गडचिरोलीः समृध्द जंगल, समाधानी माणसं

बांबू हे गडचिरोलीच्या जंगलांतील खास नगदी उत्पन्न मिळवून देणारे झाड. आज अनेक संस्थांच्या व ग्रामसभांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात बांबूचे संवर्धन व लागवड(Bamboo Conservation and Cultivation) होत आहे.
Gadchiroli
GadchiroliAgrowon

मी जेव्हा पहिल्यांदा गडचिरोलीला जाणार होते तेव्हा घरच्यांच्या भीतीयुक्त प्रश्नांना उत्तरे देणे भाग होते. खरं तर त्यापूर्वी मलाही गडचिरोलीबद्दल (Gadchiroli) फारशी माहिती नव्हती. मनात थोडीशी धास्ती होतीच; त्यापेक्षा जास्त तिथे जाण्याची उत्सुकता. नागपूर-गडचिरोली-गोंदिया-भंडारा-चंद्रपूर या महाराष्ट्रातील दूरच्या जिल्ह्यांत कधी जाण्याचे निमित्त वा कारण नव्हते. आकाशवाणीवर किरण पुरंदरे यांच्या ‘सखा नागझिरा’ पुस्तक वाचनातून तिथल्या जंगलाबद्दल आणि प्राणीसृष्टीबद्दल ऐकले होतेच. पुढे व्यंकटेश माडगुळकरांचे ‘नागझिरा’ वाचले तेव्हा हे सर्व जंगल डोळ्यासमोर उभे राहिले होते आणि बदलत्या परिस्थितीत इथे झालेल्या बदलांनी ते जंगल अजून तसेच असेल का, ही शंका देखील. मारुती चितमपल्लींच्या नवेगाव बांधच्या अनेक वर्णनामुळे तर ते बघण्याची ओढच लागली होती. शिवाय वाघासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा आणि शेकरू-बिबट्यांना जीव लावणारे प्रकाश आमटे हेही गडचिरोलीतच.

गडचिरोलीला जाताना तुरळक माहितीचे गाठोडे आणि उत्सुकता माझ्या सोबत होती. भामरागडच्या हेमलकसा प्रकल्पात शेकरू, उदमांजर, बिबट्या असे प्राणी बघून आम्ही त्रिवेणी संगमावर पोहचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. इथे तीन नद्यांच्या प्रवाहांचा संगम होतो. पर्लकोटा, पामुल गौतमी आणि इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या मोठ्या नद्या. दोन वेगवेगळ्या नद्यांचे प्रवाह जेथे एकत्र मिळतात तेथे त्यांच्या पाण्याच्या रंगात दिसून यावा इतका बदल नक्कीच जाणवतो. फेसाळते पाणी उथळ खडकांना आपटून पांढऱ्या शुभ्र फेसांच्या प्रवाहाने चांदीसारखे चकाकते. एकाच अखंड झाडाच्या (Tree) खोडापासून बनवलेला लांबलचक, एकेरी ओळीत बसता येईल असा होडका खोल पाण्यात पलीकडे जात होता. बहुदा मासे पकडायची छोटी होडी असावी ती. या संगमावर एक मस्त ‘बांबूहाउस’ आहे. तेथे राहण्याची संधी मिळाली.

Gadchiroli
गडचिरोलीत घटले जंगल क्षेत्र

बांबू हे गडचिरोलीच्या जंगलांतील खास नगदी उत्पन्न मिळवून देणारे झाड. आज अनेक संस्थांच्या व ग्रामसभांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात बांबूचे (Bamboo) संवर्धन व लागवड होत आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळतो. गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत. भामरागड तालुक्यातीलच एका गावात आम्ही गेलो तेव्हा तेथे धातुकाम करणारे कारागीर भेटले. पूर्वी लग्नात लागणारी सनई-पिपाणी अशी पितळी वाद्ये ते बनवत. या वाद्यांवर सुंदर नक्षीकाम करत. अगदी नाजूक व आकर्षक. हे कारागीर सध्या दगड व धातू याचा वापर करून वस्तू बनवतात. त्यासाठी त्यांना पुणे येथे कलाग्राममध्ये जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कलाकारांच्या गावातून पुढे जाताना आम्हाला येथे ‘देवभात’ दिसला. शेताच्या बांधावर, छोट्या वाहत्या प्रवाहांच्या बाजूला हा भात (धान) नैसर्गिकरित्या उगवतो. आपल्याकडे जसे काही गवत पावसाळ्यात (rain) आपोआप उगवतात तसा इथे ‘देवभात’ उगवतो. जुन्या म्हाताऱ्या आजही हा भात गोळा करतात, कांडून त्याचा भात किंवा खीर घरच्यांना खाऊ घालतात.

