कुटुंबाच्या एकत्रित श्रमांतून बहरली फुलशेती

फुलशेती (Flowers Farming) करायचे निश्‍चित तर केले. पण वर्षभर सततची तोडणी हे कष्टदायी आणि मजूरश्रमाचे काम होते. त्यामुळे मर्यादित एकूण तीस गुंठेच क्षेत्र नक्की केले.
Flowers Farming
Flowers FarmingAgrowon
Published on
Updated on

कृष्णा उरमोडी नदीच्या संगमावर काशीळ (ता. जि. सातारा) हे सुमारे आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात ८० टक्के बागायत शेती होते. गावातील गांधीनगर भागात दीपक बळवंत जाधव राहतात. त्यांची संयुक्त कुटुंबाची अडीच एकरांत विहीर व नदी बागायत शेती आहे. मोठे बंधू आनंदराव नोकरी करतात तर शेतीची जबाबदारी दीपक पाहतात. सुरुवातीच्या काळात पाणीपुरवठा योजनेत काम करण्यासह दीपक वडिलांसोबत पारंपरिक शेती करायचे.

नोकरी सोडून त्यांनी ऊस (Sugarcane), आले (Ginger), हळद (turmeric) यांच्यासह भाजीपाला शेती सुरू केली. शेजारचे शेतकरी धनाजी जाधव यांच्याकडे फुलशेती नर्सरी होती. त्यांच्यासोबत चर्चा व निरीक्षणातून फुलांचा हंगाम, विक्री व्यवस्था व या शेतीची क्षमता या बाबी समजून घेतल्या.

फुलशेतीचा श्रीगणेशा

फुलशेती (Flowers Farming) करायचे निश्‍चित तर केले. पण वर्षभर सततची तोडणी हे कष्टदायी आणि मजूरश्रमाचे काम होते. त्यामुळे मर्यादित एकूण तीस गुंठेच क्षेत्र नक्की केले. सुरुवातीला पाच गुंठे क्षेत्रावर गलांड्याची लागवड केली.

व्यापारी आणि दर निश्‍चित केले. एक आड दिवस १५ ते २० किलो तोडणी करून फुले पाठवली जायची. यातून ताजे उत्पन्न मिळू लागल्याने उत्साह वाढला. मग वर्षभरातील सण व समारंभ तसेच बाजारपेठेतील मागणी, आवक यांचा अभ्यास करून व व्यापाऱ्यांशी बोलून निशिगंध, झेंडू, गुलाब ही पिके निश्‍चित केली. अलीकडे शेवंती व दहा गुंठे क्षेत्रात मखमलीची लागवड केली आहे.

फुलशेती व हंगामाचे नियोजन

प्रत्येक पीक सुमारे पाच ते दहा गुंठ्यांत, काही पिकांत साडेचार फुटी सरी व झिगझॅग पद्धतीचा वापर होतो. झेंडू बाराही महिने म्हणजे वर्षातून तीन वेळा दहा गुंठ्यांत घेण्यात येतो. श्रावण, गणपती, दिवाळी, दसरा या काळात फुले येतील या नियोजनाबरोबरच उन्हाळ्यातील फुले लग्नसराई येतील असेही नियोजन असते.

गलांड्याचा बहार सहा महिने मिळत असल्याने वर्षातून दोन वेळा म्हणजेच जून व सप्टेंबरमध्ये लागवड केली जाते. निशिगंधाचे पाच वर्षांपासूनचा व तीन वर्षांपासूनचा असे दोन प्लॉट्‍स आहेत. दहा गुंठ्यांत त्याची लागवड आहे. त्यांचा वर्षभर बहर सुरू राहतो.

जून ते सप्टेंबर काळात दहा किलो तर इतर महिन्यांत पाच ते सहा किलो किलो एक आड दिवस फुले मिळत राहतात. निशिगंधात आंतरपीक म्हणून मखमल, तर गुलाबाच्या ५० रोपांची लावण केली आहे.

दर घेतले बांधून

जाधव यांनी बाजारपेठा निश्‍चित केल्या आहेत. परिसरातील अतित, उंब्रज, शेंद्रे, पाली, तासवडे येथील व्यापाऱ्यांनी फुले दिली जातात. काही व्यापारी घरून तर काहींना पोहोच केली जातात. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पॅकिंग करूनही पुरवठा होतो. बाजारपेठेत फुलांचे दर वर्षभर कमी जास्त होत असतात. मात्र जाधव यांनी ते वर्षभरासाठी बांधून घेतले आहेत. उदा. झेंडू ४० रुपये, निशिगंध १०० रुपये, गुलाब ३०० रुपये प्रति शेकडा, मखमल ५० ते ६० रुपये प्रति किलो असे हे दर आहेत.सण व लग्नसराईत व्यापारी काही प्रमाणात दर वाढवूनही देतात.

राबते सारे कुटुंब

फुलशेतीत सारे जाधव कुटुंब म्हणजे दीपक यांची पत्नी वैशाली, मुलगा सोहम, चुलत बंधू शरद, भावजय मनीषा, काका जालिंदर तात्या असे सर्व जण राबतात. एकमेकांचा समन्वय व विश्‍वास यामुळे श्रमांचा भार हलका होतो. बाहेरील मजूरबळ व त्यावरील आर्थिक भार कमी होतो. सकाळी सहा ते आठ दररोज फुलांची काढणी, पॅकिंग ही कामे करावी लागतात. कुटुंबातील सदस्यच यासाठी हातभार लावतात.

फुलशेतीतूनच शेळीपालनाला भांडवल

फुलशेतीतून महिन्याला निश्‍चित असे पगाराप्रमाणे ताजे उत्पन्न मिळते. त्यातूनच घरखर्च व अन्य खर्चासाठी पैसा उभा करणे शक्य झाले. याच फुलशेतीतील उत्पन्नातून जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी शेळीपालन सुरू केले आहे. शंभर बाय ७५ फुटांचे तारेचे कुंपण व ३२ बाय ३० फूट पत्र्याचे शेड उभे केले आहे. उर्वरित जागा शेळ्यांसाठी मुक्तसंचारासाठी ठेवली आहे. उस्मानाबादी २० शेळ्या व कोकरे आहेत. सध्या बोकडांची विक्री करण्यावर भर आहे. दहा गुंठे क्षेत्रांवर चारा पिकांची लागवड असे नियोजन केले आहे.

दीपक जाधव, ९८२२८२०२४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com