Poultry Farm : पावसाळ्यात कोंबड्यांचे योग्य नियोजन आवश्यक

How to Care Poultry Farm : दमट वातावरणामुळे कोंबड्यांना श्‍वसनाचे आजार होतात. डास, माश्‍यांच्या माध्यमातून विविध आजारांचा प्रसार होतो. हे लक्षात घेऊन खाद्य, पाणी, लिटर, भांडी आणि शेड परिसराची स्वच्छता या सर्व बाबींचे नियोजन योग्य पद्धतीने करावे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. महेश जावळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. अतुल ढोक

पावसाळ्यामध्ये वातावरणातील सापेक्ष आर्द्रता वाढते, तापमानात घट होते. या बदलामुळे कोंबड्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दमट वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये श्‍वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. शेड तसेच सभोवतालच्या परिसरात डास, माश्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे कोंबड्यांमध्ये विविध आजारांचा प्रसार होतो. ओले आणि दमट वातावरण अनेक जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

Poultry Farming
Poultry Farming : अभ्यास, उत्तम व्यवस्थापनातून यशस्वी पोल्ट्री उद्योग

लिटरचे व्यवस्थापन

१) आर्द्रता वाढल्यामुळे शेडमध्ये अंथरलेल्या लिटरची आद्रता शोषण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे शेडमधील लिटरची आर्द्रता वाढते. शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर लिटरमध्ये रोगजंतूंची वाढ होते, कोंबड्या आजारी पडतात.

२) पावसाळ्यात लिटर (कोंडा) जमिनीवर तीन इंच उंचीपर्यंत अंथरावा. छतावरून होणारी पाणी गळती, कमी जागेत अधिक कोंबड्या ठेवणे, अतिसार यामुळे लिटर खराब होऊन आजार उद्‍भवू शकतात.

३) लिटर जास्त प्रमाणात ओले झाल्यास तो भाग काढून टाकावा. त्या ठिकाणी नवीन भुसा टाकावा. आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळावा. शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.

४) कोंबड्यांमध्ये पावसाळ्यात पोटाचे आजार वाढतात. पातळ विष्ठा होते, यामुळे लिटरची गुणवत्ता ढासळते. या दूषित लिटरमुळे कोंबड्यांचे आंतरिक आरोग्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी शेडमधील लिटरची गुणवत्ता तपासावी. कोंबडीच्या पायांच्या नखांच्या भोवती लिटर गाठीप्रमाणे जमा झाले आहे का, याची चाचपणी करावी. तसे असल्यास शेडमध्ये लिटर ओलाव्यात वाढ झाल्याचे समजावे.

५) लिटर हाताच्या मुठीत घेऊन बांधून बघावे, जर लिटर एकत्रित गोळा होऊन बॉल तयार झाला तर त्याची गुणवत्ता कमी झाली, असे समजावे. अशा वेळी लिटर रेकिंग वाढवावे. लिटर भुसभुशीत राहील, याची काळजी घ्यावी. दिवसातून किमान एक ते दोन वेळा लिटर खाली-वर हलवून घ्यावे.

Poultry Farming
Poultry Business : नोकरीत मन रमले नाही म्हणून सांगलीच्या युवतीने सुरु केला पोल्ट्री व्यवसाय

पिलांसाठी ब्रूडिंग

१) पावसाळ्यात तापमान कमी होते त्यामुळे ब्रूडिंग करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पाऊस, वादळ यामुळे विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो. नवीन आणलेल्या पिलांना ब्रूडिंगसाठी वीजेचा अखंडित पुरवठा असणे गरजेचे आहे.

अमोनियाची पातळी

१) पोल्ट्री शेड बऱ्याच वेळासाठी पडद्याने बंद करतात. परिणामी, हवा खेळती राहत नाही. त्यामुळे शेडमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन अमोनियाचे प्रमाण वाढते. शेडमध्ये एक्झॉस्ट फॅन लावावेत, हवा खेळती राहील यासाठी आवश्यकतेनुसार पडदे उघडावे.

विषबाधेची समस्या

१) पावसाळ्यात खाद्य आणि लिटर ओलसर होते. त्यामुळे अल्फाटोक्सिकोसिस, ब्रूडर न्यूमोनियामुळे कोंबड्यांच्या मृत्युदरामध्ये वाढ होते. खाद्य आणि लिटर ओले होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

आजाराचा प्रसार

१) पावसाळ्यात कोंबड्यांना श्‍वसनाचे आजार होतात. अस्वच्छ ओल्या लिटरमुळे आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी कोंबड्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंताचे औषध द्यावे. लसीकरण काटेकोरपणे करावे.

२) दूषित लिटरमधून कॉक्सिडिओसिस हा आजार होतो. कॉक्सिडिओसिस होऊ नये याकरिता लिटर व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. कॉक्सिडिओसिस आजारात कोंबड्यांना रक्ती हगवण दिसून येते. अशावेळी पशुवैद्यकांमार्फत त्वरित आवश्यक औषधोपचार करावा.

३) कोंबड्यांची संख्या कमी असल्यास लिटर बदलून जागा बदलून पाळावे.