गडचिरोली जिल्हा तसा बऱ्यापैकी विस्तारलेला आहे. कोरची तालुक्यात इजामसाय यांच्या गावी आम्ही गेलो. कोरचीपासून पुढे छत्तीसगढ राज्य सुरु होते. त्यामुळे येथे गोंड व छत्तीसगडी असे दोन्हीही लोकसमूह वास्तव्य करतात. आम्ही गेलो तेव्हा उन्हाळ्याचे (Summer) दिवस होते. ४५ ते ४८ अंश सेल्सिअस तापमान असायचे. यामुळे म्हणा किंवा आर्थिक टंचाईमुळे असेल; इथल्या लोकांचे या दिवसातील दिवसभराचे खाणे म्हणजे आंबील किंवा बासी. गोंड लोक रात्रभर थोडेसे तांदूळ एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घालून चुलीवर ठेवतात. सकाळी हे शिजून, गळून गेलेल्या तांदळाची पेज बनलेली असते. तीच पेज पोटभर पिऊन लोक आपल्या कामाला बाहेर पडतात. आम्ही होतो म्हणून जेवणासाठी डाळ-भात-कोरलची सुक्की भाजी बनली होती. तांदळाची पेज/आंबील मीठसुद्धा न घालता पिल्यावर मात्र दिवसभर जीव पाणी-पाणी करत नाही, असे आमच्या लक्षात आले.

इथली घरे मातीचीच पण अतिशय आकर्षक व सुंदर रचलेली. लाल किंवा सोनेरी रंगाच्या चमचमत्या मातीने सारवलेली. बसायला मातीचेच चौथरे. घरातली विभागणी मातीच्याच छोट्या भिंतीनी केलेली; त्यामुळे घरातील तापमान तुलनेत थोडेसे थंड. गोंडी भाषा सोडून इतर भाषा समजणारे बहुतेक कुणी नाही. खेकडा, एखादा रंगीत खंड्यासारखा पक्षी मुलांच्या हातात खेळण्यासाठी. जंगल घरापासूनच सुरु. खूप सारी झुडुपे. कुडा, करवंदी अशी भरपूर झाडे. पांढरा कुडा तेव्हा चांगलाच फुललेला होता. या फुलांची भाजी केली जाते. एरवी ही झाडे खूप शोधावी लागतात. इथे गावजेवण होईल इतकी फुले होती.

घरांमध्ये आपण धान्य भरून ठेवतो तसे पोते भरून असलेली मोहाची फुले. इथे मोहाला खूप महत्व आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न तर आहेच पण सांस्कृतिक महत्त्वदेखील. जन्मापासून ते मरणापर्यंत, लग्नापासून ते दैनंदिन वापरात मोहाचे महत्व येथे आहे. मोहाच्या फुलांपासून फक्त अल्कोहोलच नाही तर अनेक खाण्याचे पदार्थ येथे बनतात. मोहाच्या भाकरी, मनुके, आहाते, पानोळ्या असे अनेक भारी प्रकार येथे बनवले जातात. आता तर मोह सरबत, मोहलाडू असे पदार्थ लोकप्रिय होत आहेत. याच गावात भेटली ती चेचे भाजी. घरी खाण्यापुरती प्रत्येक घराच्या परसबागेत ती लावलेली होती. करडई सारखे कातरी असलेली पाने. पण या पानांचा रंग लालमाठ भाजीसारखा भडक लाल. इथल्या सर्वच महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा. हसतमुख व सतत उत्साही असणाऱ्या या महिला पारंपरिक गीते उत्कृष्ट म्हणतात. लिहिता-वाचता येत नसले तरी यांची अनेक गाणी तोंडपाठ असतात व जेव्हा संधी मिळेल तेव्हा सामुहिक गायन व ‘रेला’ नृत्य त्या करतात. अशा निसर्गसंपन्न भागातील, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत देखील समाधानी असणारी इथली माणसे.

