पानवेलीमधील उतरण

आपल्याकडे पानवेलीमधील उतरण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करतात. पानवेळीचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी उतरण क्रिया व्यवस्थित होणे गरजेचे आहे.
मर रोगग्रस्त पानवेल
मर रोगग्रस्त पानवेल

आपल्याकडे पानवेलीमधील उतरण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करतात. पानवेळीचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी उतरण क्रिया व्यवस्थित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा विचार करता जळगाव, श्रीरामपूर, सातारा, सांगली, जत, संग्रामपूर, बुलढाणा, अकोट, रामटेक, वडनेरभैरव, नांदुरा, माहूर या पट्ट्यात पानवेलीची लागवड आहे. मध्यम खोल ते उथळ, निचरा होणारी व सामान्य सामू, शेणखतयुक्त असलेल्या जमिनीत पानवेलीची वाढ चांगली होते. शेवगा, पांगारा, सिसम इत्यादी मोठ्या झाडाच्या सावलीत त्यांच्या आधारावर किंवा त्यांचा आडोश्यावर बांबूच्या साथीने पानवेल लागवड केली जाते. भारतात मीठापान, बांग्ला पान, माघई, कपूरी, कलकत्ता, रामटेक, घनघटी, काराप्को या पानवेल वाणांची लागवड सावलीत किंवा पॉलिहाऊसमध्ये केली जाते. पीक व्यवस्थापन 

 • एकदा लागवड केलेली पानवेल ४ ते ५ मीटर उंचीवर गेल्यानंतर ही वेल आधारावरून सोडवून कट करून नवीन खड्ड्यात पुरतात. उसाप्रमाणे खोडवा ठेवतात, त्यास उतरण म्हणतात.
 • आपल्याकडे हे काम शक्यतो फेब्रुनवारी ते मार्च महिन्यात केले जाते. यामध्ये पूर्ण वाढ झालेली वेल ही तिच्या आधारावरून मोकळी सोडून त्याच ठिकाणी खड्डा करून इंग्रजी आठ (8) आकड्याचा आकार करून पुरतात.
 • पानवेळीचे चांगले उत्पादन मिळावे, यासाठी उतरण क्रिया व्यवस्थित होणे, वेलीस इजा टाळणे, त्यानंतर डेरेदार फुटवे येणे, मरग्रस्त फुटवे टाळणे गरजेचे आहे. यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 • उतरण केल्यानंतर वेलीस नवीन फुटवे येतात,त्यांची वाढ होते.पहिल्या वर्षीपेक्षा पानाचे उत्पादन अधिक येण्यासाठी उतरण क्रिया महत्वाची आहे.
 • उपाययोजना 

 • उतरण करताना पानवेल ही मर रोगग्रस्त नसल्याची खात्री करावी. मर रोगामुळे पूर्ण वेल सुकते.पाने पिवळी पडून गळून पडतात. वेलीचे ७५ ते ९० टक्के नुकसान होते. त्यामुळे मर रोगग्रस्त वेल नष्ट करावी. या वेलीची उतरण करू नये. त्याजागी रोगमुक्त, निरोगी नवी वेल लावावी.
 •  उतरण करताना वेलीवरील पाने काढून टाकावीत. अधिकच्या फांद्या काढून टाकाव्यात. पाणी देण्याचे नियोजन करावे.
 •  उतरण करण्यापूर्वी सर्व जागा स्वच्छ करावी, मजूरांकरावी खोल नांगरट करून जमीन भूसभूशीत करावी.
 •  बुरशीजन्य ठिपके रोग नियंत्रणासाठी पूर्ण वेलीवर बोर्डो मिश्रण (०.५ टक्के) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.ज्या खड्यात वेल सोडायची आहे, त्यामध्ये 'ट्रायकोडर्मा प्लस ५ ग्रॅम मातीत मिसळावे. गरजेनुसार बोर्डो मिश्रण (०.२५ टक्के) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. याच प्रमाणात वेलीवर दर महिन्याला फवारणी करावी.
 • खत व्यवस्थापन 

 • पानवेलीस प्रति हेक्टरी शेणखत १२ ते १५ टन किंवा गांडूळ खत ५ टन मात्रा द्यावी. चांगले कुजलेले लेंडीखत ५ टन किंवा नीम पेंड १ टन प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे.
 • रासायनिक खते द्यावाची झाल्यास १५० किलो नत्र, १०० किलो स्फूरद, ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. नत्र देताना ७५ किलो नत्र हे नीम पेंड व उर्वरित ७५ किलो नत्र युरियातून तीन हफ्तात विभागून १५ ते २० दिवसाच्या अंतराने द्यावे.
 • गरजेनुसार इन्डॉल ३ ब्युट्रीक ॲसीड (५०० पीपीएम) या वाढ संवर्धकाची ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी (तमिळनाडू कृषी विद्यापीठ).
 • पालाश खतांची मात्रा वेलीवरील रोगांचे प्रमाण कमी करतात.
 • एकात्मिक रोग व्यवस्थापन

 • पावसाळ्यापूर्वी बोर्डो पावडर (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्यानंतर एक महिन्याने (पावसाळ्यानंतर) ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ ग्रॅम प्रमाणे द्यावे. गरजेनुसार पुन्हा बोर्डो पावडर १ टक्के प्रमाणे द्यावे.
 • पानवेल सावलीत, आर्द्रतायुक्त वातावरणात वाढत असल्याने जैविक खते (सुडोमोनास फ्लुरोसन्स १० ग्रॅम प्रति वेल आणि बॅसिलस सबटिलीस १० ग्रॅम प्रति वेल) द्यावे. जैविक कीडनाशके जसे की, मेटारायझिअम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. यांच्या वापरामुळे जिवाणूजन्य, बुरशीजन्य ठिपके आणि मर रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे होण्यास मदत होते.
 • - पोपट खंडागळे ७३८७५०५०५७ (पानवेल संशोधन प्रकल्प, कृषी संशोधन केंद्र, जळगाव) टीप- पीक संरक्षणाच्या अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत तमिळनाडू कृषी विद्यापीठ व पानवेल संशोधन केंद्र, मदिना, पश्चिम बंगाल यांच्या शिफारसींचा आधार घेण्यात आला आहे.

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com