
डॉ. श्रीकांत काळवाघे,
डॉ. बाबासाहेब नरळदकर
जंतनाशकांचा प्रतिरोध (Resistance to Dewormer) टाळणे आणि जंतनाशकाचा (Deworming) प्रभाव पुर्णपणे उपयुक्त ठरण्यासाठी काही उपायदेखील महत्त्वाचे आहेत. त्यापैकी प्रमुख उपाय म्हणजे योग्य जंतनाशकाची निवड (Selection Of Dewormer). जनावरांमध्ये गोलकृमी (Roundworm), पर्णकृमी (Leaf Worm) आणि पट्टकृमी असे जंताचे परकार दिसतात. (Animal Care)
योग्य जंतनाशकाची निवडीची कारणे ः
१) जंताचे भिन्नगट आणि जंतनाशकांचे भिन्न प्रवर्ग ः
- गोलकृमी, पर्णकृमी आणि पट्टकृमी या गटातील कृमींचे जीवनचक्र, अन्न रस शोषण करण्याच्या पद्धती, शरीरात भिन्न ठिकाणी असणारे वास्तव्य आणि जनावरांचया शरीरात वास्तव्य करण्याचा कालावधी आणि पशुधनाच्या शरीरात त्यांच्या अर्भक अवस्थांचे स्थलांतरण हे भिन्न असतात. या कारणास्तव प्रत्येक गटातील कृमींसाठी देण्यात येणारी जंतनाशके भिन्न असतात.
- जंतनाशकाची कृमींवर परिणाम करण्याच्या पद्धतीदेखील भिन्न असतात. काही प्रवर्गातील जंतनाशके कृमींची ऊर्जा निर्माण करण्याची साखळी तोडतात तर काही प्रवर्गातील जंतनाशके कृमींच्या मज्जातंतूंवर परिणाम करतात.
- कृमींचे भिन्नगट आणि त्यांच्यावर परिणाम करणारी जंतनाशके यांचे भिन्न गट आणि त्यातून निर्माण होणारी वेगवेगळी समीकरणे योग्य तयार झाली तरच दिलेले जंतनाशक प्रभावीपणे कार्य करते. कृमींचा प्रकार आणि इतर घटक लक्षात घेऊन कृमींच्या प्रजातीनुसार योग्य जंतनाशकाची निवड करावी.
२) जनावरांची गर्भावस्था :
- योग्य जंतनाशकाची निवड करण्यासाठी महत्वाचे कारण म्हणजे जनावराची गर्भावस्था.
- सर्वसामान्यत: शेळी, मेंढीच्या सर्व वयोगटामध्ये प्रसूतिपूर्व किंवा प्रसूतिपश्चात तात्काळ एकवेळ जंतनाशकाची मात्रा दिली जाते. म्हणजेच गाई-म्हशींमध्ये प्रसूती काही दिवस शिल्लक असताना आणि शेळी, मेंढीमधे प्रसूतीचा विचार न करता सर्वसामान्यपणे जंतनाशक औषधाची मात्रा दिली जाते. संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे, की काही जंतनाशके प्रसूतीदरम्यान दिल्यास त्याद्वारे गर्भपात संभवतो व गर्भपातामुळे हानी होते.
- गर्भावस्था, कृमींचे ३ गट आणि जंतनाशकाच्या परिणामानुसार त्यांचे भिन्न प्रवर्ग या बाबींचा प्रमुख्याने जंतनाशकाची मात्रा देतेवेळेस विचार करावा.
३) जनावराचे वय :
- काही जंतनाशके खूप लहान वयात दिल्यास त्यांचा आतड्यावर परिणाम होतो. त्यायोगे लहान वयातील पशुधनाचे स्वास्थ्य बिघडू शकते. म्हणून वयानुसार देखील जंतनाशकाची निवड करण्यात यावी.
योग्य जंतनाशकाची निवड :
जंतनाशकाचया निवडीसाठी पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. केवळ बाजारात उपलब्ध आहे, स्वस्त आहे, या बाबींचा विचार न करता आपल्या कळपातील एकूण जनावरांच्या १० टक्के जनावरांच्या विष्ठेचे नमुने पशुतज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. त्याच्या तपासणी अहवालानुसार पशुवैद्यक अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य जंतनाशकाची निवड करावी.
जंतनाशके देण्यामागचे अर्थशास्त्र ः
१) गाय, म्हशीच्या वासरतील मृत्युदर ३० टक्के घटू शकतो.जंतनशकाची मात्रा वयाच्या ७ व्या दिवशी द्यावी.