धानोरा तालुक्यातील जंगलात तर आम्ही भर उन्हात गेलो. सगळीकडे गवत वाळलेले होते. उन्हाची तीव्रता होती पण दाहकता नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडे होती. मोठमोठी झाडे हे इथले वैशिष्ट्य. गावातील रस्ता लाल-पिवळ्या मातीच्या फुफाट्याने भरलेला, दुतर्फा उंच झाडी. झाडे बहुतेक निष्पर्ण होऊन फळांनी लगडलेली. त्यातले चाराचे झाड त्याच्या घोसात लागलेल्या उठून दिसणाऱ्या काळ्या फळांमुळे लगेच डोळ्यात भरत होती. आम्ही हाताने तोडून ती आंबट-गोड फळे यथेच्छ खाल्ली. अनेक घरांच्या समोर चाराची फळे वाळवण्यासाठी ठेवली होती. आपण सुकामेव्यात जे चारोळी खातो तेच हे चाराचे झाड. वाळवलेली फळे बाजारात विकली जातात.

वाळलेल्या गवतामुळे पिवळ्या पार्श्वभूमीवर निष्पर्ण वृक्ष, फळांनी लगडलेले वृक्ष आणि काही गर्द पोपटी किंवा लाल पालवी ल्यालेले वृक्ष. दूरवर कोठेही शहराच्या खाणाखुणा नाहीत. मातीची घरे. लोक देखील तुरळक घराबाहेर. अशा या खास ग्रामीण-जंगली वातावरणात व्यवहारी जगाचा विसर पडणे हे खूपच स्वाभाविक आहे. उन्हाळ्यातील या दिवसांत या दुर्गम ठिकाणी लोक काय खात असणार? भाजी कशाची करत असावेत? असे प्रश्न होतेच. पिंपळवृक्षाप्रमाणे आकाराने मोठा, गर्द हिरवा पर्णसंभार असणारा पायरीचा वृक्ष. त्याला या दिवसांत पालवी फुटते. या कोवळ्या पालवीची भाजी येथे केली जाते. टेंभुर्नीची चिकुसारखी दिसणारी फळेदेखील या दिवसांत मिळतात.

आज गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभेची मोठी लोकचळवळ उभी राहिली आहे. देवाजी तोफा यांचे मेंढालेखा हे त्यातलेच एक. ग्रामसभेच्या माध्यमातून जंगलांचे जतन व संवर्धन, वनोपजांचा शाश्वत वापर व आवश्यक तेथे पुनर्लागवड अशी कामे केली जात आहेत. त्यामुळे जंगलतोड कमी होऊन लोकसहभागातून संवर्धनच होईल, अशी आशा वाटते. गडचिरोलीचे समृद्ध जंगल, तिथली लोकसंस्कृती, भाषा याचबरोबर इतर जीवसृष्टीचे देखील रक्षण होईल, अशी खात्री वाटते.

इंग्रजांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची कत्तल करून व्यापारी दृष्टीने महत्वाचे असलेले ‘टिंबर वूड’ झाडे लावली गेली. यात सागाचे प्रमाण जास्त होते. एटापल्ली सारख्या ठिकाणी ही झाडे आजही दिसतात. गडचिरोलीत जुने वृक्षवैभव असणारे ठिकाण म्हणजे ‘ग्लोरी ऑफ एटापल्ली.’ ते आवर्जून बघण्यासारखे आहे. हाताच्या कवळीत न बसणारी वृक्षांची खोडे पाहिल्यावर इथले वृक्षवैभव किती समृद्ध असावे, याची जाणीव होते. याच ठिकाणी वेगळ्या कोळ्यांची वेगळ्या पद्धतीने विणलेली जाळी, विविध पक्ष्यांचे मधुर स्वर आणि एक गूढ शांतता जाणवते. या शांततेत १५० वर्षे भारतातील माणसांबरोबरच इथल्या झाडा-झुडपांवर, इथल्या जगलांवर राज्य करणाऱ्या ब्रिटीश राजवटीच्या खाणाखुणा दिसत राहतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com