प्रतीक साबे पाटील
सध्या बहुतांश ठिकाणी पेरणीची (Sowing) कामे सुरू आहेत. पेरणीचे नियोजन करताना शेतातील जमिनीचा काही हिस्सा गोठ्यातील पशुधनाच्या हिरव्या चाऱ्यासाठी (Green Fodder) आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. पशुपालन (Animal Herding) हा व्यवसाय मुख्यतः सकस चारा आणि स्वच्छ पाणी या दोन घटकांवर अवलंबून असतो. पशुपालनात सुमारे ५० ते ६० टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होतो. त्यामुळे कमी खर्चात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध कसा होईल यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. पशूंच्या सकस चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्याला फार महत्त्व आहे. गोठ्यातील जनावरांची संख्या, जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे. (Green Fodder Management)
लागवडीसाठी हिरवा चारा ः
- हिरव्या चाऱ्याचे नियोजन करताना एकदल आणि द्विदल चाऱ्यासोबतच बहुवार्षिक चाऱ्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
- एकदल वर्गातील हिरव्या चारा पिकांमध्ये मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, हत्ती गवत, गिनी गवत, नेपिअर गवत, धारवाड हायब्रीड इत्यादींचा समावेश होतो. एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात.
- द्विदल वर्गातील चारा पिकांमध्ये चवळी, लसूण घास, बरसीम, स्टायलो, दशरथ गवत इत्यादींचा समावेश होतो. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
- याशिवाय शेताच्या बांधावर शेवरी, सुबाभूळ, हादगा, शेवगा, तुती आणि अंजन यांसारख्या वृक्षांची लागवड केल्यास अधिक प्रथिनयुक्त झाडपाला जनावरांना उपलब्ध होतो.
हिरव्या चाऱ्याचे आहारातील महत्त्व ः
- हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शिअम यांसारख्या पौष्टिक घटकांचे प्रमाण अधिक असते.
- हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते. तसेच दुग्धोत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
- जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण समतोल राखण्यासाठी देखील फायदा होतो. त्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.
- पशुधनाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहून शरीरावर ताण येत नाही.
- चाऱ्या होणारा अधिकचा खर्च कमी होतो.
- हिरवा चारा खाण्यास रुचकर व पचनास हलका असल्याने पशुधन आवडीने खाते.
चाऱ्याचे प्रमाण ः
- प्रतिदिन १० लिटर दूध देणाऱ्या एका गायीला १५ ते २० किलो हिरवा चारा, ५ ते ६ किलो वाळलेला चारा आणि ४ ते ५ किलो खुराक गरजेचा असतो.
- लहान जनावरांना म्हणजेच एका शेळीला प्रतिदिन हिरवा चारा ३ ते ४ किलो, वाळलेला चारा १ ते २ किलो आणि खुराक २०० ते ३०० ग्रॅम आवश्यक असतो.
- प्रतीक साबे पाटील, ७३५०४७७२४२
(लेखक पशू क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.