Grape Advisory : द्राक्ष बागेतील डाऊनी मिल्ड्यूचे नियंत्रण

सुरुवातीच्या काळात पाऊस पडल्यामुळे द्राक्ष बागेत डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिसते.
 Grape Advisory
Grape AdvisoryAgrowon

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून बऱ्याच द्राक्ष बागायतदारांनी छाटणी (Grape Prunning) केलेली आहे. बऱ्याचशा बागा फुटून आलेल्या आहेत. सध्या बागा फुलोरा (फ्लॉवरिंग), फ्रूट सेटिंगच्या (Fruit Setting) अवस्थेत आहेत. या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काळात पाऊस पडल्यामुळे डाऊनी रोगाचा (Downy Disease) प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिसते. सध्या ज्या ठिकाणी आर्द्रता आहे आणि सकाळच्या आणि दुपारच्या तापमानात भरपूर (१५ ते २० अंश सेल्सिअस) फरक असलेल्या ठिकाणी सकाळचे दव भरपूर पडणे आणि बराच वेळ टिकण्याची परिस्थिती असू शकते. अशा परिस्थितीमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बऱ्याच बागायतदारांशी झालेल्या चर्चेनुसार काही नियोजनाच्या गोष्टी पुढील प्रमाणे करणे गरजेचे आहे.

 Grape Advisory
Cotton MSP : कापसाला १२ हजार हमीभाव द्या

१) फळछाटणीनंतर डाऊनीच्या नियंत्रणासाठी सर्वसाधारणपणे आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर पहिल्या ४० दिवसांत जास्त प्रमाणात केला जातो. एप्रिल छाटणीनंतर ऑक्टोबर छाटणीच्या कालावधीपर्यंत शक्य झाल्यास डाऊनी नियंत्रणासाठी उपयुक्त असलेल्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर काटेकोरपणे टाळावा, अशा सूचना या पूर्वी दिल्या होत्या. असे केल्यास ऑक्टोबर छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकापासून मिळणारे नियंत्रण जास्त चांगले मिळण्याची अपेक्षा असते. कारण बागेमध्ये कार्यरत असलेल्या डाऊनीच्या बुरशीला आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा सामना जास्त झालेला नसतो. त्याप्रमाणे बुरशीनाशकाच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार होण्याची शक्यता बरीच कमी असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्षात आंतरप्रवाही बुरशीनाशकांना टाळणे फारसे शक्य झालेले नाही. अशा वेळी आता ऑक्टोबर छाटणीनंतर शक्यतो ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये गोड्या छाटणीच्या पूर्व काळात न झालेल्या किंवा कमी प्रमाणात झालेल्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचाच वापर करावा. यामुळे आता डाऊनीचे चांगले नियंत्रण मिळू शकेल.

 Grape Advisory
पाऊस, डाऊनी मिल्ड्यूमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका

२) सर्वसाधारणपणे उपलब्ध असलेले आंतरप्रवाही बुरशीनाशक चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होण्यासाठी कमी आर्द्रता आणि पर्णरंध्रे उघडी असलेली आणि पानातून बाष्पोत्सर्जन जास्त प्रमाणात होत असलेली स्थिती अधिक उपयोगी राहते. अशा काळात बुरशीनाशके चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होतात. बागेमध्ये पाऊस असलेल्या वेळी फवारलेले बुरशीनाशक पानावरून धुऊन जाते. पावसामुळे जास्त आर्द्रताही असल्याने पानातून होणारे बाष्पोत्सर्जन कमी असते किंवा होत नाही. या दोन्ही कारणांमुळे बुरशीनाशक चांगल्या प्रकारे आंतरप्रवाही होत नाहीत. म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर पावसाच्या वेळेस टाळणे फायदेशीर ठरते.
अलीकडे वेगवेगळ्या संकेतस्थळावरून ठिकाणानुसार पावसाचा अंदाज मिळतो. याचा योग्य वापर करून आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर बागेत पाऊस पडण्याची शक्यता असण्यापूर्वी आणि पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच्या काळात करणे आवश्यक आहे. पावसाच्या अगोदर केलेली फवारणी चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होण्यासाठी काही कालावधी आवश्यक असतो. तसेच पावसानंतर केलेली बुरशीनाशकाची फवारणी धुऊन गेलेल्या बुरशीनाशकाची पानावरील मात्रा वाढविण्यासाठी जास्त उपयोगी असते. म्हणून बागेमध्ये केव्हा पाऊस येणार आहे, या माहितीचा वापर करून पाऊस येण्याअगोदर बुरशीनाशकाची एक फवारणी करून पाऊस पडून गेल्यानंतर त्याच बुरशीनाशकाची फवारणी करणे योग्य राहील.

