
डॉ. अमित झांबरे
Factors Affecting Industrial Dependence : पहिल्या टप्प्यामध्ये आपण खाद्यपदार्थांमधील पोषक सूक्ष्म घटकांची जैवउपलब्धता वाढविण्यासाठी उपयुक्त पारंपरिक प्रक्रिया तंत्रांची माहिती घेतली. आता त्यांच्या एकत्रित वापरातून अन्नपदार्थांची पोषकता वाढवणे, हानिकारक घटक कमी करण्याची एकत्रित रणनीती आवश्यक ठरते.
गेल्या काही भागामध्ये पारंपरिक अन्न प्रक्रियेसोबत वेगवेगळ्या प्रक्रियेच्या एकत्रीकरणातून नव्या पद्धती विकसित केल्या जात आहेत. हे तंत्रज्ञान पारंपरिक खाद्यपदार्थांचे जतन, गुणवत्ता वाढ आणि जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या आव्हानांचा सामना करताना ग्राहकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी उपयोगी ठरते. अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळेच उद्योगांना वाढत्या स्पर्धात्मक दबावाला सामोरे जाणे शक्य होते. अशा अनेक कारणांमुळे या क्षेत्रामध्ये संशोधनाला मोठा वाव असून, औद्योगिक संधीही वाढत आहेत.
वापरलेल्या घटकांची पोषकता, गुणधर्म वाढविण्यासाठी केलेल्या संशोधनातून नावीन्यपूर्ण आणि आधुनिक प्रक्रियांचा शोध घेतला जातो. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. मात्र हे तंत्रज्ञान सार्वत्रिक होण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता असते. कारण तंत्रज्ञानाचा शोध किंवा विकास ही फक्त पहिली पायरी आहे. त्या पुढील टप्पा हा त्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाचा असतो. वैयक्तिक व्यक्ती किंवा एखादी छोटी कंपनी त्यासाठी पुरेशी पडत नाही. एखादी प्रक्रिया औद्योगिक पातळीवर नेताना त्यासाठी आवश्यक तांत्रिक क्षमतेइतकीच आर्थिक क्षमताही महत्त्वाची असते. उत्पादन वाढते, तसे त्याच्या विक्री आणि विपणनाच्या प्रक्रियेवरील खर्चातही वाढ होत जाते. अशा अनेक कारणामुळे वाढलेले व्यावसायिकरणाचे मूल्य, त्यासाठी गुंतवावी लागणारी मोठी रक्कम, त्या सोबत जोडली जाणारी जोखीम या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण व्यावसायिकीकरणातून फायद्याच्या शक्यता जशा वेगाने वाढतात, तशीच आर्थिक आणि स्पर्धात्मक जोखीमही वाढत असते. आपण विकसित केलेल्या प्रक्रियांचे वेळीच स्वामित्व हक्क (पेटंट) घेऊन ते सुरक्षित करणे महत्त्वाचे ठरते. त्यातून उद्योगातील स्पर्धेमध्ये आपल्याला काही फायदे मिळू शकतात. अन्न उद्योग हे एक स्पर्धात्मक कार्यक्षेत्र आहे. त्यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार गोष्टी वेगाने बदलत जातात. किंवा उद्योगांना त्या बदलणे भाग पडते.
ग्राहकांच्या मागणीमध्ये सामान्यतः अन्न उत्पादनांची चव, पोत, पौष्टिकपणा, कमी उष्मांक, पुरेशी साठवण क्षमता, वाहतूक सक्षमता यांचा समावेश होतो. त्यानुसार योग्य ते बदल करत राहावे लागतात. उदा. भारतामध्ये पिझ्झा किंवा चायनीज नूडल्स यांची विक्री करताना त्यांच्या पारंपरिक पाककृतीला चिकटून राहिल्यास त्याची विक्री फारच अल्प राहू लागली हे लक्षात येताच त्यात भारतीय मसाल्यांचा, भाज्यांचा समावेश करण्यात येऊ लागला.
अन्न पदार्थांतील घटकांचा वापर या बाबीवरही पोषकता, नव्याने वाढत चाललेले जीवनशैलीविषयक आजार, वेगवेगळ्या ॲलर्जी, खाद्यान्नाशी संबंधित विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे अनेक मर्यादा येत असतात. त्यानुसार योग्य ते बदल तातडीने करण्याची गरज असते. उदा. शेंगदाण्याची ॲलर्जी असणाऱ्यांना शेंगदाण्याच्या लाडूऐवजी तिळाचा लाडू असा मेन्यू देणे.
वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे अधिक लवचिक आणि टिकाऊ अन्न पर्यायांची मागणी आणखी गुंतागुंतीची बनत चालली आहे.
पती-पत्नी दोघांनीही नोकरी करणे यामुळे अन्न प्रक्रियेसाठी अपेक्षित वेळच उपलब्ध नसतो. अशा वेळी कमी काळात होणाऱ्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. अन्नविषयक कायदे, पर्यावरणीय मानके आणि नियमांची पूर्तता या बाबीही उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.
- डॉ. अमित झांबरे, ९९२२५९४५२४,
(प्राचार्य, श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, पानीव,
ता. माळशिरस, जि. सोलापूर)ReplyForward
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.