डॉ. स्वाती साखरे
Animal Husbandry : कासदाह हा दूध देणाऱ्या जनावरांमध्ये होणारा एक महत्त्वपूर्ण आजार आहे, यामुळे कमी दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता बिघडल्यामुळे दूध टाकून द्यावे लागते. प्रतिजैविकांचा वेळेवर आणि विशिष्ट वापर आजाराची तीव्रता लक्षणीयरित्या कमी करण्यास उपयुक्त आहे. कासदाहामुळे सडातील संपूर्ण ऊतकांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे जनावरांच्या उत्पादनक्षम आयुष्यात घट होते. तथापि, प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर केल्यामुळे सूक्ष्मजंतूंमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होत आहे. म्हणून योग्य आणि प्रभावी प्रतिजैविक निवडीसाठी नियमित तपासणी करणे आजच्या काळाची गरज आहे.
प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी म्हणजे सूक्ष्मजंतू विशिष्ट प्रतिजैविकांबद्दल किती संवेदनशील किंवा प्रतिकारक आहेत हे ठरवण्यासाठी केली जाणारी चाचणी. या चाचणीच्या माध्यमातून पशूतज्ज्ञ योग्य आणि प्रभावी औषध निवडू शकतात, ज्यामुळे संसर्ग प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो.
कासदाहाचा प्रसार
कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, उपकरणे तसेच दूध काढणाऱ्या व्यक्तीमार्फत होतो.
संसर्गजन्य घटकांच्या प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आल्यानंतर प्रादुर्भाव होतो.
बहुतेक वेळा जिवाणू हे शरीरांतर्गत निर्माण होणारेच असतात; कास, कातडी, जननेंद्रियांचा बाह्य भाग, श्वसनलिका आणि आतडी इत्यादी अवयवांमध्ये दिसतात.
आजाराची लक्षणे
बाधित सड किंवा सडाचा काही भाग सुजतो, स्पर्शास कठीण वाटतो.
सडाच्या भागाला स्पर्श केल्यास किंवा दूध काढण्याच्या वेळी वेदना होतात.
बाधित जनावराचे दूध उत्पादन अचानक कमी होते.
दुधात गुठळ्या, पाणीदारपणा, पिवळसर किंवा रक्ताच्या धारा दिसतात. दुधाचा रंग किंवा घट्टपणा बदलतो
गंभीर प्रकरणांमध्ये जनावरास ताप येतो.
निदान
स्ट्रीप कप चाचणी.
कॅलिफोर्निया कासदाह चाचणी.
प्रयोगशाळेत बाधित जनावरांच्या दुधातील जीवाणूंचे विलगीकरण करून ओळख करणे.
प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीचे महत्त्व
तंतोतंत उपचार : गायींच्या कासदाहाला विविध जिवाणू कारणीभूत असतात. सर्वच जिवाणूंवर एकच प्रतिजैविक परिणाम करत नाही. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीमुळे कोणते प्रतिजैविक सर्वाधिक प्रभावी आहे हे समजते, ज्यामुळे योग्य आणि जलद उपचार करता येतात.
प्रतिजैविक प्रतिकारशक्ती : प्रतिजैविकांचा अविचाराने वापर केल्याने प्रतिकारशक्ती विकसित होते, ज्यामुळे भविष्यातील संसर्ग उपचार करणे कठीण होऊ शकते. संवेदनशीलता चाचणीमुळे योग्य प्रतिजैविकाचा योग्य वापर होतो, ज्यामुळे प्रतिजैविकांचा अयोग्य आणि जास्त वापर टाळता येतो.
खर्च, प्रभावी उपचार : योग्य प्रतिजैविक ओळखून शेतकरी निष्फळ औषधांचा वापर टाळू शकतात, ज्यामुळे उपचारांचा खर्च कमी होतो आणि आजार लांबल्यामुळे होणारी दुधाची हानी टाळता येते.
योग्य प्रतिजैविकामुळे गायींना लवकर बरे वाटते, ज्यामुळे दुधातील प्रतिजैविकांचे अंश किंवा संसर्गामुळे दूध फेकावे लागण्याचे प्रमाण कमी होते.
आरोग्य : जलद आणि योग्य उपचारांमुळे बाधित प्राण्यांचे वेदना आणि आजारपण कमी होते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि कल्याण सुधारते.
थोडक्यात, कासदाह प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीमुळे प्रभावी उपचार होतो, आर्थिक नुकसान कमी होते आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीशी लढण्यासाठी मदत मिळते.
प्रतिबंधात्मक उपाय
जनावरांची कास व दूध काढणाऱ्याचे हात पूर्वी आणि नंतर जंतुनाशकाने धुवून घ्यावेत.
गोठ्याची जमीन नियमितपणे स्वच्छ ठेवावी.
सडावरील जखमांकडे दुर्लक्ष करू नये.
दुधाची नियमित तपासणी करून घ्यावी
निर्जंतुक न केलेल्या वस्तू सडांमध्ये घालू नयेत.
दूध काढण्यासाठी पूर्ण मूठ पद्धतीचा वापर करावा.
दूध काढल्यानंतर किमान अर्धा तास जनावरास खाली बसू देऊ नये.
दूध काढणीनंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवून घ्यावेत.
मिल्किंग मशिनचे कप स्वच्छ आणि निर्वात दाब योग्य प्रमाणात असावा.
दुधाचा नमुना गोळा करण्याची पद्धत
दूध तपासणीसाठी दुधाचा नमुना गोळा करताना सडातील दोन ते तीन धारा काढून टाकाव्यात, त्यानंतर निर्जंतूक सिरींज मागील पिस्टन काढून त्यात पाच मिलि दूध घ्यावे. दूध घेताना हवेचा संपर्क कमीत कमी असावा.
दूध सिरींज मध्ये घेतल्यानंतर पिस्टन पूर्ववत लावावा. हा नमुना आवश्यक माहितीसह बर्फावर ठेवून चार ते सहा तासात प्रयोगशाळेत पाठवावा.
बाधित जनावरांना प्रतिजैविके देण्याआधी नमुना गोळा करणे आवश्यक आहे.
डॉ. स्वाती साखरे, ९५६१९९१२९४
(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय. उदगीर, जि. लातूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.