
डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे
जनावरांच्या शरिरावरील गोचीड, गोमाश्या व इतर बाह्य परोपजीवी कीटकांचे नियंत्रण (Parasite Controlling) करणे खूप गरजेचे आहे. या किटकांच्या प्रादुर्भावामुळे दूध उत्पादनात (Milk Production) घट येणे, वासरांची वाढ कमी होणे, जनावरांना हगवण इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.
या कीटकांच्या नियंत्रणासाठी गोचीडनाशकांच्या चुकीच्या किंवा अयोग्य प्रमाणात वापर केल्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा (Animal Poisoning) होते. त्यासाठी गोचीडनाशके वापरताना योग्य काळजी घ्यावी लागते.
जनावरांच्या अंगावर फवारताना घ्यावयाची काळजी ः
- बाह्य परोपजीवीचे नियंत्रण करण्यासाठी गोचीडनाशकांचा वापर केला जातो. सर्व गोचीडनाशके ही अत्यंत विषारी असतात. त्यांचा करण्यापूर्वी त्यासोबत आलेली माहिती पत्रिका पूर्ण वाचून त्याप्रमाणे वापर करावा.
- कोणतेही दोन गोचीडनाशके एकत्र मिसळून वापरू नयेत.
- आजारी जनावरांच्या शरीरावर कोणत्याही गोचीडनाशकांचा वापर करू नये.
- गाभण जनावरे किंवा दुभत्या जनावरांमध्ये शिफारस केलेली गोचीडनाशके वापरावीत.
- जनावरांच्या शरीरावर जखमा असल्यास गोचीडनाशकांचा वापर टाळावा. कारण जखमेतून गोचीडनाशके शरीरात जाऊन जनावरांस विषबाधा होण्याची शक्यता असते.
- गोचीडनाशकांचा वापर केल्यानंतर जनावरांच्या तोंडाला मुंगशे घालावे. जेणेकरून जनावर गोचीडनाशके चाटणार नाही.
- गोचीडनाशकांचा वापर केल्यानंतर जनावराचे शरीर साबणाच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ केल्यानंतर मुंगशे काढावे.
इतर काळजी ः
- पिकांवर कीटकनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप जनावरांच्या शरीरावर फवारणी करण्यासाठी वापरू नयेत.
- पिकांवरील कीटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरू नयेत. जनावरांसाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा.
- गोचीडनाशके कायम उंच ठिकाणी व्यवस्थित ठेवावीत. जेणेकरून ती जनावरे चाटणार नाहीत किंवा लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत.
- गोचीडनाशके वापरल्यानंतर त्याचे रिकामे डब्बे व्यवस्थित खड्ड्यात पुरावेत.
- गोचीडनाशकांच्या वापरामुळे विषबाधा झाल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
वनस्पतींमुळे होणारी विषबाधा ः
माळरान किंवा कुरणांमध्ये चरणाऱ्या जनावरांना विशेषतः पावसाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते. कारण पाऊस पडल्यानंतर विविध झाडाझुडपांची झपाट्याने वाढ होते.
त्यामध्ये बऱ्याच वनस्पती या विषारी असतात. अशा विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही.
मात्र त्यातील विषारी घटकांचा अंश दूध, मांस किंवा अंडी या उत्पादनांत उतरतो. त्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते.
विषारी वनस्पती ः
जनावरांमध्ये वनस्पतींमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विषारी वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य विषबाधा टाळली जाईल.
- गाजर गवत किंवा काँग्रेस गवत
- रूचकी
- घाणेरी
- कण्हेर ः अ) लाल कण्हेर ब) पिवळी कण्हेर
- बेशरम
- धोत्रा
- एरंड
- डॉ. बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१
- डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३
(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग,
क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.