बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे संकट गावशिवारात पोचलं. कोरोनामुळे बाजारपेठा बंद झाल्या. ठरवलेल्या व्यापाऱ्याने बागेतील अर्धीच द्राक्षे नेली आणि नंतर खरेदी थांबविली. आता उरलेली द्राक्षे विकायची कोठे ? हा पेच तयार झाला. मात्र कुटुंबाने हिंमत हरली नाही, थेट ग्राहकांना स्वतः द्राक्ष विकायचे नियोजन केले. कृषी खात्याकडून द्राक्ष विक्रीचा परवानादेखील मिळाला. त्यामुळे पाच, दहा नव्हे तर २० टन द्राक्षे थेट ग्राहकांना विकली. सरस्वती गावातील अनिल देवराव दूधमोगरे आणि त्यांच्या कुटुंबाने संकटाचे संधीत रूपांतर करत ४० गावांमध्ये द्राक्ष विक्रीकरून अपेक्षित नफादेखील मिळविला.
विदर्भ म्हटलं की कापूस, अशी ओळख आपल्या समोर येते. मात्र, विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सरस्वती (ता.लोणार) या गावातील दूधमोगरे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून चार एकरात द्राक्ष बाग नेटाने जोपासली आहे. त्यांच्याकडे सोनाका, आरके आणि एसएसएन या जातींची लागवड आहे. यंदा हंगाम सुरु झाला. बागेत सुमारे ४५ टन द्राक्ष विक्रीला तयार होत होती. व्यापाऱ्यासोबत प्रति किलो ४५ रुपये दराने व्यवहारदेखील झाला. पहिल्या टप्यात व्यापाऱ्याने सुमारे २५ टन द्राक्ष विक्रीस नेली. मात्र त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने त्याने द्राक्ष खरेदी बंद केली. या पट्यात द्राक्षासाठी मोठ्या बाजारपेठा नाहीत. परिणामी द्राक्ष विक्रीचा पेच तयार झाला. दूधमोगरे कुटुंब हतबल झाले. याकाळात काही शेतकरी भाजीपाला, कलिंगड थेट ग्राहकांना विक्री करत होते.त्यातून प्रेरणा घेत आपणही द्राक्ष विकू शकतो काय, याची त्यांनी चाचपणी केली. मेहकरचे उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख यांनी लोणार तालुका कृषी अधिकारी वैभव दिघे आणि शिवाजीराव कावरखे यांना दूधमोगरे यांना द्राक्ष विक्रीसाठी मदत करण्यास सांगितले. त्यानंतर दूधमोगरे यांनी गाडीचे नियोजन करत लोणार, मेहकर, रिसोड शहरांमध्ये दररोज सकाळी सात ते अकरा यावेळेत द्राक्ष विक्रीला सुरवात झाली. लॉकडाऊनच्या काळात जेथे व्यापारी १५ रुपये किलोने द्राक्ष मागत होते, त्याचवेळी दूधमोगरे यांनी थेट ग्राहकांना प्रति किलो ५० रुपये दराने द्राक्षे विकली. मेहकर, लोणार, रिसोड शहरात निश्चित केलेल्या ठिकाणी द्राक्षाचे वाहन उभे करीत सकाळी द्राक्ष विक्रीस सुरवात झाली. ही विक्री झाल्यानंतर दुपारच्या वेळी दररोज परीसरातील किमान ४ ते ५ खेड्यांमध्ये देखील दूधमोगरे द्राक्ष विक्री करायचे. कुटुंबातील काही सदस्य द्राक्ष विक्री तर काही सदस्य बागेत द्राक्ष काढणीमध्ये गुंतलेले असायचे. सायंकाळी तोडलेल्या द्राक्ष घडांची व्यवस्थित प्रतवारीकरून पहाटे द्राक्ष विक्रीसाठी वाहने रवाना केली जात होती. द्राक्ष विक्रीच्या नियोजनात दूधमोगरे यांना कृषी सहायक दत्ता गर्जे, संजय चवरे, विठ्ठल धांडे, आशा वायाळ, इरेश कचकलवार, राहुल पांडे यांची चांगली मदत झाली. द्राक्ष विक्रीसाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर केला. शहरातील ग्राहकांना दररोज द्राक्ष उपलब्धतेबाबत संदेश पोचविण्यात आले. त्यामुळे शहरात वाहन आले की, आरोग्यविषयक सर्व नियम पाळत अवघ्या तीन तासात ताज्या द्राक्षांची विक्री होत होती. सुरुवातीला विक्रीत अडचणी आल्या. परंतु अडचणीवर मात करत दूधमोगरे कुटुंबाने जवळपास चाळीस गावांत द्राक्ष विक्री करून नवीन बाजारपेठ शोधली, त्याचबरोबरीने मंदीच्या काळात अपेक्षित दरही मिळविला. - अनिल दूधमोगरे, ९५७९६५३०२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.