Animal Water Management : जनावरांना पुरेसे शुद्ध पाणी देण्याचे काय आहे महत्त्व?

Milk Production : जनावरांची पाण्याची गरज हवामान, अन्न आणि त्यांच्या उत्पादन स्थितीनुसार बदलू शकते. जनावरे सुका चारा किंवा गव्हाचा पेंढा खातात तेव्हा ते जास्त पाणी पितात. दूध उत्पादन आणि आरोग्याच्या दृष्टीने जनावरांना पुरेसे पाणी देणे महत्त्वाचे आहे.
 Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. तुषार भोसले, डॉ. समीर ढगे

Animal Care Update : जनावरांच्या पोषणासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर भरपूर पाणी लागते. दूध देणाऱ्या जनावरांना जास्त पाणी लागते कारण दुधामध्ये ८४ ते ८८ टक्के पाणी असते.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या लाळेमध्ये टायलीन हे विकर नसते म्हणून अन्न पदार्थांचे पचन हे कोटी पोटामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीने किण्वन प्रक्रियेने केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाळेचा स्राव होणे गरजेचे आहे. अन्नपदार्थांचे किण्वन, पचन आणि शोषण सुरळीत होण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे.

पाण्याचे महत्त्व

१) अन्न पचण्यासाठी, टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन होण्यास मदत.

२) शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात महत्त्वाचे.

३) उष्णतेच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण.

४) ॲसिडिटीची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत.

 Animal Care
Animal Care : उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम

जनावरांची पाण्याची गरज :

१) जनावरांच्या कोटी पोटामध्ये अन्नपदार्थ पचन प्रक्रियेदरम्यान तीन मुख्य अस्थिर फॅटी ॲसिड्‍स तयार होतात. यामध्ये ॲसिटिक ॲसिड (६५ ते ७० टक्के), प्रोपिऑनिक ॲसिड (१५ ते २० टक्के) आणि ब्युटिरिक ॲसिड (७ ते १० टक्के) असे प्रमाण असते. यातील ॲसिटिक ॲसिड आणि ब्युटिरिक ॲसिड हे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धाम्लांचे प्रमाण ठरवते.

प्रोपिऑनिक ॲसिड हे प्रथिनांचे प्रमाण ठरवते. जर जनावराने प्रमाणापेक्षा जास्त खाद्य/खुराक सेवन केले तर तर त्याच्या कोटी पोटातील सामू बिघडू शकतो. त्यामुळे वरील तीन अस्थिर फॅटी ॲसिडचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे दूध उत्पादन तसेच त्यातील घटकांचे प्रमाण कमी अधिक होते.

२) जनावरांची पाण्याची गरज हवामान, अन्न आणि त्यांच्या उत्पादन स्थितीनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात जास्त पाणी लागते. उष्णतेची तीव्रता आणि त्यांच्या आहारामध्ये पाण्याचे कमी प्रमाण हे कारण आहे. जनावरे सुका चारा किंवा गव्हाचा पेंढा खातात तेव्हा ते जास्त पाणी पितात आणि मऊ बरसीम खातात तेव्हा ते कमी पाणी पितात.

३) जेव्हा जनावरांना खाद्य दिले जाते तेव्हा त्यांना अधिक पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा जनावरे सायलेज किंवा वाळलेले गवत खातात तेव्हा ते जास्त पाणी पितात. वासरांना हवामानानुसार कमी-अधिक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. खुराक/ खाद्य दिलेली वासरे जास्त खातात आणि अधिक पाणी पितात, ज्यामुळे त्यांची वाढ वाढते.

४) दुभत्या जनावरांना पाणी अनेक वेळा द्यावे किंवा दूध उत्पादन प्रक्रियेमुळे होणाऱ्या पाण्याच्या उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी ते त्यांना पुरवावे. एक किलो खाद्य पचवण्यासाठी २ ते ४ लिटर पाणी लागते. दुभत्या जनावरांना कायम पाणी मुबलक असावे.

पाण्याच्या कमतरतेचे परिणाम:

१) आहाराचे प्रमाण कमी, दूध उत्पादनात घट.

२) बद्धकोष्ठता, अशक्तपणा.

३) लघवीत युरियाचे प्रमाण वाढते.अपूर्ण पचन.

पाण्याची परिणामकारकता :

१) एका दुभत्या प्रौढ म्हशीला ६० ते ६५ लिटर पाणी प्रति दिवस आणि दुभत्या प्रौढ गाईला ४० ते ४५ लिटर पाणी प्रति दिवस फक्त पिण्यासाठी आवश्यक असते. दुभत्या जनावरांना एक लिटर दूध देण्यासाठी ३ ते ५ लिटर पाणी लागते.

२) ताप किंवा अतिसार होत असल्यास किंवा हवामान खूप गरम असल्यास त्यांना अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.

पाण्याची गुणवत्ता आणि होणारे परिणाम :

१) पाणी चवीला चांगले असेल आणि आरामदायक तापमान असेल म्हणजे, खूप गरम किंवा थंड नसेल तर जनावरे अधिक प्रमाणात पाणी पितात. एका अनुमानानुसार, जेव्हा पाण्याचे तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे असते तेव्हा ते अधिक पाणी पितात.

२) अशुद्ध पाण्यामुळे जंत होतात. जंतामुळे जनावरे त्यांचे खाद्य नीट पचवू शकत नाहीत. त्यांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

३) पाणवठे नेहमी स्वच्छ असावेत. त्यांना आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास त्यांचे खाद्य पूर्णपणे पचत नाही. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते.

४) जनावरांसाठी पाणी सतत उपलब्ध असावे. पाणवठे रोज स्वच्छ करावेत.

 Animal Care
Bird Animal Count : ‘माळढोक’च्या अस्तित्वावर अखेर शिक्कामोर्तब

५) महिन्यातून एकदा चुनखडीने गोठ्याला रंगवावे.

६) जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना उन्हाळ्यात दिवसातून ५ वेळा आणि हिवाळ्यात दिवसातून किमान ३ वेळा पाणी द्यावे.

७) जनावरांना दूध दिल्यानंतर पाणी द्यावे. जनावरांना त्यांच्या दैनंदिन वापरापैकी एक तृतीयांश पाणी दूध पिल्यानंतर आवश्यक असते.

८) आहार कितीही पोषण समृद्ध असला, तरी जनावरांना भरपूर पाणी न दिल्यास खाद्य प्रभावी ठरू शकत नाही.

कमी पाणी वापरावर लक्ष ठेवण्यासाठी आठदिवसीय प्रयोग :

पाण्याच्या वापरात घट---दुसऱ्या दिवशी आहारात घट---८ दिवसांनंतर आहारात घट---दुसऱ्या दिवशी दूध उत्पादन---८ दिवसांनंतर दूध उत्पादन

२५%---११%---२१%---११% कमी---२५% कमी

संपर्क - डॉ. तुषार भोसले, ८००७६५६३२४, (सहायक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जळगाव)

डॉ. समीर ढगे, ९४२३८६३५९६, (सहायक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कराड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com