उन्हाळ्यात जनावरांचा माज चुकल्यास ‘हे’ नुकसान !

उन्हाळ्यातील जास्त तापमानामुळे, जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. जनावरे माजावर येण्याचे प्रमाण देखील कमी होते. म्हशींमध्ये मुका माज दाखविण्याचे प्रमाण वाढते.
Heat Symptoms In Buffalo in Summer Season
Heat Symptoms In Buffalo in Summer Season

उन्हाळ्यात आपल्याकडे तापमानात सातत्याने वाढ होताना दिसून येते. या काळात जर आपल्या गोठ्यातील जनावरांची योग्य ती काळजी घेतली नाही, तर त्याचे परिणाम पुढच्या ऋतुत दिसून येतात. उन्हाळ्यात जनावरांचे माजाचे चक्र काहीसं बिघडलेलं दिसून येतं. आपल्याकडे दरवर्षी कितीही धो-धो पाऊस पडला, तरी उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई ठरलेलीच असते. माणसांबरोबर जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात.

आपल्याकडील एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा हा ५० टक्क्याहून अधिक आहे. मुळातच म्हशीमध्ये माजाची ठळक अशी लक्षणे दिसत नाहीत. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये silent heat किंवा मुका माज असं म्हणतो. उन्हाळ्यात तर हे चक्रच बिघडून जाते. उन्हाळ्यात विशेषतः म्हशी माजावर आल्या तरी माज ओळखण्यासाठी पशुपालकांचा कस लागतो. यासाठी पशुपालकांनी नियमित आपल्या गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण केलं पाहिजे. गोठ्यातील विविध गोष्टींच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत.

उन्हाळ्यात म्हशीनी माजाची लक्षणे दाखविली तरी गाभण राहण्याचं प्रमाण मात्र कमी असते. म्हशी रात्री किंवा पहाटे माजावर येत असतात. यासाठी पशुपालकांनी संध्याकाळी किंवा पहाटे जनावरांचे निरीक्षण केलं पाहिजे. माजाच्या इतर लक्षणामध्ये अवेळी पान्हा सुटणे, दुधातील फॅटचे प्रमाण कमी होणे, जनावर बैचेन, अस्वस्थ दिसणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे. यांसारख्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केल्यास जनावरांचा माज न चुकता ओळखणे सोप्पे जाईल. वेळेत पशुवैद्यकामार्फत भरवून घेतल्यास गाभण राहण्याचे प्रमाण देखील वाढेल.


जनावरांचा एक माज ओळखण्यात चुकल्यास सर्वसाधारणपणे २१ दिवस थांबावे लागते. कृत्रिम रेतन केल्यानंतर यशस्वी गर्भधारणा झाल्याची खात्री करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी जावा लागतो. जनावर विण्याचा किंवा दूध न देण्याचा एक महिना वाढल्यास, किंवा एक माज किंवा एक महिना पुढे गेल्यास कमीतकमी ९००० चे नुकसान फक्त व्यवस्थापनावर होऊ शकते. १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायीला दिवसाला ३०० ते ४०० रुपये खर्च येत असतो. प्रती लिटर दुधाचा २५ रुपयाप्रमाणे विचार करता दिवसाला २५० रुपये असे महिन्याला ६००० ते ७००० रुपयांचा तोटा होऊ शकतो. प्रत्येक वेतातील एक एक महिना पकडल्यास त्या गाई-म्हशीपासून मिळणारे एक वासरू जाऊ शकते. एका वासराची किंमत साधारणतः ३०००० असू शकते.

वाढत्या उष्णतेचा जनावरांवरती ताण आल्यानं दूध उत्पादनातही घट दिसून येते. आपल्याकडील वातावरणाचा विचार करता, हिवाळ्यात अतिरिक्त दुधाचे उत्पादन मिळते. याउलट उन्हाळ्यात दुधाचे कमी उत्पादन होते. वाढत्या उष्णतेचा जनावरांवरती होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि दूध उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी उन्हाळ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. हिवाळ्यात अतिरिक्त दुधाचे उत्पादन मिळण्याचे आणखी एक कारण असं की, या दिवसांत जनावरे विण्याच प्रमाण देखील जास्त असते.वाढलेल्या उष्णतेचा जनावरांवरील विपरीत परिणाम कमी करण्यासाठी दैनंदिन गोठ्याचे व्यवस्थापन, आहार नियोजन, आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com