कोल्हापूर : दररोज सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडतो. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जेवढे म्हणून रान तुडवले जाईल इतक्या वाड्या- वस्त्या फिरतो. दूर दूरवर असणारे धनगरवाडे व त्या वस्त्यांवरील जनावरांची तपासणी (Animal Treatment) करतो.
गेल्या तीन महिन्यांपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. या तीन महिन्यांत शंभरहून अधिक जनावरे मृत्यूच्या (Animal Save From Death) तावडीतून वाचविली आहेत.
जनावर बरे झाल्यानंतरचा पशुपालकाचा होणारा आनंद हा माझ्या श्रमापेक्षाही महत्त्वाचा असतो,’’ पशुधन पर्यवेक्षक गुलाब शेळके आपला गेल्या तीन महिन्यांचा अनुभव सांगत होते.
शाहूवाडी हा कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम तालुका. जिथे जाताही येत नाही, अशा दुर्गम भागांत तालुक्यात शेकडो वाड्या-वस्त्या विस्तारल्या आहेत. धनगर वाडेदेखील जंगली श्वापदांना तोंड देत उभे आहेत.
या भागात मनुष्याच्या आरोग्याची हेडसांड असते, तर जनावरांची कशी सोय होणार? मात्र शेळके यांच्यासारखे पशुधन पर्यवेक्षक त्यासाठी अक्षरशः राबत आहेत. त्यामुळेच या भागातील मरतुक अगदी बोटावर मोजण्याइतकी झाली.
‘ॲग्रोवन’ने शित्तुर वारूण परिसरातील काही धनगर वाड्यांना भेट दिली असता बहुतांशी धनगर वाड्यांमध्ये दूध संघाच्या अधिकाऱ्यांपेक्षा हे पशुसंवर्धन विभागाचे युद्धभूमीवर काम करणारे कर्मचारीच जास्त संपर्कात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे सर्वांत दुर्गम भागात लोकवस्ती असून सुद्धा ‘लम्पी स्कीन’ने सगळ्यात आधी या भागात प्रवेश केला.
या बाबतची माहिती खुद्द गावकऱ्यांनाही नव्हती. ‘‘तीन-चार महिन्यांपूर्वी प्रत्येक वाडीत प्रत्येक गोठ्यामध्ये ‘लम्पी स्कीन’ची जनावरे आढळून आल्यानंतर मात्र सगळेच हादरले.
या वेळी देवदूत म्हणून पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी धावून आले,’’ असे पेगूचा वाडा येथील कानू बाराखडी या पशुपालकाने सांगितले.
वाशीम जिल्ह्यातील असलेले शेळके हे पर्यवेक्षक गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात स्थिरावले आहेत. दररोज १० ते १५ जनावरांची तपासणी करण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागते.
एकेका जनावरासाठी दहा-बारा किलोमीटरची दौड ठरलेलीच आहे. औषधांची पिशवी सावरत मोटरसायकलवरून तातडीने जनावराकडे पोहोचण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे.
जिल्ह्याच्या अनेक समृद्ध भागात पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी पोहोचलेही नसताना शेळके यांच्याकडे प्रत्येक धनगर वाड्यातील जनावरांचा इतिहास तोंडपाठ आहे. पशुपालकांनी अगदी उशिरा आणि शेवटच्या टप्प्यात माहिती दिल्याने पाच-सहा जनावरे दगावल्याचेही शेळके यांनी सांगितले.
ज्या गावांना दळणवळणाच्या सुविधा चांगल्या असल्याने लसी व अन्य औषध उपचार तातडीने दिले गेले. पण शाहूवाडीसारख्या दुर्गम भागातील या गावांमध्ये मात्र सर्वच लोड कृषी पशुसंवर्धन विभागावर आला.
मात्र तरीही शेळके यांच्यासारख्या काही कर्मचाऱ्यांनी मात्र ऊन, पाऊस थंडीची पर्वा न करता शंभर टक्के लसीकरण केले व जनावरे वाचवली. ही पोहोचपावती पशुपालकांनीच बोलताना दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.