डॉ.अनिल भिकानेRural Economy: या वर्षीच्या जागतिक पशुवैद्यक दिनाची अधिकृत संकल्पना ‘पशुवैद्यक : अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याचे खरे रक्षक’ ही आहे. आजच्या काळात पशुवैद्यक केवळ प्राण्यांचे उपचार करणारे डॉक्टर नसून ते अन्नसाखळीचे रक्षक, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षक, पर्यावरणपूरक अन्नप्रणालीचे समर्थक आणि जागतिक आरोग्य सुरक्षेचे प्रमुख घटक बनले आहेत. पशुवैद्यक हे अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. .आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीच्या युगात अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय ठरले आहेत. आपण जे अन्न खातो ते सुरक्षित, पोषक आणि रोगमुक्त आहे का, हा प्रश्न प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. जागतिक पशुवैद्यक दिन दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो..Animal Health Services: अपुऱ्या कर्मचारी संख्येने पशुसेवेवर परिणाम.अन्नसाखळीचे रक्षकदूध, मांस आणि अंडी हे प्राणिजन्य अन्नपदार्थ मानवी आहारातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. या अन्नपदार्थांमध्ये अन्नसुरक्षा आणि अन्नसुरक्षितता सुनिश्चित करणे म्हणजे स्वच्छ, रोगमुक्त, पौष्टिक अन्न सर्वांना उपलब्ध राहणे. या संपूर्ण प्रक्रियेत पशुवैद्यकांची भूमिका केंद्रस्थानी आहे..अन्नसुरक्षासुरक्षित आणि दर्जेदार अन्नअन्नसुरक्षा म्हणजे दूध, मांस आणि अंडी यांसारखे प्राणिजन्य पदार्थामध्ये कोणतेही रोगजंतू, रसायने, प्रतिजैविके किंवा दूषित घटक नसणे..स्वच्छ व सुरक्षित दूधपशुवैद्यक केवळ दुधाळ जनावरांचे आजार दूर करत नाहीत, तर दुधातून होणारे संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण आणि स्वच्छ दूध उत्पादनासाठी मार्गदर्शन करतात. अँटिबायोटिक वापरानंतर ‘विथड्रावल पीरिएड’ पाळण्याची सूचना देतात. यामुळे ग्राहकांना सुरक्षित दूध मिळते..स्वच्छ व सुरक्षित मांसकत्तलखान्यांमध्ये प्राण्यांची ‘अँटी-मॉर्टम’ आणि ‘पोस्ट-मॉर्टम’ तपासणी करून केवळ निरोगी मांसच बाजारात येईल याची खात्री पशुवैद्यकीय निरीक्षक करतात.यामुळे अन्नजन्य आजार टाळले जातात..सुरक्षित अंडीकुक्कुटपालनात स्वच्छता, जैवसुरक्षा उपाय, योग्य लसीकरण व अंडी हाताळणीबाबत पशुवैद्यकांचे मार्गदर्शन यामुळे अंडी सुरक्षित आणि पौष्टिक राहतात..अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर)आज जगासमोर ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’ हे मोठे संकट आहे. जनावरांत अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर केल्यास मानवामध्ये ‘अँटिबायोटिक रेझिस्टन्स’ निर्माण होतो. जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर टाळून, सकस आणि रसायनमुक्त अन्न मानवापर्यंत पोहोचवण्याचे काम पशुवैद्यक करतात..अन्नजन्य आजारमनुष्यात अन्नजन्य आजारामुळे दरवर्षी जगात ४.२ लक्ष मृत्यू होतात. अन्नजन्य आजारांपैकी सुमारे ३० टक्के आजार हे प्राणिजन्य अन्नाशी संबंधित आहेत. त्यामुळे ही आकडेवारी दर्शवते, की पशुवैद्यकांशिवाय अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अशक्य आहे..सर्वांसाठी पुरेसे अन्नअन्नसुरक्षितता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पुरेसे, परवडणारे आणि पोषक अन्न उपलब्ध असणे. पशुवैद्यक उच्च उत्पादक जातींची पैदास करणे, वेळीच रोगनियंत्रण उपाय अवलंबून रोगांमुळे होणारे नुकसान कमी करणे. प्रजनन कार्यक्षमतेत सुधारणांद्वारे ते अन्नसुरक्षितता देखील सुनिश्चित करतात, म्हणजेच सर्वांना पुरेसे आणि पोषक अन्न उपलब्ध राहते..अन्नसाखळीतील सुरक्षाअन्नसुरक्षा आणि अन्नसुरक्षितता ही केवळ उत्पादनापुरती मर्यादित नसून संपूर्ण अन्नसाखळीशी संबंधित आहे. पशुवैद्यक उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, वितरण, उपभोग प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि सुरक्षा सुनिश्चित करतात. त्यामुळे ‘प्रक्षेत्रावरून थेट थाळीपर्यंत’ अन्न सुरक्षित राहते.पशुवैद्यकांच्या योगदानामुळे सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध होते, अन्नजन्य रोग कमी होतात, उत्पादन वाढते, अन्नटंचाई कमी होते आणि समाजाचे आरोग्य सुधारते. थोडक्यात पशुवैद्यक ‘प्रक्षेत्रातून थेट थाळीपर्यंत’ या संपूर्ण अन्नसाखळीचे संरक्षक आहेत..Animal Health: निकृष्ट मुरघासाचा जनावरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम .