जोहडमुळे अवतरले गोकूळ

वातावरण बदलाच्या प्रभावातही राजस्थानातील गोपालपुरा (जि. अल्वार) या गावातील लोक आनंदाने राहत आहेत. त्याला कारण ठरले आहे गावातील प्राचीन जोहडचे पुनरुज्जीवन. त्यातून अरवलीचा डोंगर शेजारी असलेल्या या गावात पाणी आले. तिन्ही हंगामांत शेती शक्य झाली.
गावातील छोट्या मोठ्या जोहडचे पुनरुज्जीवन केल्यामुळे गावात पाणी मुरले, विहिरींना पाणी आले. महिलांचे हाल वाचले. जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय झाली.
गावातील छोट्या मोठ्या जोहडचे पुनरुज्जीवन केल्यामुळे गावात पाणी मुरले, विहिरींना पाणी आले. महिलांचे हाल वाचले. जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय झाली.

वातावरण बदलाच्या प्रभावातही राजस्थानातील गोपालपुरा (जि. अल्वार) या गावातील लोक आनंदाने राहत आहेत. त्याला कारण ठरले आहे गावातील प्राचीन जोहडचे पुनरुज्जीवन. त्यातून अरवलीचा डोंगर शेजारी असलेल्या या गावात पाणी आले. तिन्ही हंगामांत शेती शक्य झाली. त्याला जोड म्हणून पशुधन मुबलक, विपुल वृक्षराजी. इथे कृष्णाच्या भूमिकेत होती, तरुण भारत संघ ही सामाजिक संस्था. त्यानेच वातावरण बदलरूपी कंसाला नेस्तनाबूत करून टाकले. भारतीय संस्कृतीमध्ये महाभारताचे महत्त्व मोठे आहे. या महाकाव्यात काय नाही, ते विचारा. अगदी महाकवी व्यासाने स्पर्श केला नाही, असा एकही विषय जगात नसल्याचे सांगितले जाते. (व्यासोच्छिष्टम् सर्व जगत). त्यातील गीता व अन्य तत्त्वज्ञानापेक्षा हा ग्रंथ मला आवडतो तो निसर्गरम्य अशा गोकुळामुळे. यमुना तीरावरील निसर्गरम्य गोकूळ. तेथील गोप, गोपिका, गोधन, दूधदुभत्याची रेलचेल, गोवर्धन पर्वत, वाहती यमुना, गोकुळास संपन्न करणारा कृष्ण. या हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथामध्ये नमूद केलेली वर्णने, गोकूळ आपल्याला कधी पाहायला मिळणार, असा विचार माझ्या मनात सतत येत असतो. पण या गोकुळाला सतावणारा एक मथुरेचा राजा कंस होता. तसेच वातावरण बदलाच्या राक्षसाने सतावून सोडलेले गाव सतत समोर येत राहतात. पण आश्‍चर्य म्हणजे असे गाव मला राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यात पाहावयास मिळाले. योगायोगाने त्या गावाचे नावही होते गोपालपुरा. मागील आठवड्यातच मी या गावास भेट दिली. वातावरण बदलाच्या प्रभावातही या गावातील लोक आनंदाने राहत होते. पशुधन मुबलक, विपुल वृक्षराजी, अरवलीचा डोंगर शेजारी असलेल्या या गावात कृष्णाच्या भूमिकेत होती, तरुण भारत संघ ही सामाजिक संस्था. त्यानेच वातावरण बदलरूपी कंसाला नेस्तनाबूत केलेले.

जयपूर - दिल्ली राज्य महामार्गापासून दोसा मार्गे सुमारे १३० कि.मी. अंतरावर गोपालपुरा हे गाव. या गावाजवळ तीन कि.मी. अंतरावर भिकमपुरा या गावात तरुण भारत संघाचा आश्रम आहे. तिथे जलपुरुष अशी ख्याती असलेल्या डॉ. राजेंद्रसिंह यांचे कार्य पाहता येते. वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडलेल्या राजस्थानमधील शेकडो गावातील एक गाव म्हणजे गोपालपुरा. या गाव आणि परिसरात पाण्याचे अतिशय हाल, प्रखर उष्णता, विहिरी कोरड्या पडलेल्या. महिला आणि मुलींना आठ ते दहा कि.मी. वरून पाणी आणावे लागे. पाण्याअभावी मुलींचे शिक्षण थांबलेले. मॉन्सूनमध्ये पडलेल्या थोड्या फार पावसावर शेती अवलंबून. रब्बीचे पीक तर गावाने कित्येक वर्षांमध्ये पाहिलेलेच नव्हते. अशा दयनीय स्थितीतही लोक परिस्थितीशी झगडत, पण कधी तरी बदल होईल या आशेने गावात राहत होते. तिथे पोहोचला डॉ. राजेंद्रसिंह व त्यांच्या कार्यकर्त्यांचा तरुण भारत संघ. तेथील पाणी समस्या कायमची सोडविण्याची प्रतिज्ञा घेत. गाव परिसरातील पुरातन पाणी साठे कोरडे पडले होते. या पाणी साठ्यांना स्थानिक भाषेमध्ये ‘जोहड’ म्हणतात. हे सर्व जोहड जिवंत करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह यांनी लोकसहभाग मिळवला. प्रत्येकाच्या धडपडीला यश आले. जोहडला लागूनच काही अंतरावर असलेल्या लोकांच्या लहान विहिरी होत्या. त्यातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाई. मात्र जोहडच कोरडे पडल्यामुळे विहिरीमध्येही पाण्याचा थेंबही नव्हता. १९८६ मध्ये तरुण भारत संघाने गोपालपुरा गावामधील शेतकऱ्यांना बरोबर घेत जोहडमधील माती, दगड बाहेर काढले. ते खोल केले. सुदैवाने त्याच वर्षी पाऊसही पडला. जोहड पाण्याने भरून गेला. पाणी जमिनीत मुरले. पुढील वर्षी परत पाऊस पडला. पुन्हा जोहड पाण्याने भरला. दुसऱ्या वर्षी मात्र जोहड खाली असलेल्या विहिरींना पाणी आले. गावात दिवाळी साजरी झाली. तरुण भारत संघ आणि गावाला हुरूप आला. संघाने पुन्हा गावकऱ्यांना सोबत घेत गाव परिसरामधील २१ जोहडचे पुनरुज्जीवन केले. त्यास जोडलेल्या ३६ विहिरीही जिवंत झाल्या. शाश्‍वत झाल्या. गावात प्रथमच इतके पाणी दिसले. खरीप, रब्बीच काय, पण उन्हाळ्यातही येथील शेती हिरवी झाली. विहिरीमधील पाण्याचा वापर अत्यंत कार्यक्षम करण्यासाठी, अपव्यय कमी करण्यासाठी शेतकरी आणि तरुण भारत संघ पुन्हा एकत्र आले. त्यांनी गावामधील सर्व कृषी क्षेत्राला सिंचन करण्यासाठी जमिनीखालून पाइप टाकले. ते एकमेकांस जोडून ठरावीक अंतरावर तुषार सिंचनाचे नोझल बसवले. आता फवारा पद्धतीने पिकाला पाणी दिले जाते. या सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया जात नाही. पुनरुज्जीवित केलेल्या २१ जोहडांपैकी काही फक्त भूगर्भात पाणी जिरवण्यासाठी राखीव ठेवले आहेत, तर काही पाळीव जनावरांना पाणी पिण्यासाठी. परिसरात जंगल असल्यामुळे पाण्यावाचून व्याकूळ होणारी वन्यपशू, अगदी श्‍वापदेही येथे येऊन तृप्त होत आहेत. मनुष्य आणि वन्य प्राणी यांचे संघर्ष येथे पाहावयास मिळत नाही. या गावात प्रवेश करताच अनेक मोर आपल्या पिसांचा फुलोरा फुलवीत तुमचे स्वागत करतात ते याचमुळे. गोपालपुराची लोकसंख्या जेमतेम १५०० म्हणजेच सव्वाशे उंबऱ्यांचे गाव. येथे प्रत्येकाकडे पशुधन आहेच. त्याचबरोबर स्वतः तयार केलेले सेंद्रिय खतसुद्धा. गावामध्ये खरिपात मका आणि बाजरी, तर रब्बीमध्ये मोहरी, हरभरा, गहू आणि जव. तर उन्हाळी पिकामध्ये फळ भाज्या अशी पीक पद्धती बसवलेली आहे. आज हे गाव संपूर्ण सेंद्रिय आहे. खरीप आणि रब्बीचे उत्पादन शेतकरी त्यांच्या घरातच वापरतात. मात्र उन्हाळ्यात तयार झालेला विविध भाजीपाला परिसरामधील मोठ्या गावांमध्ये, अगदी जयपूर आणि दिल्लीपर्यंत पहाटेच पोहोचविला जातो. गोपालपुरामधील तुषार सिंचनावर वाढलेली उन्हाळी सुवासिक कोथिंबीर पहाटेच दिल्लीला पोहोचते. तिथून ती विदेशात जाते. एकेकाळी अठरा विश्‍व दारिद्र्याने ग्रासलेले शेतकरी झोपडीवजा घरात राहत. आलेल्या पाहुण्याला पाणी कोठून द्यायचे, हा प्रश्‍न असे. हातात पाण्याच्या तांब्याऐवजी गुळाचा खडा टेकवत. आज गाव पूर्ण बदलले आहे. प्रत्येकाची घरे पक्की (सिमेंटची) झाली आहेत. पण गावपण अजून जपलेले आहे.

गावात एक तेजा महाराजांचे मंदिर आहे. आणि सोबत कित्येक वर्ष पेटलेला अग्नी असलेली धुणीसुद्धा. लोक संध्याकाळी एकत्र बसून सुखदु:ख वाटून घेतात. त्यात सर्व धर्मीयांचा सहभाग असतो. गावामध्ये कुठेही कचरा घाण नाही. शेतीमध्ये उत्पादित मोहरीचे गावामधील घाण्यामधून तेल काढले जाते. त्याची पेंड दुभत्या जनावरांच्या आहारात जाते. गोपालपुरामध्ये आज ५०० म्हशी, काही गायी आणि अनेक शेळ्या आहेत. सर्व पाळीव पशू अरवली डोंगर परिसरात चरावयास जातात. दूध डेअरीला घातले जाते. एकत्र कुटुंब पद्धती प्रत्येक घरात होती. पूर्वी या गावामधील मुलींना आईबरोबर पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागे. अनेक वेळा पाणी आणण्यासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत येरझाऱ्या सुरू असत. पाण्यामुळे मुली शिक्षणास पूर्ण पारख्या झाल्या होत्या. पाण्याची भटकंती थांबली. जात्याच हुशार मुली शालेय शिक्षण पार पाडून अगदी आग्रा, जयपूर, दिल्ली येथे उच्च शिक्षणासाठी जात आहेत. काही जणी तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्यामधील हा आत्मविश्‍वास पाण्यामुळेच आला असे गावामधील बुजुर्ग मला सांगत होते. तरुण भारत संघाने गोपालपुराला पाण्याची श्रीमंती दिली. त्यासोबत ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा सोडू नको’ हा मंत्रही दिला. आज हे गाव सुजलाम् सुफलाम् झाले आहे. आपण मागे कशामुळे? पूर्वी येथील शेतकरी पाटाने शेतीला पाणी देत. संस्थेने स्वखर्चाने महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जैन इरिगेशनला भेट देण्यासाठी नेले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळाले. आणि गावामधील पाण्याचे पाट कायमचे बंद झाले. एकेकाळी गोपालपुरामधील अनेकांना पाण्याच्या कमतरतेमुळे स्थलांतर करावे लागले होते. आज हे स्थलांतर थांबले आहे. उलट अन्य गावातील लोकांना येथे सन्मानाने रोजगार दिला जातो. येथील शेतात तुम्हाला कुठेही ‘बोअरवेल’ दिसणार नाही. सूर्य पाण्याची चोरी करतो म्हणून तरुण भारत संघाने येथील शेतकऱ्यांना हे मौल्यवान पाणी जमिनीच्या पोटामध्ये लपविण्यास शिकवले. गरज असेल तेव्हा मोजकेच पाणी कसे वापरायचे हे शिकवले. या परिसरात गोपालपुरासारखी अनेक गावे तरुण भारत संघाच्या प्रयत्नातून जल श्रीमंत झाली आहेत. गोपालपुराच्या यशोगाथेचा मजबूत पायावर गरज आणि आत्मविश्‍वास या दोन आयुधांच्या साह्याने शेतकरी, गावे जोडली गेली. एक जलपुरुष, त्याची संस्था आणि त्याला मिळालेला लोकसहभाग जर गोपालपुरासारखे सुंदर, पाणीदार, सेंद्रिय गोकूळ तयार करत असेल, तर आपण मागे कशामुळे आहोत?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com