Lumpy Skin : एक पाऊल‘लम्पी’मुक्त महाराष्ट्रासाठी

‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ या अभियानांतर्गत दोन आघाड्यांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. एक पशुवैद्यकीय सेवा, उपचार व दुसऱ्या बाजूला प्रसिद्धी प्रचार अभियान, या दोन्ही माध्यमांतून ‘लम्पी स्कीन’मुक्त (Lumpy Skin Free Maharashtra) महाराष्ट्र करण्यासाठी निर्धार केला आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी सन २०००-२००१ पासून गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (Sant Gadgebaba Gram Swachhata Abhiyan) राज्यात राबवण्यात आले. जनजागृतीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील (R.R. Patil) हे आग्रही राहिले. सर्व यंत्रणा कामाला लावली आणि मग लोकांचा पुढाकार वाढला. त्याचे दृश्य परिणाम दिसायला लागले.

Lumpy Skin
Lumpy Skin Vaccine : ‘लम्पी स्कीन’च्या लसीचे तंत्रज्ञान आज महाराष्ट्राला मिळणार

त्यासाठी लोकांचा पुढाकार आणि त्यामध्ये शासनाचा सहभाग असा नवीन विचार रुजू झाला व लोकसहभागातून पुढे अशा अनेक सार्वजनिक योजना सुरू झाल्या. घर-परिसर स्वच्छता त्यातून मानवी आरोग्य सुधारणे, स्वच्छतेमुळे रोगराई पसरण्यावर अंकुश व आजारावरचे नियंत्रण तसेच मानवाची जीवनशैली सुधारण्यास मदत होणारी अशी ही योजना.

स्वच्छता ठेवणे हे खरं तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्याची जबाबदारी आहे. हे जेव्हा माध्यमातून पटवलं गेलं तेव्हा त्याचे रूपांतर चळवळीत झाले. त्याच धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ अभियानाला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात, किंबहुना देशात लम्पी स्कीन आदाराचे थैमान सुरू होते. आजही काही प्रमाणात आहे. या आजाराविरुद्ध लढत असताना पशुसंवर्धन विभागाच्या अनेक मर्यादा स्पष्ट झाल्या. अशा प्रकारच्या साथीच्या रोगाचा मुकाबला करताना अनेक बाबींचा अनुभव पशुसंवर्धन विभागाने पर्यायाने सर्व पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी घेतला. तसा हा रोग राज्यासाठी नवीन होता.

यापूर्वी सन २०२०-२१ मध्ये तुरळक ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण, उपचार यांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवले. परिणामी, २०२०-२१ मध्ये राज्यात फक्त १८ जनावरांचा मृत्यू झाला होता. २०२१-२२ मध्ये एकही पशुधन मृत्युमुखी पडले नव्हते ही वस्तुस्थिती आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा पुन्हा नको विळखा

सन २०२२-२३ मध्ये लम्पी स्कीन आजार नियंत्रण कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाने एक दिलाने काम केले. विभागाने देखील तांत्रिक बाबतीत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या साह्याने समिती स्थापन करून वेळोवेळी मार्गदर्शन केले. औषध साठा, पुरवठा त्याबाबतीत देखील वेळोवेळी आर्थिक तरतूद, लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील अनेक तज्ज्ञ पशुवैद्यकांनी प्रयोग करून, उपचार संहिता तयार केली. त्याबाबत दृकश्राव्य माध्यमातून चर्चा करून अनेक बाधित पशुधनांचा जीव वाचवला ही वस्तुस्थिती आहे. अनेक पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे रात्रंदिवस राबत असताना अनेक अपघातांना देखील सामोरे गेले. जुलै २०२२ पासून सुरू झालेला हा साथीचा रोग ऐन पावसाळ्यात वाढत गेला.

त्या वेळी लसीकरण व उपचार करताना विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी प्रचंड त्रास सहन केला. त्याला पशुपालकांनीही साथ दिली. तरी देखील दिनांक २४ डिसेंबर २०२२ अखेर राज्यात चार लाख १० हजार ०३६ इतके पशुधन बाधित झाले आहे. २९४१९ इतके पशुधन मृत्युमुखी पडले आहे.

