Transport of mango boxes
Transport of mango boxes

‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ग्राहकांना थेट विक्री 

हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय पसरले आणि आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले. बाजारपेठ आणि ग्राहकांकडे तयार झालेला हापूस पोहोचवायचा कसा? हा प्रश्न तयार झाला. मात्र लॉकडाऊनच्या परिस्थितीवर मात करत भू गावातील (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आंबा बागायतदार विशाल सरफरे यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
Published on

हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय पसरले आणि आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले. बाजारपेठ आणि ग्राहकांकडे तयार झालेला हापूस पोहोचवायचा कसा? हा प्रश्न तयार झाला. मात्र लॉकडाऊनच्या परिस्थितीवर मात करत भू गावातील (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आंबा बागायतदार विशाल सरफरे यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  कृषी विभाग, आत्मा आणि परजिल्ह्यातील ओळखीच्या लोकांच्या सहकार्यामुळे विशाल सरफरे यांनी आत्तापर्यंत सुमारे नऊ हजार आंबा बॉक्सची विक्री केली. राज्य, परराज्यातील बाजारपेठ थांबली असताना बागायतदार ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात विशाल यांना यश मिळाले.  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. याचा सर्वात मोठा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसला. या परिस्थितीची माहिती देताना विशाल सरफरे म्हणाले की, यंदा हंगामाला थोडा उशीर झाला असला तरीही मार्च अखेरीस आंबा तयार झाला होता. लॉकडाऊनच्या सुरुवातीला शेतमाल वाहतुकीवर निर्बंध होते. बाजारपेठा बंद होत्या आणि ग्राहकांच्या समोर खरेदीच्या अडचणी होत्या. तयार होणारा आंबा कसा विकायचा ? या प्रश्न समोर होता. आत्तापर्यंत मी पुणे, मुंबई,अहमदाबाद,राजकोट येथील व्यापाऱ्यांकडे आंबा विक्रीस पाठवत होतो. परंतु वाहतूक थांबल्याने विक्रीची अडचण तयार झाली. परंतु परिस्थितीत डगमगून न जाता मी कृषी विभाग आणि आत्मा यांच्या सहकार्याने आंबा विक्रीची साखळी तयार केली. फळ वाहतुकीचा परवाना मिळविला. मागणी लक्षात घेऊन चार आणि पाच डझनाचे हापूस आणि पायरी आंबा बॉक्स भरून थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे मी नियोजन केले. थेट विक्री हा माझा पहिलाच अनुभव होता आणि मी यशस्वी झालो. 

बागायतदार ते ग्राहक तयार केली साखळी   आत्माकडून मिळालेले ग्राहक आणि वैयक्तिक संपर्क यांचा मेळ साधत विशाल यांनी सुरुवातीला सातारा, फलटण येथे शंभर आंबा बॉक्स पाठवले. थेट बागायतदारांकडून घरपोच सेवा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांकडून मागणी येऊ लागली. त्यानंतर मुंबई, पुणे, सातारा,कराडसह विविध भागांमध्ये हापूस आंबा बॉक्स पाठविण्यास सुरवात केली. चार डझनाच्या बॉक्सला १८०० ते २००० रुपये तर पाच डझन बॉक्सला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आत्तापर्यंत विशाल यांनी नऊ हजार बॉक्स ग्राहकांच्यापर्यंत पोहोचविले आहेत. या उपक्रमाला शहरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि नवी बाजारपेठ तयार झाली. विविध शहरातील सर्व ग्राहकांचा डाटा तयार केला असून पुढील वर्षीपासून किमान पन्नास टक्के आंबा हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन विशाल यांनी केले आहे. 

-  विशाल सरफरे , ८९७६५१७३५२ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com