
Indian Cow : भारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची आणि दूध देण्याची क्षमता आहे. बाजारपेठेत देशी गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे. पण जातिवंत देशी गायींच्या बऱ्याचशा जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकीच कृष्णा व्हॅली हा देशी गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कृष्णा व्हॅली गायीचे उगमस्थान कर्नाटकातील विजापूर, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या खोऱ्यातील आहे. हैदराबादच्या नैऋत्य भागातही कृष्णा व्हॅली जातीच्या गायींचे संगोपन होते. याशिवाय महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही कृष्णा व्हॅली गायी अढळतात.
या जातीच्या गायींचा रंग पांढरा ते तांबूस करडा किंवा काळसर अशा मिश्र छटेचा असतो. शिंगे मागून पुढे येणारी वक्र असतात. कपाळ अरुंद व लांबट असते. कपाळाच्या मधोमध खाच असते. वशिंड मध्यम आकाराचे, डोळे उभे व काळे. कान अरुंद, कास लहान, चारही सड लगत असतात. या जातीच्या गायी एका वेताला सरासरी ४०० ते ७०० लिटर दूध देतात. उष्ण वातावरणातही तग धरुन राहतात.
शरीर लहान आणि चांगले विकसित असते. पाय लहान, जाड आणि शक्तिशाली दिसतात, तर खुर मऊ असतात. बैलाची सरासरी उंची १४५ सेमी असते आणि गायीची सरासरी उंची १२२ सेमी असते. बैलाचे सरासरी वजन ५०० ते ६०० किलो असते आणि गायीचे वजन ३०० ते ३५० किलो असते. प्रचंड ताकद व गतीने काम करणे हे या जातीच्या बैलांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या जातीचे बैल शेतकाम व ओढकामासाठी उपयुक्त आहेत.
ही जात गुजरातमधील गीर आणि कांकरेज, आंध्र प्रदेशातील ओंगोल आणि म्हैसूर मधील गायींपासून विकसित झाल्याचे सांगितले जाते. ही जात अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी, नंतरच्या काळात यांत्रिकीकरणामुळे आणि शेतकऱ्यांनी जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या जातींची निवड केल्यामुळे या जातीचे महत्त्व कमी होत गेले. या जातीच्या जनावरांच्या खुरांचा मऊपणा आणि त्यांचे वजन जास्त असल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर भागातील शेतकरी या जातीचे संगोपन करत नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.