२) शेळी व मेंढी मध्ये हिमॉंकस कॉनटोरटस या कृमी लागण होते. त्यामुळे मृत्यू होतो. याची एकंदरीत किंमत १,१६० रुपये प्रति शेळी आणि १,२२८ रुपये प्रति मेंढी होते. हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
३) योग्य वेळेस प्रौढ गाय, म्हशीला जंतनाशक दिल्यास ७.८२ टक्के दूध वाढ संभवते.
४) गाय/ म्हैस/शेळी/मेंढी यांच्या प्रसूतीनंतर जर जंतनाशकाची मात्रा दिल्यास पडकावर कृमीच्या पडणाऱ्या अंड्याची संख्या एकदम घटते. अशा पडकावर चारल्यानंतर कृमीचा अत्यल्प प्रादुर्भाव होतो. पर्यायी जंतनाशकावरील खर्च कमी होतो. उत्पादनात वाढ होते.
जंतनाशक देण्यासाठी वयोगट
वयोगट---गाय/ म्हैस---शेळी/मेंढी
१ महिन्यापेक्षा कमी--- वयाच्या सातव्या दिवशी (टोक्षोक्यारा विटूलोरम या कृमीसाठी)---द्यावयाची गरज नाही.
१ महिना ते ६ महिने---पावसाळा ऋतु अथवा गवत चरवयास उपलब्ध असलेल्या काळात ३५ ते ४० दिवसांनी मात्रा (उन्हाळा ऋतू व गवत चरावयास नसल्यास देऊ नये) --- पावसाळी हंगाम किंवा गवत चरवयास उपलब्ध असलेल्या काळात ३५ ते ४० दिवसांनी मात्रा (उन्हाळी हंगाम तसेच गवत चरावयास नसल्यास देऊ नये)
प्रौढ ---द्यावयाची आवश्यकता नाही. परंतु दर पावसाळा हंगामामध्ये उपलब्ध जनावरांच्या १० टक्के जनावरांचे नमुने तपासणी करून जर आवशकता असेल तरच मात्रा द्यावी.*प्रसूतिनंतर तात्काळ एका जंतनाशकाची मात्रा गाय/म्हैस/शेळी/मेंढी यांना द्यावी. ----सर्व वयोगटांमध्ये विशेषत: पावसाळा व हिवाळा हंगामामध्ये आणि गवत चरावयास उपलब्ध असताना संपूर्ण कालावधी मध्ये ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने द्यावी.*प्रसूतीनंतर तात्काळ एका जंत नाशकाची मात्रा गाय/म्हैस/शेळी/मेंढी यांना द्यावी.
विशेष टीप ---जेथे गाय, म्हैस बंदिस्त पालन केले जाते, त्यांच्यामध्ये सरासरी जंतनाशकाची मात्रा देण्याची आवश्यकता नाही.
पट्टकृमी :
१) याचा प्रादुर्भाव वासरे, करडे, कोकरे जेव्हा पडकावर चरावयास जातात तेव्हा होतो. म्हणून साधारणपणे पडकावर चरावयास गेल्यानंतर एक वेळ विष्ठा तपासणी करून घ्यावी.
२) जनावरांच्या शेणामध्ये भाताच्या शीतासारखे पट्टकृमीचे तुकडे येत असतील तर त्यांना पट्टकृमी वर प्रभावी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
पर्णकृमी :
१) याचा प्रादुर्भाव गोगलगायी मार्फत होतो. तळ्याकाठी जेथे जनावरे पाणी पिण्यासाठी जातात अशा ठिकाणी गोगलगायींचे प्रमाण वाढल्यास जनावरांमध्ये यकृत कृमी, पोटातील पर्णकृमीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून ढोबळमानाने खालील लक्षणे दिसल्यास पर्णकृमीजन्य जंतनाशकाची मात्रा द्यावी.
१) गाय व म्हशींच्या शेणामध्ये रक्ताचे थेंब येत असतील.
२) शेळी/ मेंढीस कावीळ सदृश लक्षणे दिसतात.
३) शेळी /मेंढीच्या गळ्याखाली सूज आली असेल.
४) सततची हागवण, परंतु शरीराचे तापमान स्थिर आहे.
टीप ः लक्षणे दाखविणाऱ्या जनावराच्या विष्ठेची तपासणी करून प्रभावी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४
(पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.