खाद्य साठवणूक

१) वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे बरेचदा खाद्याला बुरशी लागते. त्यामुळे शक्यतोवर आवश्यक तेवढ्या खाद्याची साठवणूक करावी. खोलीत खाद्याची बॅग जमिनीला चिटकवून न ठेवता स्टॅण्डवर ठेवावी. जेणेकरून जमिनीमधील ओलावा खाद्याला लागणार नाही. खाद्याच्या बॅगला चोहोबाजूने हवा लागेल याची काळजी घ्यावी.

२) शेतकरी खाद्य स्वत: तयार करत असेल तर खाद्य गुणवत्ता वाढविण्यासाठी खाद्यामध्ये अँटिऑक्सिडंट, टॉक्सिन बाईंडर तसेच कोक्सिडिओस्टेट योग्य प्रमाणात मिसळावे.

३) खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास, असे खाद्य देऊ नये.

४) पावसाळ्यातील अस्वच्छ वातावरण, दूषित पाणी, बुरशीयुक्त खाद्य, ओली गादी इत्यादी कारणांमुळे कोंबड्यांमध्ये आतड्यासंबंधी समस्या उद्‍भवतात, ज्यामुळे खाद्यातील पोषक तत्त्वांची पचन क्षमता आणि वाढीवर विपरीत परिणाम होतो.

Poultry Farming
Poultry Market: उत्पादन खर्च महागल्यानं पोल्ट्री उत्पादक मेटाकुटीला | Agrowon

शेडची रचना

१) छप्पर गळके असल्यास तेथे योग्य उपाययोजना करावी. शेडमध्ये पावसाचे पाणी येऊ नये म्हणून ओव्हरहॅंग कमीतकमी पाच फूट ठेवावे.

२) बाजूची भिंत कमीत कमी एक फूट आणि जास्तीत जास्त दोन फूट ठेवावी, जेणेकरून पावसाचे पाणी शेडमध्ये येणार नाही. शेडची उंची जमिनीपासून कमीत कमी तीन फूट असावी.

३) पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी शेडमध्ये चुना मारून घ्यावा. शेडबाहेर प्लॅस्टिकच्या पडद्यांचा वापर करावा. शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आवश्यकतेनुसार पडद्यांची उघडझाप करावी. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. कोंबड्यांना वातावरणातील बदलाचा त्रास होत नाही.

४) सारखा पाऊस पडल्याने नवीन गवताची वाढ जोमाने होते. पोल्ट्रीशेड भोवती वाढलेले गवत काढून टाकावे. शेडची भिंत सिमेंट विटांची असेल तर आतून, बाहेरून चुना लावावा.

५) शेडच्या बाहेर फुटबाथचा वापर करावा. बाहेरील व्यक्ति, वाहने यांना शेड परिसरात येण्यास प्रतिबंध करावा.

६) मेलेल्या कोंबड्या उघड्यावर फेकू नये. त्यांना खड्ड्यामध्ये पुरावे. यामुळे जंतू संसर्ग पसरण्याचा धोका टळतो.

माश्‍यांचा प्रादुर्भाव

१) अस्वच्छ वातावरणामुळे शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी लिटरची काळजी घ्यावी. २५ मिलि लिंबोळी अर्क १००० लिटर पाण्यामध्ये मिसळून शेडच्या अवतीभोवती व शेडमध्ये फवारणी करावी.

२) शेडमध्ये फिनाईल, जंतुनाशकाची फवारणी करावी.

पाण्याची गुणवत्ता

१) पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता खालावते, अस्वच्छ पाणी दिल्याने कोंबड्या आजारी पडतात.

२) पिण्याच्या पाण्याचा सामू ६.६ ते ६.८ असावा. पाणी स्वच्छ असावे.पशुवैद्यकांच्या शिफारशीनुसार पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर, क्लोरिन गोळ्या मिसळावे. साधारणपणे पाणी निवळल्यानंतर ३० मिनिटांनंतर कोंबड्यांना पिण्यासाठी द्यावे.

३) पाण्यामधील खनिजांचे प्रमाण तसेच इतर दूषितता तपासावी. दूषित आणि अशुद्ध पाणी प्यायल्याने श्‍वसनाच्या समस्यांची तीव्रता वाढते. कोक्सीडिओसिस, ई कोलाय सारखे आजार होतात.

भांड्यांची स्वच्छता

१) अनेक वेळा कोंबड्या पाणी पीत असताना त्यांची विष्ठा भांड्यात पडते. भांडी नियमित साफ न केल्यास पाण्यात पडलेली विष्ठा आजार पसरविण्यासाठी कारणीभूत ठरते.

२) दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाण्याची भांडी स्पंज किंवा ओल्या कापडाने पुसून घ्यावीत.

३) पिण्याच्या पाण्याची भांडी ही कोंबडीच्या मानेच्या लगत उंचीवर ठेवावी जेणेकरून पाणी पिण्यास सोईस्कर ठरेल. पाण्याची भांडी अशाप्रकारे लावावीत की कोंबड्यांना ६ ते ७ फूट अंतरामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, त्यांना जास्त चालावे लागणार नाही.

४) पिण्याच्या भांड्याखालील जागा नेहमी ओली होते, त्यामुळे त्या जागेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी ओलावा निर्माण झाला असेल तर भांड्यांची जागा बदलावी.

५) पाण्याची लोखंडी टाकी गंजू नये यासाठी आतून आणि बाहेरून रेड ऑक्साइड लावावे.

संपर्क ः डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५

(पशुपोषणशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com