
पक्ष्यांना होणाऱ्या आजारांवर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. हे आजार विषाणूजन्य, (Viral) जिवाणूजन्य, (Bacterial) बुरशीजन्य (Fungal) किंवा परजीवीमुळे होत असतात. पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढून नुकसान होते. त्यामुळे आजाराचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पक्ष्यांमधील विविध आजारांची लक्षणे ओळखून उपचार करण्यासाठी पुढील शिफारशी केल्या आहेतः
१) जिवाणूजन्य आजार
कॉलरा ः पक्षांना हिरवट, पातळ विष्टा होऊन ताप येतो. पक्षी अचानक मरतात.
पांढरी हगवत ः हा आजार लहान पिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अढळतो. पांढरी विष्ठा होऊन पोट दुखते.
निळा तुरा ः हा आजार मोठ्या पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो. ताप येणे, तुरा निळा पडणे अशी लक्षणे दिसून येतात.
२) विषाणूजन्य आजार
राणीखेत किंवा मानमोडी ः मान वाकडी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक लासोटा लस पाण्यातून पक्ष्यांना द्यावी.
देवी ः पक्ष्यांना केस नसलेल्या भागावर फोड उठून खपल्या धरतात. ताप येतो. देवीची लस नियमित टोचूण घ्यावी. पक्ष्यांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या अवयवांवर या रोगाचा परिणाम होतो. त्यामुळे पक्ष्यांची रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होते. त्यामुळे ते सहज इतर आजारांना बळी पडतात. निरोगी पक्ष्यांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
मॅरेक्स ः एक ते पंधरा दिवसांच्या पिलांना हा आजार होतो. पिले पांगळे होतात व अशक्त होऊन मरतात. एक दिवसाच्या पिलांना या आजाराची लस पायाच्या स्नायूमध्ये टोचावी.
३) एक पेशीय जंतू पासून होणारे आजार (अमिबा)
कॉक्सिडीओसीस रक्ती हगवण ः एक ते सहा आठवड्यांच्या पक्षांना जास्त प्रमाणात होतो. रक्तासारखी लालसर हगवण होते. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खाद्यातून, पाण्यातून औषधे द्यावीत.
अंतर्गत जंत ः पक्ष्यांच्या पोटात गोल व चपटे जंत असतील तर पक्ष्याची भूक मंदावते. पक्षी अशक्त होतात. दर तीन महिन्यातून एकदा पक्ष्यांना जंतनाशकाची मात्रा पाण्यातून द्यावी.
उपचार
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पक्ष्यांना खाद्यातून किंवा पाण्यातून औषधे द्यावीत. वेळापत्रकानुसार पक्ष्यांचे वेळच्यावेळी लसीकरण करावे.
आजारी कोंबड्या आणि त्यांची खाद्य, पाणी पिण्याची भांडी वेगळी ठेवावी.
जवळपास एखाद्या आजाराची साथ आल्यास पाण्यात अँटीबायोटिक व व्हिटॅमिन युक्त औषधे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार मिसळावीत.
पक्ष्यांची घरे स्वच्छ व कोरडी ठेवावीत. त्यांना चुना लावावा किंवा जंतुनाशक औषधाचा फवारा मारून स्वच्छ ठेवावीत.
धील फटीत गोचिडे दडून बसतात, तसेच फटीमध्येच अंडी घालतात. अशा सर्व जागांवर शिफारशीत किटकनाशकांची फवारणी करावी.
आजाराने मेलेल्या कोंबड्या खोल पुराव्यात किंवा जाळून टाकाव्यात.
कोंबड्यांना नियमित स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
कोंबड्या खुराड्यात दाटीने ठेवू नये.भरपूर हवा व उजेड न मिळाल्याने त्या आजारी पडतात. खुराड्यात मोकळी जागा, हवा व उजेड असावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.