त्यामुळे या सर्व उपचारांती पशुवैद्यकांच्या या आजारात गोठ्याची स्वच्छता त्या माध्यमातून कीटकांचे नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याबाबत एकमत झाले. त्यासाठी पशुपालकाचा सहभाग, उपचारांती सेवा शुश्रूषा देखील महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले.

त्यानंतर वारंवार होणाऱ्या वेबिनार, चर्चासत्रे या माध्यमांतून ‘माझा गोठा-स्वच्छ गोठा’ अशा प्रकारचे अभियान जर राबविले, तर निश्‍चितपणे प्रशासनावरील ताण कमी होईल, औषधाचा वापर कमी करावा लागेल, औषधावर होणारा खर्च कमी करता येईल, रोगाचा प्रसार रोखता येईल, मृत्युदरदेखील कमी करण्यात यश येईल यावर एकमत झाले. त्यासाठी लोकांचा, पशुपालकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे हे निश्‍चित केले.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ४१९ जनावरांचा मृत्यू

‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ या अभियानांतर्गत दोन आघाड्यांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. एक पशुवैद्यकीय सेवा, उपचार व दुसऱ्या बाजूला प्रसिद्धी प्रचार अभियान, या दोन्ही माध्यमांतून लम्पी स्कीनमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी निर्धार केला आहे.

पशुवैद्यकीय सेवा व उपचार अंतर्गत यापूर्वीच लसीकरण, सेवाभावी वृत्तीने मोफत उपचार, गंभीर आजार ग्रस्त पशुधनाच्या उपचारासाठी स्थानिक पातळीवर तज्ञ पशुवैद्यकांच्या गटामार्फत उपचार इत्यादी प्रयत्न केले आहेत आणि आताही सुरू आहेत.

दुसऱ्या बाजूने प्रसिद्धी प्रचार अभियानांतर्गत ( IEC - Interaction Education and Communication) प्रत्यक्ष पशुपालकांची संपर्क साधून त्यांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

त्याची सुरुवातही झाली आहे. त्यासाठी या रोगास कारणीभूत असणारे कीटक, गोचीड, गोमाश्या, डास, चिलटे यांचे नियंत्रण व बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत, सेवा सोसायट्या, दूध सोसायट्या यांचा सहभाग नोंदवणे त्याचबरोबर पशुपालक व सामान्य जनता यांचे शंका-समाधान, समज-गैरसमज दूर करणे, उपचारांती करावयाची सेवा शुश्रूषा सोबत बाधित जनावरे पुन्हा उपचारात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवणे, याचा समावेश करण्यात आला आहे.

त्यासाठी समाजातील प्रथितयश नागरिक, लोकप्रतिनिधी, गावातील प्रभावशाली मंडळी यांचा सहभाग नोंदवला जाणार आहे. यातील कीटक नियंत्रण हे एकाच वेळी सामुदायिकपणे करणे आवश्यक आहे. तरच त्याचा योग्य परिणाम दिसणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीसह तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, सोसायट्या यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

मुळातच साथीच्या आजारात शासनाच्या इतर विभागांचा महत्त्वाचा सहभाग अपेक्षित असताना तो कितपत मिळाला असावा याबाबत शंका आहेत. माध्यमातून देखील प्रसिद्धी प्रचार होणे आवश्यक होते. जाहिरातीच्या रूपाने एखाद्या ब्रँड अँबिसिडरची नेमणूक करून त्याद्वारे जर आव्हान करता आले असते, तर अजून चांगल्या प्रकारे प्रभावशाली ठरले असते.

छोट्या छोट्या चित्रफितींच्या माध्यमातून या आजाराची दाहकता आपल्याला समाजासमोर आणता आली असती. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद देखील तितकीच महत्त्वाची आहे. ग्रामसभा स्वच्छता अभियानाप्रमाणे लोकसहभाग वाढवण्यासाठी इतर विभागांनी पुढाकार घेतला असता, तर निश्‍चितपणे या आजारावर नियंत्रण लवकर मिळवता आले असते.

विभागातील अधिकारी, कर्मचारी याबाबतीत आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहेतच, पण कोणत्याही साथीच्या रोगात लोकांचे प्रबोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीसह पुढाकार घेतला तर लम्पी स्कीन आजार नियंत्रण, लम्पीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मदत होईल.

(लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com