Animal UMMB : बऱ्याच पशुपालकांना खनिज मिश्रणाचे महत्व माहीत नसते, खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे जनावरांची दुग्धोत्पादन (Milk Production) आणि प्रजनन क्षमता कमी होते. खनिज कमतरतेमुळे जनावरे भिंत चाटतात, चप्पल, पिशव्या, रबर इत्यादी अखाद्य वस्तू खातात.
खनिजे जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्यक असते. यावर उपाय म्हणून उत्तरप्रदेश बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने जनावरांतील खनिज कमतरता भरुन काढण्यासाठी युरिया मोलॅसीस मीनरल ब्लॉक्स् (UMMB) विकसीत केले आहेत. या ब्लॉक्सलाच जनावरांसाठीचे चॉकलेट म्हणता येईल.
खनिज कमतरतेचा परिणाम वासराच्या वाढीवर, मोठ्या जनावरांच्या दुग्धोत्पादनावर आणि प्रजोत्पादनावर होतो. जनावरांना खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करतात.
युरिया मोलॅसीस मीनरल ब्लॉक्स् युरिया, गूळ, खनिज मिश्रण व इतर घटक योग्य प्रमाणात मिसळून तयार केले आहेत. हे ब्लॉक्स कोल्ड प्रेस तंत्राने तयार करण्यात आले आहेत.
दुधाळ जनावरांसाठी ऊर्जा, प्रथिने आणि खनिजांचा हा सहज उपलब्ध होणारा स्त्रोत आहे.
चारा कमतरतेमुळे ज्या ठिकाणी जनावरांना केवळ कोरडा चारा दिला जातो. अशा ठिकाणी हे ब्लॉक्स् फायदेशिर ठरतात. हे ब्लॉक तयार करण्यासाठी वापरलेले घटक ग्रामीण भागातही सहज उपलब्ध होतील असे आहेत.
वाळलेल्या चाऱ्यामध्ये पचनास कठीण असलेले घटक, जसे की तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिनांचे प्रमाणही खूप कमी असते. युरिया मुळे प्रथिनांचे प्रमाण १-१.५ टक्क्यापासून ३-४ टक्क्यापर्यंत वाढते आणि पचनीय क्षमता २०-३० टक्क्यांनी वाढते.
युरिया मुळे चाऱ्याची चव बदलते, नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. युरियामध्ये नत्राचे म्हणजेच नायट्रोजन चे प्रमाण ४६ टक्के इतके असते.
म्हणून युरिया हा नत्राचा अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे. मात्र तो योग्य प्रमाणात मिसळायला हवा.
आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर युरियाची विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे जनावर दगावण्याची देखील शक्यता असते.
या ब्लॉक्सचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी हे तंत्रज्ञान डेअरी सहकारी संस्था, खासगी संस्था आणि इतर एजन्सींना पुरविले जात आहे.
हिरव्या चाऱ्याची कमतरता असलेल्या भागातील दूध उत्पादकांसाठी युरिया मोलॅसीस मीनरल ब्लॉक्स् अत्यंत उपयुक्त आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.