्यावे. लागवडीच्या ४ ते ६ महिन्यांनंतर पहिली छाटणी २० ते २५ सेंमी उंचीवर धारदार विळ्याने करावी. बागायतीमध्ये ४ ते ५ वेळा छाटणी करून हेक्टरी सुमारे ४० ते ५० टन आणि कोरडवाहूमध्ये २ ते ३ वेळा छाटणी करून १२ ते २० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. शेवरी ही शुष्क हवामानात वेगाने वाढणारी, नत्र स्थिरीकरण करणारी, द्विदल वर्गीय, उथळ मूळ प्रणाली असणारी वृक्ष प्रजाती आहे. याची उंची सामान्यपणे २ ते ८ मीटर आहे. शेवरीमध्ये २० ते २५ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.हे झाड बहू-उपयोगी असून चारा, हिरवळीचे खत, जळाऊ लाकूड, दोर निर्मिती वापरले जाते. वालुकामय, मुरमाड, पडीक ते भारी जमिनीमध्ये वाढते. बिया लागवडीसाठी वापरल्या जातात. बियांना २४ तास पाण्यामध्ये भिजवून घेऊन लागवड केल्यास ८० टक्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता मिळते. पावसाळ्यामध्ये लागवड केल्यास झाडांची मर कमी होते. सजीव कुंपण म्हणून एका ओळीत १ मिटर किंवा जोड ओळीमध्ये ५० सेंमी x ३० सेंमी वर लागवड करावी. सघन पद्धतीमध्ये १ मी × १ मी वर लागवड करावी. वनीयकुरण पद्धतीमध्ये ४ ते ६ मीटर अंतरावरील ओळींमध्ये लागवड करावी. जेणेकरून आंतरपीक म्हणून वेगवेगळ्या चारा पिकांची लागवड शक्य आहे. वेलवर्गीय फळभाजी, काळी मिरी, पान मळ्यांमध्ये आधारासाठी शेवरी लागवड करतात. तसेच हळद, आले, ऊस आणि केळीच्या चहूबाजूंनी वारारोधक म्हणून शेवरी लागवड करतात. लागवडीपूर्वी आणि दुसऱ्या वर्षापासून प्रति हेक्टरी १० ते १२ टन शेणखत पावसाळ्यामध्ये जमिनीत मिसळावे. हिरव्या चाऱ्यासाठी ५० किलो युरिया, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टरी वापरावे. भरपूर पाण्याची उपलब्धता असेल तर माती परीक्षण करून खतांची मात्रा द्यावी. उन्हाळ्यामध्ये महिन्यातून एकदा पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिली छाटणी सहा महिन्यानंतर जमिनीपासून सुमारे ६०-१०० सेंमी उंचीवर धारदार विळ्याने करावी. साधारणपणे दुसऱ्या वर्षांनंतर वर्षातून ४ ते ५ वेळा म्हणजेच ६० ते ७० दिवसांच्या अंतराने छाटणी करू शकतो. अनुकूल परिस्थितीमध्ये प्रती हेक्टरी २० ते २५ टन हिरवा चारा मिळतो. - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)