 Grape Advisory
Grape : पावसाळी वातावरणातील द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

३) बऱ्याच वेळेस पानावर दवाची ओल असताना जाणूनबुजून फवारणी केली जाते. सध्याच्या परिस्थितीतील वातावरणामध्ये अशा पाने ओली असताना केलेल्या फवारणीचा जास्त फायदा होणार नाही. ओल्या पानावर फवारणी केल्याने फवारलेल्या बुरशीनाशकाची मात्रा कमी होते. त्याचबरोबरीने पान अधिक ओले असल्यामुळे पानावर फवारलेले बुरशीनाशक धुऊन जाते. म्हणजे फवारलेल्या बुरशीनाशकाची कमी मात्रा पानावर राहते. त्यामुळे बुरशीनाशकाने मिळालेले नियंत्रण अपेक्षेपेक्षा कमी मिळते. या उलट पानावरील दव संपूर्णपणे सुकल्यानंतर, आर्द्रता कमी झाल्यानंतर फवारणी केल्यास पानावर पडलेले बुरशीनाशक तेथेच राहते आणि सुकते. फवारणीतील
तुषार चांगल्या प्रकारे बारीक असल्यास कव्हरेज चांगले मिळते. त्याचप्रमाणे बुरशीनाशक पानावरून वाहून जात नाही, त्यामुळे जास्तीत जास्त बुरशीनाशक पानावर सुकते. अशा प्रकारे फवारणी चांगल्या रीतीने झालेली असल्यास बुरशीनाशकाचा प्रभाव २ ते ३ दिवस चांगला राहतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी फवारणी करण्याची गरज भासत नाही.
ओलाव्यात होणाऱ्या नवीन डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पानावर ओलावा असताना बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. परंतु सुक्या पानावर चांगल्या रीतीने केलेली फवारणी दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या ओलाव्यामध्ये डाऊनीचे नियंत्रण चांगले करू शकते. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये फवारणी विशेषतः आंतर प्रवाही बुरशीनाशकाची फवारणी पानावरील दव वाळल्यानंतर घ्यावी.

४) भुरीच्या नियंत्रणासाठी घड फुलोऱ्यात येण्याच्या वेळेपासून सेटिंग होईपर्यंतच्या कालावधीत (छाटणीनंतर ३५ ते ४५ दिवस) चांगले नियंत्रण मिळविणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण या काळात घडावर, जवळपासच्या पानावर भुरी न आल्यास पुढे काढणीच्या वेळेआधी मण्यांवर आढळणारी भुरी दिसणार नाही. डाऊनीच्या नियंत्रणाच्या नादात भुरी नियंत्रणाचा मुद्दा कधीच विसरू नये. भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक खऱ्या अर्थाने याच दिवसांमध्ये चांगले नियंत्रण देते. या काळात मणी अजून तयार झालेला नसतो. त्यामुळे या काळात केलेल्या फवारणीपासून बुरशीनाशकाच्या अंशाचा पुढे कसलाही धोका राहत नाही.
--------------
डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९
( कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com