डॉ. अनिल भिकाने, डॉ. रवींद्र जाधव
Rabies Control Management : समाजामध्ये रेबीजबाबत प्रचलित गैरसमज दूर करून, लोकांची धारणा बदलून रेबीजप्रती लोकांमध्ये व्यापक जागरूकता करणे गरजेचे आहे. २०३० पर्यंत रेबीज आजाराचे निर्मूलन करण्यासाठी एफएओ, ओआयई आणि डब्ल्यूएचओ या जागतिक संघटनांनी एकत्रितपणे जागृती वाढवण्यावर भर दिला आहे. आपल्या देशात आरोग्य विभागाने राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २८ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत वर्षभर रेबीज जनजागरण मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे.
रेबीज (अलर्क) हा १०० टक्के जीवघेणा आजार असून यावर उपचार उपलब्ध नाही परंतु हा आजार १०० टक्के टाळता येतो. हा जीवघेणा आजार जगामधील सर्व खंडामध्ये आढळून येतो. मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, स्पेन, जपान इत्यादी देशांमधून या आजाराचे निर्मूलन झालेले आहे.
एकूण रेबीज मरतुकीमध्ये ९५ टक्के मृत्यू फक्त आशिया व आफ्रिका खंडामध्ये होतात. भारतात या आजाराने ३६ टक्के मृत्यू होतो. श्वानदंश होण्याचे प्रमाण १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त म्हणजे ४० टक्के आहे.
रेबीज आजार होण्याची कारणे :
‘रॅबडो व्हायरस’ या विषाणूमुळे रेबीज आजार होतो. विषाणूंना चेतापेशीचे व लाळग्रंथीचे आकर्षण असते.
विषाणू तुलनेने नाजूक आणि आयोडीन, एसीटोन, साबण, डिटर्जंट, इथर, फॉर्मेलिन, फिनॉल इत्यादी जंतुनाशकांसाठी संवेदनशील आहे.
सुकलेल्या लाळेतील विषाणू काही तासांत मरतात. विषाणू ५० अंश सेल्सियसमध्ये १ तासात आणि ६० अंश सेल्सिअस तापमानात ५ मिनिटात नष्ट होतात. विषाणू शरीराबाहेर जास्त काळ टिकत नाही.
विषाणू ३-११ दरम्यान पीएच (सामू) वर स्थिर राहतात. विषाणू थंड प्रतिरोधक असतो. -७० अंश सेल्सिअस तापमानात अनेक वर्षे टिकतो, ०-४ अंश सेल्सिअसवर गोठतो.
रेबीज आजार कोणाला होतो?
गरम रक्त असणाऱ्या मानवासह सर्व प्राण्यांमध्ये होतो. श्वान (कुत्रा), कोल्हे अधिक संवेदनक्षम आहे.
गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या या मध्यम संवेदनाक्षम आहेत.
लांडगे, मांजर, सिंह, मुंगूस, वटवाघूळ, माकड इत्यादी प्राण्यांनाही होतो.
आजाराचे प्रमाण मादीपेक्षा नर श्वानांत अधिक आहे. आजार मादीत प्रामुख्याने माजावर येणाच्या कालावधीत अधिक प्रमाणात होतो.
संक्रमण स्रोत :
वन्यजीव किंवा सिल्व्याटिक रेबीज हा जंगली प्राण्यांमध्ये आढळून येणारा आजार आहे. यामध्ये कोल्हे, लांडगे, वटवाघूळ, मुंगूस, गिलहरी इत्यादी प्राणी विषाणूंचे संक्रमण करण्यास कारणीभूत ठरतात. वन्यजीव आपापसांत तसेच श्वान व मनुष्यामध्ये रेबीज संक्रमणासाठी कारणीभूत ठरतात.
रेबीज आजाराने संक्रमित श्वान आणि किरकोळ प्रमाणात मांजर, पाळीव प्राणी, मानवामध्ये आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरतात.
लॅटिन अमेरिकेत वटवाघूळ हे रेबीज विषाणूचे साठवणूक केंद्र आणि वाहक म्हणून काम करतात. मनुष्य आणि प्राण्यांना संक्रमणास कारणीभूत ठरतात. भारतात वटवाघुळ प्रसार करत नाही.
प्राणी, मानवामध्ये प्रादुर्भाव
आजाराचा प्रादुर्भाव मुख्यत्वे: बाधित प्राण्यांच्या चावा आणि ताज्या लाळेच्या संपर्कात त्वचेच्या जखमा / आलेल्या श्लेष्मा आवरण दूषित झाल्याने होतो.
प्रसार प्रामुख्याने भटक्या किंवा मोकाट श्वानांद्वारे होतो. रोग बाधित श्वान, मांजर, पाळीव प्राणी, (गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे) जंगली जनावरे (कोल्हा, लांडगा इ.), वटवाघुळ रोग प्रसारास कारणीभूत ठरतात.
