Goat Management : शेळ्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

Goat Farming : गरिबांची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यातील आर्द्रता नियंत्रित राखण्यासाठी घ्यावी लागते. कारण शेळ्यांना जास्त आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
शेळ्यांचे
शेळ्यांचे Agrowon

डॉ. कल्याणी सरप, डॉ. सय्यद शाकिर अली

Goat Rearing : गरिबांची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यातील आर्द्रता नियंत्रित राखण्यासाठी घ्यावी लागते. कारण शेळ्यांना जास्त आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्‍चितच जास्त असते. त्यामुळे व्यवस्थापनात तंत्रात त्यानुसार बदल करणे गरजेचे असते. पावसाळ्यात शेळीचा गोठा स्वच्छ कोरडा ठेवावा. खाद्य, प्रजनन तसेच गाभण शेळी व करडांची निगा, लसीकरण या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करावे.

घ्यावयाची काळजी ः
- पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेळ्यांना जंतनाशकांच्या मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जंताची अंडी आणि गोचिड यांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असतो. गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषण करतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. त्यांच्या अंगावर खाज सुटते. अशावेळी शेळ्या बैचेन होतात, चारा खाणे बंद करतात, त्यांची हालचाल मंदावते. त्यासाठी शेळ्यांच्या अंगावर गोचीडनाशक औषध लावावे.
- पावसाळ्यात गोठ्यातील आर्द्रता वाढते. शेळ्या उष्णता सहन करू शकतात. मात्र आद्रता नाही. गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेगडी किंवा ६० वॉटचा बल्ब लावून उष्णता निर्माण करावी.

शेळ्यांचे
Goat Farming : गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन

-गोठ्यातील जमीन ओली राहिल्यामुळे शेळ्यांच्या पायांच्या खुरांमध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. त्यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खातात आणि अशक्त होतात. योग्य वेळी उपचार न केल्यास शेळ्या दगावण्याची शक्यता असते. गोठ्यातील मलमूत्र दररोज बाहेर काढून गोठा कोरडा ठेवावा.
- पडत्या पावसामध्ये शेळ्यांना बाहेर चरायला सोडू नये. पावसात भिजल्यामुळे शेळ्यांना न्यूमोनियासारखा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शेळ्या शिंकतात, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इ. लक्षणे दाखवितात.
- पावसाळ्यात उगवलेला कोवळा हिरवेगार गवत शेळ्या अधिक प्रमाणात खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यामुळे अपचन, पोटफुगी, हगवण असा त्रास उद्‍भविण्याची शक्यता असते.

लसीकरण महत्त्वाचे
पावसाळ्यात शेळ्यांना प्रामुख्याने विविध जिवाणू, विषाणू आणि परजीवी कृमी यांच्यामुळे विविध आजार होतात. बदलते हवामान आणि खाद्यतील पोषक तत्वांच्या अभावामुळे विशेषतः करडे लवकर आजारास बळी पडतात. लहान करडांमध्ये हगवणीचा त्रास वारंवार दिसून येतो. त्यासाठी करडांची खाद्य पाणी आणि आरोग्याची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.
- शेळ्या व करडांना आंत्रविषार, फुफ्फुसदाह, लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
- पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी धनुर्वाताचे इंजेक्शन पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून द्यावे.

- गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहल्यामुळे चालताना घसरून पडून गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यासाठी गाभण शेळ्यांचे स्वतंत्र योग्य निवाऱ्याखाली आणि कोरड्या ठिकाणी व्यवस्थापन करावे.
- पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते. योनीभाग व बाजूचा भाग स्वछ नसेल तर गर्भाशयात जंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाने स्वच्छ धुऊन कोरडा करावा.
- नवजात करडांना जन्मानंतर २४ तासांच्या आत चीक किंवा दूध पाजणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती व ऊर्जा मिळते. त्यांची पचनसंस्था साफ होण्यास मदत होते.

डॉ. कल्याणी सरप, ९०९६८ ७०५५०
(विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा जि. गोंदिया)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com