गहू, ज्वारीला द्या संरक्षित पाणी

बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर उर्वरित नत्राची मात्रा द्यावी. पीक वाढीच्या टप्यानुसार पाणी द्यावे. ज्वारी पिकाला संरक्षित पाणी मिळाल्याने निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते.
It is important to irrigate the wheat crop during the critical stages of growth.
It is important to irrigate the wheat crop during the critical stages of growth.

बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर उर्वरित नत्राची मात्रा द्यावी. पीक वाढीच्या टप्यानुसार पाणी द्यावे. ज्वारी पिकाला संरक्षित पाणी मिळाल्याने निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे.पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी एक क्विंटल उत्पादन कमी येते.त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. तरी देखील खरिपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. त्यादृष्टीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व आंतरमशागतीचे नियोजन आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन  भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या सहा पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात, तर हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.

  • मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी): या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत.फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो. उत्पादनात घट येते.
  • फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी):ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.
  •  पीक फुलोऱ्यास येणे (पेरणीनंतर ७०-८०- दिवसांनी) : परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.
  • दाण्यात चीक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी) : या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.
  •  दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणीनंतर ११० दिवसांनी) : या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
  • ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास आणि एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी द्यावे.

  •  एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी द्यावे.
  •  दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी द्यावे.
  • तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे.
  • चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी, तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे. चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी द्यावे.
  • पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी तर तिसरे ५५-६० दिवसांनी, चौथे पाणी ७०-८० दिवसांनी, तर पाचवे ९०-१०० दिवसांनी द्यावे.
  • आंतरमशागत  पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तण नियंत्रण करावे. गव्हात चांदवेल, हरळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. उर्वरित नत्राची मात्रा 

  •  बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रति हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रति हेक्टरी ४५ किलो नत्र (९८ किलो युरिया) द्यावा.
  • पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९)
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (१० लि. पाण्यात २०० ग्रॅम युरिया)
  • ज्वारीला द्या संरक्षित पाणी बहुतांश तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या आहेत. सध्या ज्वारीची पिके पोटरीत तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. ज्वारी पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात जास्त ओलाव्याची गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात फारच घट येते. साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते. या वेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकांची वाढ शेवटच्या पानांपर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी ज्यांच्याकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी द्यावे. पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्ये ताटातून कणसात जाण्यासाठी मदत होते. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते.

  • कोरडवाहू ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावर अवलंबून असते. जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात.
  • पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरवात होते. सद्यपरिस्थितीत बहुतेक ठिकाणी पोटरी अवस्था तर काही ठिकाणी ज्वारी फुलोऱ्यात आहे. बहुतांश जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत.
  • पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकामध्ये दातेरी कोळप्याने कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. या वेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते. दातेरी कोळप्याच्या दातऱ्याचा कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल असा असावा. दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते. या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोऱ्यास होईल. नंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते. तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीचे पीक हाती येण्यास हमखास यश येते.
  • पाणी देण्याच्या अवस्था  १) जोमदार वाढीचा काळ (पेरणीनंतर २८ ते ३० दिवस) २) पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) ३) पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) ४) दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस)

  • सर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी द्यावे.
  • पेरणी झाल्यानंतर ९० ते ९५ दिवसांत दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते. भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्कील होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.
  • कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर दिसून आली आहे. कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पीक वाचविता येते.
  • एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा ५० ते ५५ दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते. दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी २८ ते ३० व दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. संरक्षित पाणी दिल्यास ज्वारी उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होते.
  • संपर्क : डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com