
Animal Poisonings उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागामध्ये चराऊ शेळ्या-मेंढ्यांना हिरवा चारा (Green Fodder) व गवत यांची कमतरता असते. त्यामुळे कुरण किंवा चराऊ क्षेत्रामध्ये वाळलेले गवत आणि ज्या काही हिरव्या वनस्पती (Green Plant) असतात त्यांच्यावर शेळ्या, मेंढ्या चरतात.
कुरणातील काही वनस्पतींमध्ये विषारी घटक असतात. शेळ्या-मेंढ्यांद्वारे (Goat Poisoning) नकळतपणे या वनस्पती खाल्या गेल्याने त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते.
दुष्काळ किंवा कडक उन्हाळ्याच्या दिवसांत फक्त अशाच वनस्पती चराऊ क्षेत्रात हिरव्यागार राहत असल्याने शेळ्या मेंढ्या त्यांना आकर्षित होऊन विषबाधा होऊ शकते.
महाराष्ट्रात हिवर वनस्पती चराऊ कुरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हिवर वनस्पतीची पाने आणि शेंगा या प्रामुख्याने सेवन केल्या जातात.
यामध्ये विषारी घटक असतात. या वनस्पतीमधील हायड्रोसायनिक ॲसिड व नत्रयुक्त घटक यांच्यामुळे विषबाधा होते.
पोटात गेलेली पाने व शेंगा यांचे तत्काळ विघटन होऊन हायड्रोसायनिक ॲसिड व नत्रयुक्त घटक बाहेर सोडले जातात, जे रक्तामध्ये शिरल्यानंतर शरीरातील पेशींमधील श्वसनप्रक्रिया बाधित करतात.
विषबाधेची लक्षणे
शेळ्या-मेंढ्यांच्या खाण्यामध्ये हिवर वनस्पती जास्त प्रमाणात आल्यास अधिक तीव्र लक्षणे दिसतात. वनस्पती खाल्ल्यानंतर काही जनावरांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर २ तासांच्या आत मृत पावतात. काहींमध्ये विषबाधेची विविध टप्प्यांतील लक्षणे दिसतात.
बाधित जनावरांत अस्वस्थपणा व पोट दुखीची लक्षणे दिसून येतात. तोंडातून फेसयुक्त लाळ गळते.
डोळ्याच्या शेल्श्मल पटलांचा रंग गडद लाल होतो.
श्वासोच्छ्वासादरम्यान बदमासारखा वास येणे. श्वास घेण्यास त्रास होतो.नाडीचे ठोके कमकुवत पण वेगवान होतात.
बाधित जनावरे थरथर कापतात. काही वेळाने आडवी पडून ओरडतात. जनावरे जमिनीवर पडल्यानंतर झटके येतात.
शेवटच्या टप्प्यात डोळे निळसर पडून बाधित जनावर दगावते.
निदान
बाधित जनावर किंवा मृत जनावराच्या ओटी पोटातील द्रावणाची प्रयोगशाळेत तपासणी (पिक्रेट पेपर चाचणी)
लक्षणे
पोटफुगी, गडद लाल रंगाची शेल्श्मल त्वचा
मृत जनावराचे शव-विच्छेदन करूनही विषबाधेचे निदान करता येते.
उपचार
विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास पशुवैद्यकाकडून तत्काळ उपचार करून घेतल्यास बाधित जनावरांना वाचविता येते.
विषबाधेची तीव्रता जास्त असल्याने आणि बाधित कालावधी अत्यंत कमी असल्याने उपचाराला मर्यादा येतात, म्हणून हिवर वनस्पती विषबाधा टाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना
हिरवा चारा जेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो तेव्हा त्याच्यावर प्रक्रिया (मुरघास) केल्यानंतर साठवणूक करून असा प्रक्रिया केलेला चारा उन्हाळ्यात टंचाईच्या काळात वापरण्यात यावा.
पशुपालकाला चराऊ कुरणामध्ये असलेल्या विविध गवत, वनस्पतींमध्ये विषारी वनस्पतींचे ज्ञान असावे.
ज्या चराऊ क्षेत्रात विषारी वनस्पती जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी जनावरांना चरायला घेऊन जाणे शक्यतो टाळावे. अनवधानाने जनावरे चरावयास गेल्यास, ती अशा विषारी वनस्पती खाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा चाऱ्याची टंचाई असते तेव्हा शेळ्या, मेंढ्यांना अर्धबंदिस्त पद्धतीने थोडा वेळ चरावयास सोडाव्यात. तर उरलेला वेळ गोठ्यामध्ये खाद्य व पाण्याचे व्यवस्थापन करावे.
टंचाई परिस्थितीत शेळ्या मेंढ्यांना युरिया व मळीची प्रक्रिया केलेला चारा किंवा बिना प्रक्रिया केलेला वाळलेला चारा (गहू, सोयाबीन किंवा भाताचा भुसा, भुईमुगाचे वेल, कडबा) उपलब्ध करून दिल्यास चरावयास जाण्याचे टाळता येईल.
दुष्काळाच्या काळात टंचाईच्या चाऱ्याचा वापर करावा, उदा. उसाचा पाला, बगॅस, केळीची पाने, फुले, खोड, पपई पाने, गहू, सोयाबीन किंवा भाताचा भुसा, निवडुंग, सुबाभूळ, आंबा, चिंचेची पाने, फुले, शेंगा इ.
पशुपालकांचे विषारी वनस्पतीबद्दलचे ज्ञान, टंचाई काळामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत शेळ्या-मेंढ्यांच्या खाद्यासाठीची पर्यायी व्यवस्था केल्यास व जनावरे चरावयास न सोडल्यास किंवा कमी वेळासाठी देखरेखीखाली चरावयास सोडावीत. दक्षता घेतल्यास शेळ्या-मेंढ्यांमध्ये आढळून येणारी हिवर व इतर तत्सम विषारी वनस्पतींची विषबाधा टाळता येईल.
- डॉ. रवींद्र जाधव,
९४०४२७३७४३
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.