सर्वसामान्यपणे ९९ टक्के मानवी रेबीज बाधित श्वानांच्या चाव्यातून होतो.
श्वानदंशानंतरची लक्षणे
रेबीज बाधित श्वान / मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणतः २० ते ३० दिवसांत आजाराची लक्षणे दिसतात, परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
श्वानाने चावल्यापासून आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी जनावरांच्या कोणत्या भागास श्वानाने चावा घेतला आहे यावर अवलंबून असतो उदा. डोक्याच्याजवळ चावा घेतला असेल तर लक्षणे लवकर दिसतात. याउलट जर पायाकडील भागात चावा घेतला असेल तर लक्षणे उशिरा दिसतात.
श्वानाने किती ठिकाणी चावा घेतला यावरही लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसणे अवलंबून असते. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन, तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरांत लक्षणे लवकर दिसून येतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय करावे ?
श्वानांचे नोंदणीकरण करावे.
मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम’ राबवावा.
मोकाट श्वानांसाठी लसीकरण मोहीम राबवावी.
रेबीजने मृत्यू पावलेल्या प्राण्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
श्वानदंश प्रतिबंधक लस :
श्वान दंश झाल्यानंतर तत्काळ श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी.
कोणत्याही एका लसीचे इंजेक्शन श्वानदंश झालेल्या दिवसापासून ०, ३, ७, १४ व २८ व्या दिवशी घ्यावे.
श्वानदंश झाल्यानंतर लगेच या लसीचा कोर्स सुरू करता आला नाही, तर लस उपलब्ध झाल्यावर तत्काळ सुरू करावा. या लसीचे इंजेक्शन वेळापत्रकाप्रमाणे घ्यावे. पण काही अपरिहार्य कारणाने वेळापत्रकाप्रमाणे एखादे इंजेक्शन देता आले नाही, उदा. तिसऱ्या दिवशी द्यावयाचे इंजेक्शन त्याच दिवशी देता आले नाही, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी द्यावे. बाकी इंजेक्शन वेळापत्रकाप्रमाणे देऊन घ्यावीत.
श्वानदंश झाल्यानंतर लसीकरण :
पिसाळलेला किंवा अनोळखी किंवा भटका पाळीव श्वान चावल्यास.
जखमेवर किंवा श्लेषमल आवरण किंवा डोळ्यास पिसाळलेल्या श्वानाच्या लाळेचा संपर्क झाल्यास.
रोगप्रतिबंधक लस दिलेल्या श्वानास जर पिसाळलेला श्वान चावला तरी सुद्धा लसीचा पूर्ण कोर्स देणे उत्तम; कारण क्वचित प्रसंगी लसीकरण करतेसमयी श्वान आजारी / अशक्त असेल, लस योग्य त्या तापमानास साठवलेली नसेल, तर त्या श्वानात प्रतिकारकशक्ती निर्माण होत नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा पूर्ण कोर्स करावा.
रोगप्रतिबंधक लस न दिलेल्या, परंतु सर्वसामान्य दिसणारा एखादा श्वान चावला तरी सुद्धा लसीकरण करावे. कारण वरवर सर्वसामान्य दिसणाऱ्या एखाद्या श्वानाच्या लाळेत रेबीजचे विषाणू असू शकतात.
श्वानांना रेबीज होऊ नये म्हणून काळजी :
नियमित लसीकरण हाच रेबीज रोग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय आहे.
श्वानांना वयाचे ३ महिने झाल्यावर रेबीज प्रतिबंधक लसीची त्वचेखाली पहिली मात्रा द्यावी. त्यानंतर नियमितपणे दरवर्षी लस टोचून घ्यावी.
रोगप्रवण भागात ७० टक्के श्वानांचे लसीकरण केले तर आजाराचे चक्र थांबवता येते.
रेबीज प्रतिबंधक लस कोणत्या व्यक्तींनी घ्यावी?
उच्च जोखमीच्या व्यावसायिक गटातील व्यक्ती, जसे की पशुवैद्यक आणि प्राणी हाताळणारे त्यांचे कर्मचारी, रेबीज संशोधक आणि काही प्रयोगशाळा कामगार मांजरी, श्वान इत्यादींच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती.
आंतरराष्ट्रीय प्रवासी यांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी. प्रथम वेळी ०, ७ व २१/२८ व्या दिवशी अशा तीन मात्रा घ्याव्यात. त्यानंतर दरवर्षी बूस्टर डोस घ्यावा.
रेबीज आजाराचे निदान :
जनावरास श्वानदंश झाल्याची व चावा घेणारा श्वान साधारणतः ४ ते १० दिवसांत मृत्यू पावल्याची माहिती या आजाराचे निदान करण्यास साह्यभूत ठरते.
खूप लाळ गळणे, वेडेपणा येणे, चावा घेणे, पांगळेपणा येणे यांसारखी लक्षणे या रोगाचे निदान करण्यास पुरेशी आहेत.
