तयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड महत्त्वाची...

वेळेवर मुगाची लागवड महत्त्वाची...
वेळेवर मुगाची लागवड महत्त्वाची...

जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. प्रतिहेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. सुधारित व प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. स्वत:जवळचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे.

मूग लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी (३० ते ४५ सेंमी. खोल) पोताची जमीन निवडावी. हे पीक आम्लविम्ल परिस्थितीतसुद्धा चांगले तग धरू शकते. चोपण व क्षारयुक्त जमिनीमध्ये याची लागवड करू नये. मृगाचा पहिला चांगला पाऊस पडून गेल्यावर वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भूसभुशीत करावी. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मॉन्सूनचा पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. उशिरा पेरलेल्या पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी लागतात. परिणामी, उत्पादनात मोठी घट येते. पेरणीस उशीर झाला, तर झाडाची वाढ पुरेशी होत नाही. त्यावर भुरी रोग व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बियाणे प्रमाण

 • प्रतिहेक्टरी १२ ते १५ किलो.
 • सुधारित व प्रमाणित बियाण्यांची निवड करावी.
 • स्वत:जवळचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे. घरचेच बियाणे वापरावयाचे असल्यास चाळणी करून एकसारखे बियाणे वापरावे. बियाण्यांची उगवणक्षमता पेरणीअगोदर तपासून घ्यावी.
 • बीज प्रक्रिया : (प्रतिकिलो बियाणे)

 • भूरी, मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कार्बेन्डान्झीम १ ग्रॅम अधिक थायरम २ ग्रॅम  किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम
 • जीवाणू संवर्धक
 • चवळी गटाच्या रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास नत्र शोषणाची क्रिया जोमाने होते. उत्पादन १० ते १७ टक्क्यांपर्यंत वाढ होते.
 • स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक (पीएसबी) प्रक्रिया केल्यास जमिनीतील अद्राव्य स्फुरद जीवाणूंमुळे विरघळून पिकाला उपलब्ध होतो. त्यामुळे शिफारशीत रासायनिक खताची ५० टक्के मात्रा वापरूनसुद्धा उत्पादनात वाढ मिळते.
 •   प्रमाण ः २५ ग्रॅम प्रति किलो  बीज प्रक्रिया ः   प्रथम १२५ ग्रॅम गूळ एक लिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात २५० ग्रॅम जीवाणू संवर्धक मिसळून लेप तयार करावा. प्रतिदहा किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवावे. साधारणपणे २४ तासांच्या आत पेरणी करावी. बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया आधीच केली असल्यास अशा बियाण्यास संवर्धक दीडपट वापरावे. पेरणी

 • ओळीत ३० सें. मी. अंतर ठेवावे. सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असणाऱ्या जमिनीत आंतरमशागतीच्या सोयीनुसार ३७.५ किंवा ४५ सें. मी.पर्यंत अंतर वाढवावे.
 • बियाणे योग्य खोलीवर पेरावे. उथळ पेरल्यास ओल न मिळाल्यास बियाणे उगवणार नाही. जास्त खोल पेरल्यास बियाण्यांचा अंकुर जमिनीच्या वर येण्यास वेळ लागेल किंवा वर येऊ शकणार नाही.
 • बियाणे ५ ते ६ सें. मी. खोलीवर पेरावे.
 • खत व्यवस्थापन

 • दुसऱ्या वखराच्या पाळीच्या वेळेस प्रतिहेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
 • या पिकाला नत्रापेक्षा स्फुरदाची जास्त आवश्यकता आहे. तरीपण सुरवातीच्या काळात पीक जोमदारपणे वाढण्याच्या दृष्टीने प्रतिहेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद ही खतमात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. नत्र व स्फुरद एकाच वेळी पेरणीच्या वेळेस जमिनीत बियाण्यांच्या खाली पेरून द्यावे.
 • आंतरमशागत

   पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर पिकाची वाढ झपाट्याने होऊन जमीन झाकली जात असल्यामुळे त्यामध्ये तण जोमाने वाढू शकत नाही. त्याकरिता एक महिन्याच्या आत पिकाला दोनवेळा डवरणीच्या पाळ्या आणि एक निंदण आवश्यकतेनुसार करावी.

  जाती

  जात      कालावधी (दिवस उत्पादन (क्विंटल/हेक्टर) वैशिष्ट्ये
  बी. एम. २००३-२  ६० ते ७० १० ते १२ जाड दाणे, लांब शेंगा, गर्द हिरवा दाणा
  एकेएम ८८०२    ६१ ते ६३  १० ते ११ लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा, भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम
  पीकेव्ही ग्रीनगोल्ड (एकेम ९९११) ६४  ते  ७२    १० ते १२   मध्यम जाड दाणे, भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम
  कोपरगाव  ६० ते  ६५  ८ ते १०   टपोरे हिरवे चमकदार दाणे
  बी.एम. २००२-१  ६० ते ७० १० ते १२  मध्यम जाड दाणे, लांब शेंगा, गर्द हिरवा दाणा
  फुले एम. २  ६० ते ६५  ११ ते १२  मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
  बी.एम. ४  ६०  ते  ६५  १० ते १२   मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

  डॉ. जीवन कतोरे, ९९७००७०९४४ (कृषी महाविद्यालय, नागपूर)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com