Lumpy skin : ‘लम्पी स्किन'चा होतोय प्रसार

लम्पी स्कीन हा गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांना जडणारा देवीसदृश विषाणूजन्य आजार आहे. आजारात त्वचा आणि इतर भागांवर गाठी येतात. कॅप्रीपॉक्स या देवी वर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) हा गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांना जडणारा देवीसदृश विषाणूजन्य आजार आहे. आजारात त्वचा आणि इतर भागांवर गाठी येतात. कॅप्रीपॉक्स या देवी वर्गीय विषाणूमुळे (Capripox Virus) हा आजार होतो.

सूर्यप्रकाशात हा विषाणू निष्क्रिय होतो. मात्र ढगाळ वातावरणात (Cloudy Weather), अंधाऱ्या ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिने सक्रिय राहतो. हा आजार दमट आणि उष्ण वातावरणात जास्त प्रमाणात दिसून येतो. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता आणि मृत्युदर अधिक असतो. तुलनेने देशी जनावरांच्यामध्ये या आजाराची तीव्रता आणि मृत्युदर कमी असल्याचे दिसून आले आहे. गायींच्या दूध उत्पादनात भरपूर प्रमाणात घट होते. गुरांच्या प्रजननात अडथळे येतात. त्वचेवर गाठी येत असल्याने चामडी खराब होते.

प्रसार ः

- वाहतुकीमुळे या आजारास कारणीभूत विषाणू लांब अंतरापर्यंत संक्रमित होवू शकतो. आजाराचे विषाणू बाधित जनावरांच्या रक्तात किमान पाच दिवस ते दोन आठवडे पर्यंत राहतात. अशा जनावरांचे रक्त शोषण करणारे किटक रोगप्रसाराचे कार्य करतात.

- एडीस प्रजातीच्या किटकाव्यतिरिक्त स्टोमॉक्सीस माशा आणि रिफिसेफॅलस गोचिडिव्दारे या आजाराचा प्रसार होतो. लक्षणे दाखवीत असलेल्या जनावरांच्या त्वचा, अश्रू, लाळ आणि शेंबुडावाटे १८ ते २० दिवसांपर्यंत विषाणूचे उत्सर्जन होते.

- विषाणूने प्रदूषित शारीरिक स्रावाचा प्रादुर्भाव वैरण आणि पाण्यात झाल्यास त्यावाटे रोगप्रसार होवू शकतो.

- बाधीत वळूच्या वीर्यात विषाणू उत्सर्जीत होतात. त्यामुळे विषाणू प्रदूषित विर्यातून रोगप्रसार होण्याची शक्यता असते.

- बाधित जनावराच्या दुधात सुद्धा विषाणू उत्सर्जन होते. दुधावाटे वासरांत रोगप्रसार होतो.

- माणसात याचा प्रसार होत नाही. तरी दूध उकळून प्यावे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : लम्पी त्वचा आजारासाठी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

लक्षणे ः

- संक्रमण झाल्यानंतर विषाणू साधारणतः दोन आठवड्यापर्यंत रक्तामध्ये वास्तव्य करतात. त्यानंतर ते शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. शरीराच्या विविध भागात विषाणू संसर्गाने वेदनादायी दाह निर्माण होतो. जनावरे अत्यवस्थ होतात.

- विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बाधित जनावरे साधरणतः एक ते पाच आठवड्या नंतर लक्षणे दाखविण्यास सुरवात करतात. सर्वप्रथम डोळ्यातून अश्रू आणि नाकातून शेंबूड वाहण्यास सुरवात होते. डोळ्यांवर चिपाड येतात. खांदा आणि मांडीतील लसिका ग्रंथी सुजतात.

- ४०.५ अंश सेंल्सिअसपेक्षा जास्त ताप येतो. ताप एक आठवड्यापर्यंत राहू शकतो.

- दूध उत्पादन अचानक कमी होते.

- ताप आल्यानंतर ४८ तासांत त्वचेवर १० ते ५० मिलिमीटर परिघाच्या गाठी येतात.

- या गाठी एकट्या, गोलसर, फुगीर, टणक आणि वेदनादायी असतात. अशाच गाठी पचनसंस्था, श्वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या विविध अवयवात दिसतात. त्यात पूसारखे द्रव्य साठते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : जनावरांसह गोठ्यांची फवारणी करा

- कालांतराने गाठी लहान आणि कमी होत जातात. त्या ठिकाणी व्रण तयार होतात. व्रणाच्या सभोवताली खपल्या तयार होतात.

- तोंड आणि नाकाच्या श्लेष्म त्वचेवर व्रण दिसतात. पू मिश्रित शेंबुड दिसून येतो. लाळ जास्त प्रमाणात गळते.

- क्वचित डोळ्यांमध्ये सुद्धा व्रण तयार होतात. त्यामुळे जनावर आंधळे बनू शकते.

- बाधित जनावरांत फुफ्फुसाचा दाह, कासेचा दाह आणि पायावर सूज दिसून येते.

- गुरे लंगडतात, वैरण कमी खातात, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.

- वळू काही काळ किंवा नेहमीसाठी नपुंसक बनू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. बाधित गायी कित्येक महिने फळत नाहीत.

- बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. मात्र बरी

झालेली जनावरे पुढील ४० ते ४५ दिवसापर्यंत विविध स्त्रावांत विषाणू उत्सर्जन सुरूच ठेवतात.

नियंत्रण आणि प्रतिबंध ः

- आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक मात्र प्रभावी उपाय आहे.

- सर्व गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांचे दरवर्षी नियमित लसीकरण करावे.

- सध्या आपल्या देशात या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शेळ्यांच्या देवीची लस वापरली जाते.

- सामान्यतः लसीची मात्रा प्रती जनावर १०३ टी.सी.आय.डी.५० असावी. मात्र उद्रेक तीव्र असल्यास प्रती जनावर १०३.५ टी.सी.आय.डी.५० एवढी मात्रा द्यावी.

- आजाराच्या उद्रेका दरम्यान जनावरांची वाहतूक करू नये. तसेच खरेदी - विक्री सुद्धा करू नये.

- बाधित जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. त्यांचा उपचार त्याच ठिकाणी करावा.

- जनावरांवर किटक, माशा आणि गोचिडींचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. त्यासाठी किटक रिपेलंट आणि किटक नाशकांचा वापर करावा.

- गोठे आणि प्रक्षेत्र किटक मुक्त ठेवावे.

- लसीकरणानंतर जनावरांना किमान २८ दिवस चरण्यास सोडू नये.

- गोठ्याची आणि परिसराची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे.

- प्रक्षेत्र आणि गोठ्यात जैवसुरक्षेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

संपर्क ः डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९

(सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com