या आजाराने जनावर मृत्यू पावल्यास त्याच्या मेंदूची प्रयोगशाळेत तपासणी करून पक्के निदान करता येते.
मनुष्यातील श्वानदंश कसा टाळावा?
सावध राहावे, आणि भटक्या श्वानाशी जबाबदारीने वागा.
रेबीज झालेल्या श्वानाला कसे ओळखावे ते शिकावे.
श्वानांच्या शरीराची भाषा जाणून घ्या, पळू नका, किंचाळू नका किंवा श्वानांवर काहीही फेकू नका.
झोपलेल्या, खाणाऱ्या किंवा पिलांची काळजी घेणाऱ्या श्वानास त्रास देऊ नका.
गुरगुरणारा श्वान जवळ आल्यावर तुम्ही पळून जाऊ नका. त्याऐवजी स्थिर उभे राहा. आपले हात खाली ठेवा, हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवावा. जमिनीकडे पाहा, श्वानाशी थेट नजर टाळावी.
श्वानांतील रेबीज आजाराची प्रमुख लक्षणे :
सर्व सामान्यपणे २०-३० दिवसांत लक्षणे दिसतात. सतत व भरपूर लाळ गळणे
मालकास न ओळखणे/आदेश न पाळणे. चावा घेण्याची प्रवृत्ती वाढणे
प्रथम घोगरा आवाज येत त्यानंतर आवाज बंद होतो.
अंधाऱ्या खोलीत जाऊन कोपऱ्यात / पलंगाखाली लपून बसणे. पाणी न पिणे, पाण्याची भीती निर्माण होणे
तोडांचा खालचा जबडा लुळा पडणे, जीभ बाहेर येणे
श्वान ३-७ दिवसांत दगावतो.
गाई, म्हशींमध्ये रेबीज झाल्याची लक्षणे
गाई, म्हशींमध्ये बाधित श्वानदंश झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावरे आक्रमक होतात. माणसावर धावून जातात.
शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर घासतात, सारखे हंबरतात, त्यांचा आवाज घोगरा होतो.
तोंडातून भरपूर लाळ गळत राहते, डोळे लालबुंद होतात, जनावर वारंवार लघवी करतात व शेण टाकतात,
चारा-पाणी बंद करतात. साधारणपणे लक्षणे दिसू लागल्यापासून २ ते ३ दिवसांत जनावरे दगावतात.
मनुष्यामध्ये रेबीजची लक्षणे :
रेबीजग्रस्त श्वानदंश झाल्यानंतर साधारणतः १० ते ९० दिवसांत लक्षणे दिसतात.
तीव्र डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता, निद्रानाश आणि स्थानिक वेदना, अतिसंवेदनशीलता, विचित्र वर्तन, ओकारी आल्यासारखी वाटणे.
नाक-डोळ्यांतून पाणी वाहते, घशाला कोरड पडणे, जेवण करणे व पाणी पिणे बंद होणे.
पाण्याची भीती (हायड्रोफोबिया) आणि शरीरभर लुळेपणा येऊन साधारणत: ७ दिवसांत मृत्यू येतो.
जनावरांचे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांद्वारे रेबीज संक्रमित होतो का?
नाही. रेबीज आजाराचे विषाणू दुधात येत नाहीत. तथापि, रेबीजग्रस्त प्राण्यांच्या दुधाचे सेवन करणे योग्य नाही. उकळलेल्या दुधात रेबीजचे विषाणू जिवंत राहत नाहीत.
संक्रमित प्राण्यांच्या मांसाचे सेवन रेबीज संक्रमित करू शकते का?
संक्रमित प्राण्याचे कच्चे मांस खाल्यास लसीकरण (पोस्ट एक्स्पोजर) आवश्यक आहे. शिजविलेले मांस रेबीज संक्रमित करत नाही; तथापि, रेबीज संक्रमित प्राण्यांचे मांस खाणे योग्य नाही.
श्वानदंश झाल्यानंतर उपाययोजना :
रेबीज आजार झाल्यावर कोणत्याही स्वरूपाचा उपचार उपलब्ध नाही, परंतु श्वानदंश झाल्यानंतर जखमेची योग्य काळजी घेतली, श्वानदंश प्रतिबंधक लस (पोस्ट बाईट व्हॅक्सीन) दिली, तर या प्राणघातक आजारापासून संरक्षण होते.
जखमेची काळजी :
चावा घेतलेली जखम त्वरित कमीत कमी १५ मिनिटे साबण व भरपूर पाणी वापरून स्वच्छ करावी.
त्यानंतर अल्कोहोल किंवा पोव्हीडाइन आयोडीनसारखे जंतुनाशक लावावे.
जखमेस टाके घालू नयेत तसेच पट्टी बांधू नये.
डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३
(संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.