जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. या पिकाच्या लागवडीला चांगली संधी आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाची वर्षातून तीन वेळेस कापणीला येते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. जिरॅनियम पाल्यापासून तेल काढतात. सुगंधी तेल साठविण्यासाठी गडद अंबर रंगाच्या बाटल्या वापराव्यात. लागवड तंत्र
लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारचा निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही लागवड शक्य आहे. सुरवातीला नांगरणी केल्यानंतर दोनदा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर गादी वाफे बनवून लागवड करावी. लागवडीसाठी अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय. आय. एच. आर. - ८, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन या जाती उपलब्ध आहेत. रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालावधी योग्य आहे साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या लागवडीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते. लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात. रोपांची तंतुमय मुळे चांगल्याप्रकारे वाढलेली असावीत. त्यामुळे रोपांची मातीतून अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. रोपे तयार करण्यासाठी सपाट, मध्यम खोलीची, कसदार, निचरा होणारी जमीन असावी. रोपवाटिकेला पाणी देण्याची सोय असावी, पाणी क्षारयुक्त नसावे. लागवड ६० X ६० सें. मी. किंवा ७५ X ६० सें. मी. अंतरावर करावी. या पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करू शकतो. शेवग्याच्या उत्पादनामध्ये जिरॅनियम लागवडीचा खर्च निघू शकतो. चांगल्याप्रकारे कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे. प्रति हेक्टरी २०० किलो नत्र,३५ किलो स्फुरद आणि ३५ किलो पालाश द्यावे. २० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्यावेळी आणि उर्वरित ८० टक्के नत्र लागवडीनंतर ३०, ४५, ६० आणि ७५ दिवसांनी समान हप्त्यात विभागून द्यावे. यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. आंतरमशागत १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर रोपांना भर द्यावी. पाणी व्यवस्थापन
सुरवातीचे म्हणजे पहिले पाणी लागवडीनंतर लगेच द्यावे. यामुळे रोपांची योग्य वाढ होते. रब्बी हंगामात साधारणपणे ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामात पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. पीक वाढीच्या काळात पाण्याचा योग्य वापर करावा. दोन पाण्याच्या पाळ्यांमध्ये मोठा खंड पडू देऊ नये. तसेच गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर केल्यास मूळ कूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साह्याने कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नसते.हेच पीक तीन वर्षापर्यंत चालते. पानांचा थोडासा रंग हा फिक्कट पिवळसर होण्यास सुरवात झाल्यावर तसेच सुगंध हा गुलाबासारखा येण्यास सुरवात झाल्यावर कापणी करावी. तेलात जिरॅनियम आणि सिट्रोनेलॉल आहे.याचा वापर उपचार पद्धतीमध्ये होतो. तेलास सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर निर्मितीसाठी मागणी. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती. संपर्क - डॉ. संदीप मोरे, ९२८४१९२१८८ (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड)