उंदराच्या विविध प्रजाती आहे. पिकांचे विशेषतः नारळाचे ते अपरिमित नुकसान करून शेतकऱ्याला आर्थिक संकटात आणतात. पर्यावरणपूरक, सुरक्षित व एकात्मिक पद्धतीने उपाय केल्यास त्यांचे नियंत्रण प्रभावीपणे करता येते. उंदीर उभे पीक कुरतडून खातात. जमीन पोकळ करतात. झाडांवरील फळे, रोपवाटिकेतील रोपे आणि साठवणूक गृहातील फळे कुरतडून खातात. नारळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. विशेषत: कमी अंतरावर लागवड केलेल्या बागांमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे दरवर्षी एकूण उत्पन्नाच्या सुमारे १० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. नारळात उपद्रव सुरू झाला की नियंत्रण करणे अवघड होऊन जाते. यामुळे त्यांची वस्ती बागेत होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे आवश्यक ठरते. उंदराची ओळख उंदीर हा एक सस्तन प्राणी आहे. त्याच्या ८ प्रजाती ज्ञात असून, नारळ आणि त्याच्या आंतरपिकांत आढळून आल्या आहेत. अर्बोरियल काळा उंदीर (आर. रॅट्स) हा प्रामुख्याने रात्री नारळाच्या झाडावर राहतो. उंदीर वर्षभर प्रजनन करतो. फेब्रुवारी-मार्च आणि जुलै ते ऑगस्टमध्ये जास्त प्रमाणात पिल्ले देतो. ‘आर. रॅट्स’ मध्यम आकाराचा असून, त्याला लांब कान असतात. त्याची शेपटी शरीरापेक्षा मोठी असते. रंग वरील बाजूस काळा तर शरीराचा खालील भाग फिकट रंगाचा असतो. वजन ७० ते १०० ग्रॅम तर शेपटी १९ सेंमी किंवा त्यापेक्षा जास्त लांब असते. नर मादीपेक्षा लांब आणि वजनदार असतात. ठळक बाबी
मादी वर्षाला पाच वेळा पिले देते. गर्भावस्था २१ ते २९ दिवसांची. मादी जन्मापासून ३ ते ५ महिन्यांत पिलांना जन्म देते. नवजात पिले १५ दिवस डोळे उघडत नाहीत. त्यांच्या शरीरावर केस नसतात. ते ३-४ आठवड्यांनी आईपासून वेगळे राहतात. जंगलातील उंदीर वर्षभर जगतो. त्यामध्ये वार्षिक मृत्युदर ९१ ते ९७ टक्के दिसून येतो. नुकसान नारळ बागेला दोन प्रकारच्या उंदरांपासून उपद्रव होतो. पहिल्या प्रकारचे उंदीर झावळ्यांच्या बेचक्यात राहतात आणि फळांचे नुकसान करतात. ते घरामध्ये आढळणाऱ्या उंदरांसारखेच असतात. झाडाच्या झावळांच्या बेचक्यात घरटी बनवून त्यात राहतात. ते सहसा जमिनीवर न येता या झाडावरून त्या झाडावर उड्या मारून जातात. दुसऱ्या प्रकारचे उंदीर नारळ रोपवाटिकेत नुकसान करतात. ते जमिनीवर राहतात. बऱ्याच वेळेला बागेमध्ये साठवून ठेवलेल्या झावळ्या, कचरा आदींच्या ढिगांखाली राहतात. नुकसान लक्षणे
माडावरील कोवळे नारळ देठाकडच्या बाजूस पोखरतात. त्यातील कोवळे खोबरे खातात व पाणी पितात. उपद्रवग्रस्त फळांची कालांतराने गळ होते. ज्या बागेत उपद्रव असलेल्या बागांमध्ये झाडाखाली मोठ्या प्रमाणावर छिद्रे पडलेली कोवळी फळे गळून पडलेली दिसतात. रोपवाटिकेमध्ये छोटे उंदीर वेडीवाकडी बिळे तयार करतात. त्यात राहून रुजत घातलेल्या नारळाचा कोंब खातात. नारळातील खिबूसही खातात. त्यामुळे रोपांची उगवण कमी होते. उगवलेली रोपे मरतात. रोपवाटिकेत मोकाट पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था असल्यास बिळांमुळे पाणी टिकत नाही. त्यामुळे सर्व रोपांना पुरेसे पाणी मिळत नाही. नवीन लागवड केलेल्या रोपांचा जमिनीतील नारळ पोखरून त्यातील खोबरे किंवा खिबूस आवडीने खातात. असे लहान माड नंतर मरतात. नारळाला सुमारे पाच सेंमी व्यासाची लहान छिद्रे करतात. फळे व अंतर्गत पाणी पितात. प्रादुर्भावीत फळे झाडावरच राहतात. असे खराब नारळ खाली पडतात. ३ ते ६ महिने परिपक्व फळे बहुतेक नुकसानीस बळी पडतात. न उघडलेले स्पॅथ, मादी फुले आणि पानांच्या देठांवरही हल्ला करतात. उंदरांच्या अन्य जाती उदा. रॅट्स बेंगालेन्सिस, बी. इंडिका आणि टाटेरा इंडिका मातीत व्यापक बिळे करून कोंबाचे कोवळे बुंधे खातात. त्यामुळे नारळाची रोपे कोलमडून पडतात. एक उंदीर दररोज १५ ग्रॅम अन्न खातो, तर १५ मिलि पाणी पितो. झाडावरील वाळलेली सर्व पाने, पोयी, फळे व अन्य भाग काढून टाकावेत. झाडाचा शेंड्याकडील भाग नेहमी स्वच्छ राखावा. जेणेकरून उंदीर झाडांवर घरटी बनवणार नाहीत. नवी लागवड दाट न करता साडेसात बाय साडेसात मीटर अंतरावर करावी. म्हणजे उंदीर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारून जाणार नाहीत. अन्य झाडांना उपद्रव होणार नाही. बाग तणाविरहित ठेवावी. त्यामुळे वाढीस आळा बसेल. उंदरांना झाडावर चढून जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जमिनीपासून दोन मीटर उंचीवर खोडाभोवती ३० सेंमी. रुंदीचा गॅल्व्हनाईजचा गुळगुळीत पत्रा लावावा. जेथे नारळाच्या पंक्ती एकमेकांना लागत नाहीत. ही उपाययोजना दाट लागवड असलेल्या नारळ बागेत प्रभावी ठरत नाही. कारण तेथे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज उडी घेऊन जाता येते. झिंक फॉस्फाइडयुक्त विषारी आमिषाचा वापर एक महिन्याच्या अंतराने करावा. यासाठी ३६० ग्रॅम गव्हाच्या जाड्या भरड्यामध्ये १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड व २० मिलि खोबरेल तेल घालून मिश्रण तयार करावे. ते थोडे- थोडे झाडाच्या बेचक्यात किंवा माडाच्या बगलेत ठेवावे. उंदीर हुशार प्राणी आहे, त्यामुळे सुरुवातीला ३ ते ४ दिवस विष नसलेले आमिष ठेवावे. त्यानंतर महिनाभर आमिष ठेवू नये. ब्रोमॅडिओलोन या रक्त गोठवणाऱ्या उंदीरनाशकाचा वापरही करता येतो. याची वडी झाडाच्या बेचक्यात किंवा बागेत किंवा सापळ्यामध्ये ठेवावी. जातीनुसार सापळ्याचा प्रकार उपलब्धता पाहून करावा. हे सापळे सर्वांत सुरक्षित आणि कमी श्रमदायी आहेत. बांबू, ‘बॉक्स’, पीव्हीसी ट्यूब इ. त्याचे प्रकार आहेत. त्यात विषबाधेचा संबंध येत नाही. सापळ्यात एक ‘डोस’ ब्रोमॅडिऑलोन (०.००५ टक्का) हे रसायन वापरावे. काळ्या उंदरासाठी (आर. रॅट्स) या रसायनाची वडी प्रत्येकी पाच झाडांपैकी एका झाडाची सुई वा शेंड्याजवळ १२ दिवसांच्या अंतराने ठेवावी. संपर्क : डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२ (लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)