सार्वजनिक आरोग्याचे संरक्षकप्राणिजन्य किंवा झूनोटिक आजार म्हणजे असे संसर्गजन्य आजार जे प्राण्यांकडून मानवाकडे पसरतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत, वाढत्या शहरीकरणात आणि मानव-प्राणी संपर्कात वाढ झाल्यामुळे अशा आजारांचा धोका अधिक वाढला आहे.मानवामध्ये आढळणाऱ्या संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे ६० टक्के आजार हे प्राणिजन्य असतात. सुमारे ७५ टक्के नवीन उद्भविणारे आजार प्राणिजन्य आहेत. दरवर्षी लाखो लोक प्राणिजन्य आजारामुळे बाधित होतात. यामध्ये रेबीज, ब्रुसेलोसिस, क्षयरोग, तसेच बर्ड फ्लू यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो..प्राणघातक रेबीज हा श्वानाच्या चावण्यामुळे पसरतो. ब्रुसेलोसिस हा दूषित दूध/संपर्कातून पसरतो, बर्ड फ्लू हा कुक्कुटपालनातून मानवात संक्रमण, क्षयरोग हा काही प्रकरणांमध्ये प्राणिजन्य स्रोत. हे आजार केवळ जनावरांत नव्हे, तर मानवांतही जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे या रोगांवर नियंत्रण ठेवणे हे सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. या लढाईत पशुवैद्यक अग्रस्थानी असतात.पशुवैद्यक प्राण्यांमधील आजार ओळखून त्यावर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे आजार मानवांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबतो. प्राण्यांचे नियमित आरोग्य परीक्षण, संशयित आजारांचे लवकर निदान, संक्रमित प्राण्यांचे वेगळे व्यवस्थापन, आजाराची पूर्वसूचना आणि लवकर सूचना, नियमित लसीकरण मोहीम राबवणे,.जनजागृती करणे, सार्वजनिक आरोग्य विभागा सोबत समन्वय ठेवून काम करणे, शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे यामुळे आजाराचा प्रसार प्रारंभीच थांबतो.प्राणीजन्य रोग नियंत्रणासाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. मानवी आरोग्य हे प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याशी अविभाज्यपणे जोडलेले आहे. या तिन्ही घटकांमध्ये संतुलन राखण्यासाठी पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.महामारी किंवा रोगप्रसाराच्या काळात पशुवैद्यक आपत्कालीन उपचार सेवा पुरवतात, रोग नियंत्रण उपाय राबवतात, जैवसुरक्षा सुनिश्चित करतात यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळता येते..शाश्वत अन्नप्रणालीचे समर्थक‘शाश्वत अन्नप्रणाली’ म्हणजे अशी अन्नव्यवस्था जी सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करते, पण भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होऊ देत नाही. या प्रणालीत उत्पादन, प्रक्रिया, वितरण आणि उपभोग या सर्व टप्प्यांमध्ये पर्यावरणीय संतुलन, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखला जातो. या संपूर्ण व्यवस्थेत पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि बहुआयामी आहे.शाश्वत अन्नप्रणाली निर्माण करण्यासाठी पशुवैद्यकांचे योगदान अपरिहार्य आहे. ते पशुधन निरोगी ठेवतात त्यामुळे दूध व मांस उत्पादनात वाढ होते, मृत्यूदर कमी होतो व उत्पादन खर्चात घट होते, अन्नसुरक्षा सुनिश्चित करतात, पर्यावरणाचे संरक्षण करतात, शेतकऱ्यांना सक्षम करतात आणि समाजाला निरोगी ठेवतात..जागतिक आरोग्य सुरक्षाजागतिक आरोग्य सुरक्षा म्हणजे जगभरातील लोकसंख्येला संसर्गजन्य आजार, प्रसार, जैविक धोके आणि अन्नजन्य रोगापासून सुरक्षित ठेवण्याची एकत्रित क्षमता. या संकल्पनेत आजाराचा प्रतिबंध, लवकर शोध आणि प्रभावी प्रतिसाद हे तीन मुख्य स्तंभ मानले जातात. या तिन्ही स्तरांवर पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे.प्राण्यांमधील रोगांचे लवकर निदान, आजार तपासणी प्रणाली मजबूत करणे, विलगीकरण /क्वारंटाईन, जैवसुरक्षा उपाय, अन्नसाखळी सुरक्षित ठेवणे, अँटिमायक्रोबियल प्रतिकार ( एएमआर) नियंत्रण यामुळे स्थानिक आजार जागतिक संकट होण्यापासून रोखले जातात..जागतिक आरोग्य सुरक्षा ही एक व्यापक प्रणाली आहे. यामध्ये पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते आजाराला सुरुवातीलाच थांबवतात, अन्नसाखळी सुरक्षित ठेवतात, महामारी रोखतात आणि मानवजातीचे आरोग्य संरक्षित करतात.- डॉ. अनिल भिकाने ९४२०२१४४५३(माजी संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.