विदर्भातील संत्रा, लिंबू, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मागील वर्षात पाने पिवळी पडून पानगळ घडवून आणणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वास्तविक पानगळ होण्यासाठी अनेक रोग कारणीभूत असू शकतात. मात्र त्यातील तेलकट चट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होते. या रोगाला इंग्रजीमध्ये ‘ग्रिसी स्पॉट’ संबोधतात. अनुकूल वातावरणात रोगाचा प्रसार झपाट्याने होऊन पानगळ संभवते. पानगळ झाल्यामुळे बहारावर विपरीत परिणाम होतो.
रोगाची लक्षणे
परिपक्व झालेल्या पानांच्या मागील बाजूस सर्वप्रथम पिवळसर ते गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. पुढे पानाखालील चट्टे अधिक गडद होऊन समांतरपणे वरील बाजूलाही विकसित होतात. अनियमित आकाराचे पिवळे वलय असलेले तेलकट चट्टे पानांखाली व पानांच्या वरच्या बाजूने निर्माण झाल्यामुळे लांबून ही झाडे पिवळी पडल्याचे भासते. रोगकारक बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांच्या पेशी हरितद्रव्ये तयार करू शकत नाहीत. पिवळ्या, काळ्या रंगाचे चट्टे उद्भवतात. रंगपूर, जंबेरी या खुंट वृक्षांवर चट्टे अधिक गडद असून, जोमाने वाढत असल्याचे दिसते. पानांच्या देठाजवळ चट्टे निर्माण झाल्यास पाने गळून पडतात. मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्यामुळे झाडांचा जोम कमी होतो. त्याचा बहार फुटण्यावर विपरीत परिणाम होतो. झाडे खुरटी दिसतात. -विकसित होत असलेल्या फळांना रोगाचा संसर्ग झाल्यास फळांच्या पृष्ठभागावर काळे, लहान डाग तयार होतात. फळांवर, मृत पेशीयुक्त तेलकट चट्टे दिसून पडतात. अशी फळे काही प्रमाणात पिवळी हिरवी दिसतात. एकसारखा पिवळा रंग न आल्यामुळे अशा फळांना मागणी कमी राहते. दरही मिळत नाही. रोगकारक बुरशी मायकोस्फेरेला सिट्री दीर्घ कालावधीकरिता पानांवर ओलावा आणि २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. ही अवस्था आपल्याकडे बहुतेक वेळा जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत आढळते. त्यानंतर थंड तापमान आणि कमी आर्द्रतेत (साधारणत: डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये) बीजाणू संख्येमुळे प्रसार अधिक होतो. उच्च तापमान आणि जास्त पाऊस पडलेल्या भागात रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार वर्षभर चालू राहतो. पानगळ झालेल्या बागेमध्ये गळ झालेल्या पानांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. अन्यथा, रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कारण बुरशीचे बीजाणू खाली पडलेल्या व वाळलेल्या पानामध्ये पुनरुत्पादित होऊन हवेद्वारे निरोगी पानांवर संसर्ग करतात. बुरशीने पानाच्या पेशींमध्ये प्रवेश केला की हळूहळू बुरशीची पेशीमध्ये वाढ होऊन पेशी मृत होण्यास व काळे तेलकट चट्टे दिसण्यास सुरुवात होते. यासाठी बराच कालावधी लागत असला तरी अनुकूल वातावरणात चट्टे लवकर दृश्यमान होतात. बागेत नियमितपणे झाडांच्या पानांचे निरीक्षण करत राहावे. पानगळ व झाडांच्या पानांच्या घनतेचे सर्वेक्षण करणे. खाली पडलेल्या पानांची विल्हेवाट लावणे. पडलेली पाने आणि फळे यांच्यापासून शेत स्वच्छ ठेवावे. गरजेपेक्षा अधिक सिंचन करणे टाळावे. खाली पडलेल्या पानांचे विघटन जलद होण्याकरिता काडीकचरा विघटन करणाऱ्या अन्य उपयुक्त बुरशींचा वापर करावा. साधारणत: ऑक्टोबरपासून झाडांच्या पानांची निरीक्षणे घेणे राहावीत. त्यात रोगांची प्रादुर्भाव व तीव्रता वाढल्याचे आढळल्यास फवारणी प्रति लिटर पाणी झायनेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड* ३ ग्रॅम. (लेबल क्लेम नाही, ॲडहॉक शिफारस आहे.) किंवा हॉर्टिकल्चरल मिनरल ऑइल २० मि.लि. या मिनरल ऑइलच्या फवारणीमुळे पानामध्ये बीजाणूंचा प्रवेश कमी होतो. बीजाणूंची उगवण कमी होते. बुरशींचा संसर्ग झाला असल्यास लक्षणांच्या विकासास प्रतिबंध किंवा विलंब होतो. तेलकट चट्ट्यांची तीव्रता कमी दिसून येते. झाडाच्या परिघात पानगळ झालेल्या पाला पाचोळ्यावरही फवारणी करावी. (काडीकचरा विघटन करणाऱ्या उपयुक्त बुरशींचा वापर केलेला नसल्यास). - डॉ. योगेश इंगळे,
९४२२७६६४३७,
- डॉ. दिनेश पैठणकर,
९८८१०२१२२२
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठ, अकोला)