Animals Care : जनावरांमध्ये गोचीडनाशकामुळे होणारी विषबाधा

माळरानावर चरणाऱ्या जनावरांनी विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. विषबाधेमुळे जनावर दगावण्याची शक्यता अधिक असते. योग्य काळजी घेतल्यास विषबाधा टाळली जाऊन संभाव्य नुकसान कमी होईल.
Animals Gochid
Animals GochidAgrowom

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे

जनावरांमध्ये बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी गोचीडनाशकांचा वापर केला जातो. गोचीडनाशके (Gochidnashke) वापरल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.

तसेच कुरणांमध्ये किंवा माळरानावर चरणाऱ्या जनावरांनी विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. विषबाधेमुळे जनावर दगावण्याची शक्यता अधिक असते. योग्य काळजी घेतल्यास विषबाधा टाळली जाऊन संभाव्य नुकसान कमी होईल.

गोचीडनाशकांची विषबाधा ः

१) पशुधन व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या शरिरावरील गोचीड, गोमाश्‍या व इतर बाह्य परोपजीवी कीटकांचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे.

२) बाह्य परोपजीवींमुळे दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन कमी होणे, वासरांची वाढ कमी होणे, जनावरांना हगवण इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.

३) काही परोपजीवी कीटक हे विविध रोगांच्या प्रसारही कारणीभूत ठरतात. लम्पी स्कीन आजार, गोचीड ताप इ. सारख्या रोगांमुळे जनावर दगावण्याची शक्यता अधिक असते.

४) या कीटकांच्या नियंत्रणासाठी गोचीडनाशकांच्या चुकीच्या किंवा अयोग्य प्रमाणात वापर केल्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते. वेळेत उपचार न मिळाल्यास जनावर दगावते.

५) शेतामध्ये विविध तणनाशके आणि गोठ्यामध्ये मुषकनाशकांचा वापर केला जातो. तणनाशकांची फवारणी केलेले तण किंवा गोठ्यामध्ये वापरलेले मूषकनाशके जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना विषबाधा होण्याची धोका अधिक असतो.

ओर्गानोक्लोरीन व पायरेथ्रोइड्‍स यांची विषबाधा झाल्यास जनावरांच्या शारीरिक हालचालींमध्ये बदल होतो. जसे की,

१) जनावरे रागीट बनतात.

२) जनावरे न दिसणाऱ्या वस्तूवर उड्या मारतात.

३) जनावरे भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात.

४) जनावरे वेड्यासारखी वागतात.

५) जनावरांना हात लावला तरी ती दचकल्यासारखी करतात.

Animals Gochid
Animal market : जनावरांच्या बाजाराशी जोडलं गेलेलं जिव्हाळ्याचं नातं संपलंय?

६) जनावरांना ताप येतो. थरथर कापतात.

७) काही जनवारांच्या तोंडातून लाळ गळते, डोळे मोठे होतात.

८) ओर्गानोफोस्फेट व कार्बामेट्स यांच्या विषबाधेमुळे दिसणारी लक्षणे ः

९) जनावरांच्या तोंडाला फेस येतो.

१०) डोळ्यातून सतत पाणी येते.

११) जनावरांना घाम येतो, हगवण लागते.

१२) डोळे लहान होतात.

१३) जनावरांना श्‍वास घेण्यास अडचण येते.

जनावरांच्या अंगावर फवारताना घ्यावयाची काळजी

१) बाह्य परोपजीवीचे नियंत्रण करण्यासाठी गोचीडनाशकांचा वापर केला जातो. सर्व गोचीडनाशके ही अत्यंत विषारी असतात. त्यांचा करण्यापूर्वी त्यासोबत आलेली माहिती पत्रिका पूर्ण वाचून त्याप्रमाणे वापर करावा.

२) कोणतेही दोन गोचीडनाशके एकत्र मिसळून वापरू नयेत.

३) आजारी जनावरांच्या शरीरावर कोणत्याही गोचीडनाशकांचा वापर करू नये.

४) गाभण जनावरे किंवा दुभत्या जनावरांमध्ये शिफारस केलेली गोचीडनाशके वापरावीत.

५) जनावरांच्या शरीरावर जखमा असल्यास गोचीडनाशकांचा वापर टाळावा. कारण जखमेतून गोचीडनाशके शरीरात जाऊन जनावरांस विषबाधा होण्याची शक्यता असते.

६) गोचीडनाशकांचा वापर केल्यानंतर जनावरांच्या तोंडाला मुंगशे घालावे. जेणेकरून जनावर गोचीडनाशके चाटणार नाही.

७) गोचीडनाशकांचा वापर केल्यानंतर जनावराचे शरीर साबणाच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ केल्यानंतर मुंगशे काढावे.

Animals Gochid
Animal Care In Winter : थंडीच्या काळात जनावरे, कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

इतर काळजी ः

१) पिकांवर कीटकनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप जनावरांच्या शरीरावर फवारणी करण्यासाठी वापरू नयेत.

२) पिकांवरील कीटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरू नयेत. जनावरांसाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा.

३) गोचीडनाशके कायम उंच ठिकाणी व्यवस्थित ठेवावीत. जेणेकरून ती जनावरे चाटणार नाहीत किंवा लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत.

४) गोचीडनाशके वापरल्यानंतर त्याचे रिकामे डब्बे व्यवस्थित खड्ड्यात पुरावेत.

५) गोचीडनाशकांच्या वापरामुळे विषबाधा झाल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

वनस्पतींमुळे होणारी विषबाधा ः

माळरान किंवा कुरणांमध्ये चरणाऱ्या जनावरांना विशेषतः पावसाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते. कारण पाऊस पडल्यानंतर विविध झाडाझुडपांची झपाट्याने वाढ होते.

त्यामध्ये बऱ्याच वनस्पती या विषारी असतात. अशा विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.

काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. मात्र त्यातील विषारी घटकांचा अंश दूध, मांस किंवा अंडी या उत्पादनांत उतरतो. त्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते.

विषारी वनस्पती ः

जनावरांमध्ये वनस्पतींमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विषारी वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य विषबाधा टाळली जाईल.

१) गाजर गवत किंवा काँग्रेस गवत

२) रूचकी

३) घाणेरी

Animals Gochid
Cow Dung Tractor : गाईच्या शेणावरही चालेल ट्रॅक्टर

४) कण्हेर ः अ) लाल कण्हेर ब) पिवळी कण्हेर

५) बेशरम

६) धोत्रा

७) एरंड

डॉ. बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१

डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com