Poultry Management : वातावरण बदलानुसार कोंबड्याचे व्यवस्थापन

हिवाळ्यात अतिथंडीमध्ये कोंबड्यांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे कोंबड्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो. त्यासाठी व्यवस्थापन पद्धतीत योग्य ते बदल करावेत.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon
Published on
Updated on

Poultry Management : हिवाळ्यामध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवते. अचानक वाढलेल्या थंडीमुळे (Cold Weather) कुक्कुट पक्ष्यांवर ताण येतो. तापमानातील प्रतिकूल बदलांचा कुक्कुट पक्ष्यांवर त्वरित परिणाम होतो.

याचा खाद्य आणि पाणी सेवनाच्या प्रमाणावर परिणाम होतो. परिणामी, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या (Chicken) विविध आजारांस बळी पडतात. यासाठी वातावरण बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात योग्य बदल करणे आवश्यक असते.

कमी तापमानामुळे होणारे परिणाम ः

१) खाद्य खाण्याचे प्रमाण ः

हिवाळ्यामध्ये कोंबड्या जास्त खाद्य खातात. कारण शरीराचे तापमान वातावरणातील बदलांमध्ये नियंत्रित राखण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यासाठी अन्नघटकापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा बराचसा भाग खर्च करावा लागतो.

थंडीच्या दिवसांत कोंबड्यांना कमी खाद्य दिल्यास किंवा व्यवस्थापन पुस्तिकेत वयानुसार दर्शविलेल्या खाद्य प्रमाणापेक्षा कमी खाद्य दिल्यास ते अपुरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची वाढ खुंटण्याची शक्यता असते.

२) पक्ष्यांची गादी (लिटर) ः

कोंबड्यांच्या शेडमधील गादी विशेषतः हिवाळ्यामध्ये ओलसर राहते. कारण हिवाळ्यात गादीतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. गादी ओलसर राहिल्यामुळे त्यात विविध जिवाणू, बुरशींची वाढ होते. त्यामुळे कोंबड्या आजारास बळी पडतात.

३) आजारांची बाधा ः

हिवाळ्यात कोंबड्यांना श्‍वसनास त्रास होणे, जिवाणूजन्य, बुरशीजन्य आजाराची बाधा होते. त्यामुळे कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. शिवाय अचानक तापमान कमी झाल्यामुळे अति थंडीमुळे पक्षी गारठून मरण्याची शक्यता अधिक असते.

Poultry Management
Indigenous Chickens Breed : देशी कोंबड्यांच्या विविध जातींची ओळख

४) लहान पिलांमधील मरतुक ः

तापमान अचानक कमी झाल्यामुळे लहान पक्ष्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढते. त्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र वीजपुरवठा खंडित झाला, तर त्वरित योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास मरतुकीचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढते.

हिवाळ्यामधील पक्ष्यांचे व्यवस्थापन ः

१) पक्ष्यांची गादी ः

१) हिवाळ्यामध्ये कुक्कुट पक्ष्यांच्या शेडमधील गादी कायम कोरडी राहील याची काळजी घ्यावी. ओलसर झालेला भाग काढून टाकावा.

२) ओल्या झालेल्या गादीमध्ये चुनखडी मिसळून आर्द्रतेचे प्रमाण करता येते. यासाठी साधारण १ किलो चुनखडी प्रति १२ ते १६ चौरस फूट या प्रमाणे गादीमध्ये मिसळावी.

३) शक्य असल्यास संपूर्ण गादीच बदलणे योग्य होईल.

४) गादी ओली झाल्यामुळे शेडमध्ये अमोनिया वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंबड्या विविध आजारास बळी पडतात.

Poultry Management
Backyard Chicken Breed : परसबागेतील संगोपनासाठी देशी कोंबड्यांच्या विविध जाती

२) पाणी ः

१) कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे.

२) पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रथम पाण्यावरून तुरटी फिरवावी. नंतर ते किमान २४ तास संथ ठेवावे. यामुळे पाण्यातील गाळ तळाला जाऊन बसतो आणि पाणी स्वच्छ होते. त्यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा.

३) थंड वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा. यामध्ये जीवनसत्त्व ब, क किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर किंवा ताण कमी करणाऱ्या औषधांचा वापर करावा.

३) खाद्य ः

१) हिवाळ्याच्या दिवसांत कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात. त्यामुळे कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्य घटकांमध्ये आवश्यक ते बदल करावेत. जेणेकरून योग्य प्रमाणात पुरेशा खाद्य घटकांचा पुरवठा होईल.

२) खाद्यामध्ये ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढविणे आणि प्रथिनांचे प्रमाण थोडेसे कमी करणे आवश्यक असते. जास्त ऊर्जा निर्माण करणारे अन्नघटक जसे की पिष्टमय पदार्थ (उदा. मका, ज्वारी) यांचे प्रमाण वाढवावे आणि प्रथिने (तेलबिया, पेंड, मासळी चुरा, सरकी पेंड) यांचे प्रमाण थोडे कमी करावे. यासाठी पशू आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर होईल.

३) ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये ब्रॉयलर मॅशसारख्या नेहमीच्या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १८ ते २० टक्के असते. ते २३ टक्क्यांपर्यंत वाढवावे. तर ऊर्जेचे प्रमाण ३००० किलो कॅलरी वरून ३२०० कॅलरीपर्यंत वाढवावे.

४) कोंबड्यांच्या खाद्यामध्ये खनिज, क्षार आणि जीवनसत्त्वे यांचा संतुलित प्रमाणात पुरवठा सुरूच ठेवावा.

५) कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि वातावरणातील ताण सहन करण्याची शक्ती वाढविण्यास जीवनसत्त्व अ आणि इ मदत करतात. त्यामुळे ही जीवनसत्वे खाद्यातून अथवा पाण्यातून देणे योग्य ठरेल. याशिवाय ताण कमी करण्यासाठी पाण्यातून इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशिअम क्लोराइड्स, सोडिअम बायकार्बोनेट, सोडिअम क्लोराइड इत्यादींचा वापर करावा.

लेखक - डॉ. संतोष मोरेगावकर, ९९३०६८२४२१ (पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com